Blind Stick : जिल्हा परिषद शाळेच्या एका चिमुकल्यानी केली कमाल : अंध व्यक्तिंसाठी वरदान ठरणारी बनवली ब्लाइंड स्टिक

 Blind Stick : जिल्हा परिषद शाळेच्या एका चिमुकल्यानी केली कमाल : अंध व्यक्तिंसाठी वरदान ठरणारी बनवली ब्लाइंड स्टिक




------------

राजेंद्र जैन / कडा

--------------

विद्यार्थी दशेत काहितरी मोठं करण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एका नव्या उंचीवर पोहचवते. याचं अनोखे उदाहरण म्हणजे तालुक्यातील आष्टा (ह.ना.) येथील जि.प. माध्यमिक शाळेचा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणा-या प्रतिक पठाडे या चिमुकल्याने आपल्या कल्पक बुध्दीने विविध सेन्सर्सचा वापर करुन अंध व्यक्तिंसाठी वरदान ठरणारी ब्लाइंड स्टिक तयार करुन, या ग्रामिण भागातील विद्यार्थ्याने आकाशाला गवसणी घातली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.





आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण येथील पाचशेहून अधिक पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची इयत्ता पहिले ते दहावी पर्यंतच्या वर्गाची माध्यमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारा प्रतिक विलास पठाडे नावाच्या हुश्शार विद्यार्थ्याने कल्पक बुध्दीच्या बळावर तयार केलेल्या नाविन्यपुर्ण प्रयोगामुळे सध्या तो शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. या चिमुकल्याने बालवयातच शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ युनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तिंसाठी वरदान ठरणारी "ब्लाइंड स्टिक" तयार केली आहे. या विद्यार्थ्याने बनवलेले हे यंत्र दिव्यांग अंध व्यक्तिसाठी नक्कीच लाभदायक ठरणारे आहे. रस्त्याने चालताना एखाद्या अंध व्यक्तिला रस्ता पार करायचा असेल, अन् समोरुन काही अडथळा आल्यास या स्टिक यंत्राची (काठी) आपोआप घंटा वाजते. त्यामुळे यातून होणा-या आवाजाने त्या अंध व्यक्तिच्या समोर येणारा कसलाही अडथळा त्याच्या एका क्षणात लक्षात येऊ शकतो. या विद्यार्थ्याने सादर केलेेला आगळावेगळा प्रयोग या शाळेचा नावलौकिक वाढवणारा ठरला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र ठरलेला एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असून, यापुर्वी झालेल्या तालुकास्तरिय क्रिडा स्पर्धेत त्याने व्दितीय क्रमांक देखील पटकवलेला आहे. या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मच्छींद्रनाथ जगताप, या प्रयोगासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक नामदेव भिसे, धर्मनाथ शिंदे व इतरांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या नाविन्यपुर्ण प्रयोगातून आकाशाचा घवसणी घालणा-या प्रतिक पठाडे या विद्यार्थ्याच्या नेत्रदीपक कौशल्याचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी स्वागत करुन पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.

-----------%%%--------



महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडून प्राप्त झालेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर या शाळेला प्राप्त असून प्रतीकसह इतर विद्यार्थी सेंटरचा विज्ञान विषयाचे माध्यमिक शिक्षक नामदेव भिसे, प्रतिकला शिकवणारे धर्मनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध प्रयोगाच्या साहित्याची हाताळणी करतात .यामधूनच प्रतीकने या ब्लाइंडस्टीकचा त्याच्या कल्पक बुद्धीने शोध लावला आहे.

--------%%--------



विद्यार्थी हेच आमचं दैवत....

--------------------

आमची शाळा शिक्षकांसाठी ज्ञानमंदिर असून, विद्यार्थी हेच दैवत समजून प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास हेच ध्येय ठेवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास वाढावा, म्हणून शाळेचे सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात.
- मच्छींद्रनाथ जगताप, 
मुख्याध्यापक, आष्टा (ह.ना.)

--------%%------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.