शेतकऱ्यांसाठी पूर्णत: मोफत pik vima डिजिटल पत्रकार संघटनेचा उपक्रम

 शेतकऱ्यांसाठी पूर्णत: मोफत pik vima डिजिटल पत्रकार संघटनेचा उपक्रम




बार्शी - यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आता, बार्शी तालुका डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी मोफत पीक विमा नोंदणी करून देण्यात येत आहे. संघटनेच्यावतीने रविवारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.


याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी तालुका कृषि अधिकारी एस.एस.कोयले, आगळगावच्या सरपंच पुतळा गरड, उपसरपंच आणि संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी असणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार केवळ १ रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल. मात्र, पोर्टलवर भरणा करताना त्यांच्याकडून कॉम्प्युटर फी म्हणून १०० ते २०० रुपये घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच, पीक विमा भरण्याची मुदतही संपुष्टात येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्दर्शनानुसार बार्शीतील आगळगाव या गावी रविवार २३ जुलै रोजी पीक विम्यासाठी मोफत नोंदणी कॅम्पचे आयोजन केले आहे. त्यात, केवळ कागदपत्रांची पूर्तता (७/12, ८ अ, बँक पासबुक व आधारकार्ड) करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्णत: मोफत केली जाणार आहे. याकामी, बार्शी तालुका कृषी विभागाचीही मदत मिळणार असल्याचे संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश मेटकरी यांनी सांगितले.


दरम्यान, आगळगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोफत पीक विमा कॅम्प आणि पीक विमा भरण्यासंदर्भातील अडचणींची माहिती मिळणार आहे. त्यासाठी, आगळगाव व आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करावी, असे आवाहनही संघटनेच्यावतीने मेटकरी यांनी केले आहे.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.