मेरी माटी मेरा देश; शिक्षक वाचेल तर जगही वाचेल
सरकारनं मेरी माझी मेरा देश या अंतर्गत नऊ ऑगस्टपासून तर पंधरा ऑगस्टपर्यंत उपक्रम राबवले. त्यात वसुधानंदन, पंचप्राण प्रतिज्ञा, सैनिकांना वंदन करणे, वेषभुषा, प्रश्नमंजूषा तसेच निबंध व रांगोळी या सर्व स्पर्धा घेतल्या. येत दोन उपक्रम जर सोडले तर बाकी उपक्रम छान वाटले. आता दोन उपक्रम कोणते? असा प्रश्न वाचकांच्या मनात उद्भवला असेलच.
पहिला उपक्रम वसुधानंदन व दुसरा उपक्रम पंचप्राण प्रतिज्ञा. आता या नावावरुन आपल्याला कळणारच नाही. परंतु स्पष्ट करुन सांगतो. वसुधानंदन याचा अर्थ झाडं लावणे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ओली माती गोळा करणे. त्या मातीत एक रोपटं लावणे अनिवार्य ते रोपटं जमीनीत पुरणे. वाटल्यास ते रोपटं हातात घेवून आम्ही मातीमध्ये झाडाचं रोपटं लावलं असा युक्तीवाद दाखवणे. हा दिल्लीकरांचा उपक्रम होता. उद्देश होता इतर भागातील मातीत गोळा करुन दिल्लीतील या रोपटे लावण्याच्या जागी टाकणे, यालाच मेरी माटी मेरा देश हे नाव दिलं गेलं. हा उपक्रम प्रत्येक शाळेतील वर्गखोल्यातून राबविण्यात आला. उपक्रम चांगला असल्यानं प्रत्येकांनी यात भाग घेतला व मोठ्या प्रमाणावर आपले फोटो काढून दिमाखानं ते व्हायरलही केले. यात सांगायचं म्हणजे काहींनी वास्तवीक स्वरुपात उपक्रम केला. परंतु त्यांना फोटो काढण्याची गरज उरली नाही. अशा शिक्षकांना प्रामाणिकच म्हणता येईल. त्यांना दाखविण्याची गरज नव्हती आणि दाखवूही नये. परंतु दाखवायला सरकारनं यासाठी सांगीतलं की काहीजणं उपक्रम करतच नाही ही वास्तविकता आहे.
मुळात यामध्ये हेच सांगायचं आहे की हे व्हिडीओ जर बारकाईने पाहिले आणि त्याचं निरीक्षण केलं तर असं आढळून येते की काही शाळेतील शिक्षकांनी उपक्रम तर घ्यायचाच. परंतु झाडं कुठून आणायची? वेळेवर झाडं आणता येत नाही. असं गृहीत धरुन फक्त उपक्रम राबविण्यासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर केला व मातीत त्या फांद्या रोवल्या. त्या रोवलेल्या फांद्या आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात देवून त्या विद्यार्थ्यासह आपला फोटो काढला व तो फोटो व्हायरल करुन आम्ही उपक्रम राबवला हे सिद्ध केलं व शेकडो झाडांच्या फांद्यांची कत्तल करुन टाकली. वसुधानंदन उपक्रम. एक चांगला उपक्रम. परंतु तो उपक्रम अशा प्रकारे राबविण्यानं शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कोणता बोध दिला. झाडं आपले मित्र असून वेळप्रसंगी त्याच्या फांद्या तोडून उपक्रम राबविणे हा बोध द्यायचा की झाडं लावण्यासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर करायचा की झाडं पर्यावरणाचे रक्षण असल्यानं ओरीजनल झाडं लावायची. उपक्रम चांगला. परंतु ज्या वर्गखोल्यातून शिक्षक शिकवतो की झाडाला जीव असतो. त्याच्या फांद्या तोडल्यास त्याला इजा होते आणि उपक्रम राबवितांना जेव्हा एखादा शिक्षक त्याच झाडाच्या फांद्या तोडून जर उपक्रम राबवीत असेल तर असे उपक्रम न राबविलेले बरे.
उपक्रम राबवितांना दुसरा उपक्रम होता पंचप्राण. मातीचे दिवे बनवायचे व त्यातील एक दिवा हातात घ्यायचा आणि प्रतिज्ञा घ्यायची. या उपक्रमात दिवा जाळणे गरजेचे नव्हते. तरीही हा उपक्रम राबवितांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातात दिवा दिला व एक हात पुढे करुन त्या जळत्या दिव्यासोबत प्रतिज्ञा म्हणायला लावली. ती प्रतिज्ञा होती. भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर बनविणे. गुलामीची मानसिकता दूर करणे. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणे. भारताची एकात्मता बलशाली करणे. देशाचे संरक्षण करणा-यांप्रति सन्मान बाळगणे. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करणे.
