प्रेम उठाव : आधुनिक प्रेमाचा दिशादर्शक

 प्रेम उठाव  : आधुनिक प्रेमाचा दिशादर्शक


( पुस्तक परीक्षण लेखक    :-   प्रा. डॉ. संभाजी धोंडीराम कदम )





        प्रेम म्हणजे काय ?  हे कोणालाही सांगावे लागत नाही . कारणही तसेच आहे. प्रेम ही उपजत देणगी आहे. बाळ जन्माला येताच मातेला प्रेमपान्हा फुटतो. तिच्या बाळाला तिच्या हाती दिल्यानंतर वात्सल्य भावना उद्दीपित होऊन ती त्याचे पटापट मुके घेते त्यातून प्रेम ही संकल्पना किंवा भावना कळते. आज प्रेमाशिवाय आपुलकी निर्माण होतच नाही . प्रेमामुळे असूया दया, माया, ममता निर्माण होत असते . प्रेम म्हणजे प्रेम असत पण ते प्रेम एका आत्म्याचे दुसऱ्या आत्म्याशी एकरूप होणे होय . म्हणजे प्रेम हे एकरूप होणे म्हणजे आचार, विचार, भावना आणि मनातील कल्लोळानी होय . प्रेम ही टोकाची भूमीका नसून समजूतदार पणाचा आचार आहे .

       नवनाथ रणखांबे  लिखित वाचनीय   " प्रेम उठाव " हा काव्यसंग्रह म्हणजे  संघर्षमय जीवनाची करुण कहाणी आहे . पृथ्वीवरील मानवासह मानवेत्तर सजीव प्रेमासाठी आसूसलेला असतो . प्रेमाचे अनेक रंग, अनेक ढंग आहेत. सजीवानां प्रेम कोणावर कधी का कसे करावे हे सांगावे लागत नाही. कारण प्रेम अजाणतेपणी नकळत घडत जाणारी गोष्ट आहे . आईचे आपल्या बाळावर कधी प्रेम जडले हे सांगावे लागत नाही . कारणा ते अजाणतेपणी आणि वात्सल्यापोटी व नकळत घडत गेलेले असते. प्रेम ही सहज सुलभ असणारी गोष्ट असली तरी तेवढी साधीही नाही 'प्रेमासाठी वाट्टेल ते'  करणारी माणसे आहेत. प्रेम ही सोज्वळ, नितळ, पवित्र गोष्ट आहे त्याचा अर्थ जसा आपण समजून घेतोय तसाच याचा अर्थ तयार होत असतो .

     कविता ही अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी प्रभावी गोष्ट आहे .  कवीच्या आयुष्यातून तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती त्यांच्या "राहिली हृदयात " या गझलेतून मांडतात, ---


      गजल / राहिली हृदयात 

"  यातनांनी घेरलेली बात होती

    रोज आता असवांची रात होती " 

  ( प्रेम उठाव/ पान नंबर 30) 

मला तिचा विरह सहन होत नाही . माझे, ' दुःख मी शब्दातून बोलके करण्याचा प्रयत्न करत आहे .भारतीय समाज हा जातीनी बांधला गेला आहे . इथे नाती महत्त्वाची  असतात मात्र आपल्याच माणसांनी ही नाती तोडल्याची खंत दररोज मनाला दुःख देत आहे. जिने माझ्या मनाला दु :ख   दिले ती आजही माझ्या हृदयात खोलवर जागा करून आहे ; आणि हे दुःख मनात साठवले ते , -----

            लेखणी  

         " हृदयाने माझ्या

          खूपच साठवले

          लेखणीला मात्र

          थोडेच आठवले. "

( प्रेम उठाव / पान नंबर 31)

माझ्या हृदयात भरपूर दुःख साठविले आहे . मात्र तिचा विरह सहन होत नाही . कायम तिचीच आठवण मनात भरल्यामुळे माझ्या हृदयातले सगळेच दुःख मला आठवत नाही जे आठवले ते लेखणीव्दारे मी आपणापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे  कवी नवनाथ रणखांबे  म्हणतात . माझ्या वेदना इतक्या तीव्र आहेत की, त्या मला झाकताही येत नाहीत अन् मिरविताही येत नाहीत . पण माझ्या अंतरीतले निखारे मला स्वस्थ बसू देत नाहीत ते अन्याया विरुद्ध आवाज उठवायला सांगत आहेत .  कारण ह्या काळ्या काळोखाला आणि मनाच्या आर्त दुःखाला कवितेतून मांड असा सल्ला देत आहेत . पण तिचा विरह संपता संपत नाही . रात्री झोपही नीट लागत नाही पौर्णिमेचे शितल चांदणे आग ओकत असल्याचा भास होतोय सर्व सुख पायाशी लोळत असताना, -----

         उणिवा 

     "  का हा विरह

      का हा दूरावा

      तुझ्या आठवांचा, 

      हृदयात ओलावा  !" 