हाही उपक्रम चांगलाच. परंतु बिनधास्तपणे विद्यार्थ्यांना ही प्रतिज्ञा घेताच आली नाही. ते विद्यार्थी भीतभीतच प्रतिज्ञा घेत असल्याचं दिसलं. ती भीती होती, कदाचीत दिवा माझ्या हातावर पडणार तर नाही.
तीच भीती होती विद्यार्थी मनात. दिवा पडणार आमच्या अंगावर. अतिशय जीव घेणी प्रतिज्ञा होती ती. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी प्रतिज्ञा. जणू जीवघेणा खेळच. त्यातच समजा एखाद्या विद्यार्थ्यांच्या हातून एखादा दिवा नजरचुकीनं विद्यार्थ्यांच्या अंगावर पडलाच तर विपरीत व्हायचं. याबाबतीत मी एक प्रसंग सांगतो. तसं पाहता कोणतेही प्रसंग सांगून येत नाहीत वा संकट कधीही सांगून येत नाही.
मी सुरुवातीला एका शाळेत शिकवीत होतो. त्या शाळेत दर शुक्रवारी सरस्वती पुजन व्हायचं. आरती व्हायची व आरतीनंतर प्रसाद वितरण. मुलं लहान होती. त्यांनाही आनंदच वाटायचा. परंतु त्यातच ती लहान असल्यानं तेवढीच वात्रटही होती.
परंतु एक दिवस दुर्घटना होता होता राहिली. आरती सुरु असतांना एका विद्यार्थ्यानं त्या आरतीच्या ताटाला खालून हात मारला. त्यातच आरतीचं ताट खाली पडलं आणि पडतांना त्या ताटातील दिव्याचं तेल आरती करणा-या मुलीच्या अंगावर. त्यानंतर तिचे कपडे तेलानं भरले होते. बरं झालं की प्रसंग केवळ तेलानं कपडे भिजण्यावरच निभावला. जर त्या दिव्यातून तेलाची जळती वात त्या विद्यार्थीनीच्या कपड्यावर पडली असती तर अनर्थ झाला असता.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. ते काही विद्यार्थ्यांचे शत्रू नसतात. तसंच आजच्या काळात खेळीमेळीचं वातावरण त्यांना द्यावं लागतं. अशा वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षक पाहू शकत नाहीत. जिथं आपण आपल्या घरच्या दोन मुलांवर पुरेपूर लक्ष पुरवू शकत नाही. तिथं एका वर्गात दोनपेक्षा जास्त मुलं असतात. संपुर्ण मुलांकडे एक शिक्षक कसा लक्ष देईल? ती तसं पाहता तारेवरची कसरतच असते. अशावेळेस हानी होवू शकते. हे नाकारता येत नाही.
निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, रांगोळी स्पर्धा चांगल्या स्पर्धा आहेत. त्याला उपक्रमाची जोड दिली. ती एक चांगली गोष्ट आहे. परंतु अशा उपक्रमात वसुधानंदन व पंचप्राण असे उपक्रम नसावेत की जे उपक्रम विद्यार्थी वर्गासाठी जीवघेण्या स्वरुपाचे ठरु शकतील. जे शिक्षकांनाही बाधक व मारक ठरु शकतील. शिक्षकांना काय, त्यांना शासनाचा धाक असतो. म्हणूनच ते घेणारच. कारण ते शासनाचे नोकर आहेत. परंतु त्यांच्याही अस्मीतेचा विचार करुन शिक्षकांना गुलामीचे बंधन टाकू नये. ज्या पंचप्राण प्रतिज्ञेतच गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्याचा उल्लेख आहे. तसेच २०४७ पर्यंत भारतास आत्मनिर्भर व विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न आहे. पर्यायानं सांगायचं म्हणजे शिक्षकांनाही सन्मान असावा. त्याच्यावर तो सरकारी नोकर असल्यानं कोणतेही बंधन टाकू नये. कारण शिक्षक असा घटक आहे की तोच भारताला बलशाली बनवू शकतो व तेवढाच आत्मनिर्भरही. म्हणूनच अंतिमतः एवढेच सांगणे आहे की शिक्षक वाचेल तर देशच नाहीतर जगंही वाचेल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

stay connected