( प्रेम उठाव / पान नंबर 36) 

सर्व सुख पायाशी लोळण घेत असतांना फक्त तिच्या नसण्याने दोघांमधिल दूरावा दृढ करत आहे . आजही माझ्या खुललेल्या क्षितिजामध्ये तूच आहेस . वैशाख वणवा अंतरंगामध्ये आग पेटवत आहे ह्याची मला काळजी लागली आहे . हे मला सहन होत नाही चोरून भेटणे मला पसंद नाही. त्यापेक्षा आपण पळून जाऊ पण हे ही शक्य नाही कारण भेकड माणसं पळून जातात आपण तर एकमेकांवर प्रेम केले आहे . आपल्या हृदयातील नाते असेच टिकावे असे वाटत असेल तर चकवा देऊ नकोस तुझ्या सोबत जगणं मला आवडतं. तुझ्या असण्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते अशा हरेक प्रकारे प्रियकर तिची मनधरणी करताना कवितेत  दिसतो .  कवीने अत्यंत सूक्ष्मपणे दोघांच्या प्रेमाचे अतुट नात्याचे बंध किती घट्ट आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे . तो तिच्यासाठी जीवाचे रान करायला तयार आहे . तिच्या एका भेटीसाठी आसूसलेला आहे पण हे सर्व दिवास्वप्न आहे याची जाणीव होते.  तिचे घायाळ करणारे धुंद भरले  'इशारे ' अंगा अंगावर रोमांच उभे करत होते . तरुणपणातील आठवणी त्याच्या नजरे समोर होत्या. एक एका आठवणीने त्याचे मन घायाळ होत होते.  एक काळ असा होता की तिच्या प्रेम भरल्या अदानी त्याच्या मध्ये एक नवचैतन्य , नवी उमेद , नवी  ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटत होते . पण ह्या तारुण्यात जर का एखादी चूक झाली किंवा दोघांची ताटातूट झाली तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण आयुष्यभर भोगावे लागतात . ती भळभळणारी जखम आयुष्यभर सोबत घेऊन जगावे लागते .  प्रेम करणे ही वरवर सहज प्रवृती असली तरी तिचे चांगले वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. याचे सहज सुंदर चित्रण  नवनाथ रणखांबे कवीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे .

           एके दिवशी धाडस करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो.  मात्र तेही करता येत नाही . काळानेच हे घडू दिले नाही . ती जखम आजही भळभळत आहे म्हणून (कवी) तो म्हणतो , ----

            मन 

     "  मन तुझ्यासाठी

        माझं दररोज झुरायचं

        प्रेमात भेटीसाठी

        तुझ्या वाटेवर फिरायचं "

(प्रेम उठाव / पान नंबर 55) 

प्रेमात वेड होण काय असतं ते हयाच चार ओळी सांगून जातात . प्रेमात पडलेली व पडलेले त्या दोघांना एकमेकांच्या भेटीची आस असते . पण समाजाला ही गोष्ट मान्य नसते समाज या गोष्टीसाठी खडा पहारा देत असतो . म्हणून ती कदाचित त्यांच्या भेटीच्या नित्याच्या ठिकाणी किंवा त्याच रस्त्यावरून येत नाही हा प्रियकर दररोज तिच्या वाटेकडे आशा भरल्या नजरेने पहात असतो मात्र तिचा ठावठिकाणा लागत नाही .

         ( पत्ता )

      "    दाही दिशास

         मी तुला शोधतो ?

         क्षितिज अंबरास

         पत्ता तुझा मागतो ! " 

( प्रेम उठाव / पान नंबर 55 )

तिच्यापासून त्याला दूर रहाणे आवडत नाही. तिच्या शिवाय त्याला करमत नाही कोणतीच गोष्ट तिच्या शिवाय करता येत नाही. म्हणून तिला त्याच्या हृदयाच्या कप्यात बंद करून टाकले आहे . कारण प्रेम संपले की ' नात्यातील अंतर कमी होत जाते . आणि प्रेम टिकले की अंतर वाढत जाते म्हणून टिकणारे प्रेम त्याला हवे आहे. ती आयुष्यात येवून जखम देवून गेली आहे. वाटत होत की मी तिच्यासाठी आणि ती माझ्यासाठी पण ते खरे नव्हते . पहाटेची पडणारी स्वप्ने खरी होत नसतात तसेच तिचे प्रेम माझ्यासाठी होते . '

      ' प्रेम उठाव ' या  कविता संग्रहात प्रियेसीच्या प्रतिकात्मकतेतून कविने समाजातील विविध छटा दाखविल्या आहेत. तसेच सामाजिक प्रेमाची व्यापकता या कविता संग्रहामध्ये दिसून येते. या कविता संग्रहामध्ये काही सामाजिक कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा दिसून येते. तसेच समाजातील असमानता आणि त्याविरुद्ध समतेचा उठाव करून समाजातील इडा पिडा टळून समतेच्या राज्याची मागणी कवी उठाव ह्या कवितेत करताना दिसून येता .

    "' नवनाथ रणखांबे " यांनी प्रेम उठाव हे काव्यसंग्रहाचे शीर्षक आधुनिकतेला समर्पक योजले आहे चंगळवाद आणि आधुनिक रहाणीमानामुळे व जीवन जाणीवांमुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे . एकेकाळी चौकटीच्या बाहेर न पडणारी स्त्री आज आधुनिक जगात मुक्तपणे संचार करू लागली .  खरे तर चांगली गोष्ट आहे . पण याच मुक्तपणाचा काही स्त्रीया स्वैरपणे वापर करताना दिसून येतात. म्हणजे ज्याच्यावर ती प्रेम करते ते मनापासून करत नाही याचे चित्रण  'प्रेम उठाव' या काव्यसंग्रहातून दिसून येते . प्रेमामध्ये ज्या तरुणांची फसगत झाली.  त्यांनी अनेक बाबतीत टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते म्हणून  ' प्रेम उठाव ' हा काव्यसंग्रह आधुनिकतेला साजेसा वाटतो .

    *पुस्तक परीक्षण लेखक*    :-   *प्रा. डॉ. संभाजी धोंडीराम कदम*, 
 बाबासाहेब चितळे महाविद्यालय ,भिलवडी . ता . पलूस , जि. सांगली .
 *पुस्तक*  -:  प्रेम उठाव
 *कवी* -:  नवनाथ रणखांबे 

*प्रकाश* -: शारदा प्रकाशन ठाणे

*किंमत* - :90/- ₹





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.