प्रेम या भावनेच्या पावित्र्याचा -हास आपल्यावर कुणीतरी प्रेम करेल...

 प्रेम या भावनेच्या पावित्र्याचा -हास
आपल्यावर कुणीतरी प्रेम करेल... 





       आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतं. जन्मापासून ते बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या जीवनाच्या तीनही अनिवार्य अवस्था जगताना कळत-नकळत माणसाने जोडलेल्या अनेक जवळच्या आणि दूरच्या नात्यातही कमी-अधिक फरकाने कोणतीतरी भावना असतेच. माणसाच्या आयुष्यात या सर्व भावनांमध्ये 'प्रेम' या भावनेला खूपच खास आणि मोलाचं स्थान आहे. कारण बालपणापासून ते अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही भावना माणसाच्या मनाला चिकटून राहते. ठरवूनही माणूस स्वत:ला या भावनेपासून अलिप्त ठेवू शकत नाही.

       वरकरणी काही माणसं नैतिकतेचा बुरखा पांघरून 'प्रेम-बिम' खोटं असतं असं काहीतरी म्हणत असतील. पण प्रत्यक्षात त्यांच्याही मनात कधीतरी हे गुलाबी वादळ येऊन गेलेलं असतंच. एक गोष्ट ठामपणे सांगता येईल की, प्रेम केलं नाही असा माणूस या पृथ्वीतलावर सापडणंच कठीण आहे. कारण आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर प्रत्येक व्यक्तीला कुठलातरी माणूस आवडतोच. अर्थात, यापैकी बहूतांश व्यक्तींचं प्रेम हे एकतर्फी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करते. बस! मग समोरच्या व्यक्तीपर्यंत ते प्रेम पोहोचलं का? त्या व्यक्तीने त्या प्रेमाचा स्वीकार केला का? त्या प्रेमाचं रुपांतर लग्नाच्या नात्यात झालं का? या प्रश्नांना माझ्या मनी काहीही अर्थ नाही.

       समोरच्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं या भावनेने कधीच कुठली व्यक्ती प्रेमात पडत नसते. किंबहुना ठरवून होतं किंवा करता येतं ते प्रेमच नाही. खरं प्रेम हे आपल्याही नकळत कुठल्यातरी अनामिक क्षणी आपल्या आयुष्यात येतं आणि मग हे सगळं घडून गेल्यावर आपल्याला साक्षात्कार होतो. 'अरे! आपण चक्क प्रेमात पडलो...' प्रेमात पडलेल्या आणि उभं राहिलेल्या अशा सगळ्याच प्रेमिकांकडून मग प्रेमाच्या सहज व्याख्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्या ऐकल्यावर जाणवतं की, यातली एकही व्याख्या अपूर्ण नाही आणि परिपूर्णही नाही. असं का बरं?

       असं वाटतं की, प्रेम ही भावना एकाचवेळी इतकी सुक्ष्म आणि व्यापक आहे की, या भावनेची सर्वसमावेशक अशी व्याख्या कधीच होऊ शकत नाही आणि जगातल्या कोणत्याही विद्वानाने, विचारवंताने ती करायच्या भानगडीत पडू नये. मोग-याचा हळूवार सुगंध कधी बाटलीच्या कुपीत साठवून ठेवता येत नाही. कोसळणा-या पावसाची कितीही छायाचित्रं काढली, तरी त्यातलं एकही छायाचित्र आपल्याला पावसाच्या सरींची प्रत्यक्ष अनुभूती देऊ शकत नाही. प्रेमाचंही असंच असतं. शब्दाच्या चिमटीत ते कधी पकडता येत नाही. जगातले सर्वाधिक सिनेमे, नाटकं आणि साहित्यही 'प्रेम' या भावनेभोवतीच गुंफलेलं आहे. पण तरीसुद्धा आजपर्यंत 'प्रेम म्हणजे काय?' हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. आजपर्यंत जगातल्या कोणत्याही कलावंताला प्रेम या भावनेची पूर्ण अभिव्यक्ती करणारी समर्थ कलाकृती निर्माण करता आलेली नाही.

       म्हणूनच, मला वाटतं की प्रेमाची प्रत्येक व्यक्तीची व्याख्या ही त्या-त्या व्यक्तीला आलेल्या प्रेमाच्या अनुभूतीवर आधारलेली असते आणि त्या व्यक्तीच्या अनुभूतीनुसार ती व्याख्या अगदी शंभर टक्के बरोबरही असते. प्रेमाचे सुखद क्षण जगणा-या आजच्या तरुण पिढीला पाहून काही संस्कृती रक्षकांचा स्वाभिमान जागा होतो. त्यांच्या मते हे प्रेम-बिम नसून केवळ आकर्षण असतं. प्रेम आणि आकर्षण या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न समजणा-या या मताशी मी पूर्णत: असहमत आहे. एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीचं हसणं, वागणं, बोलणं आपल्याला आवडतं. मग कालांतराने त्या आवडीचं प्रेमात रुपांतर होतं.

       हे सगळं खरं तर खूप नैसर्गिक आणि सहज घडत असतं. प्रेम या भावनेत शारीरिक आकर्षणाची एक मादक धुंदी असतेच आणि ती असण्यात तसं काहीच गैर नाही. माणसाचा जन्मच या आकर्षणाच्या उत्कट मिलनातून होतो. हे वास्तव आपण का नाकारतो? मला कळत नाही. या अविचारी, विसंगत दृष्टिकोनानेच खरं तर आज प्रेम या सहज आणि निसर्ग सुंदर भावनेचं पावित्र्य कमी करून टाकले आहे. याचा अर्थ प्रेम म्हणजे केवळ शरीरसुखाची अमर्याद ओढ असाही नाही. आजच्या पिढीतली बरीच तरुण मुलं-मुली आणि त्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा केवळ 'एक बार जो जाए, जवानी फिर ना आए' असाच दिसतो. प्रेम म्हणजे त्याग, समर्पण, सामंजस्य असं काही मानायला त्यांचं मन तयार नसतं. जमेल तितकं आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहणं हिच त्यांच्यासाठी त्यांनी ठरवलेली प्रेमाची व्याख्या त्यांच्यापुरतं जरी त्यांच्यासाठी हे नातं आनंदाचं असलं तरी भावनिक ओलावा नसल्याने समर्पणाच्या वाटेने वाहणा-या प्रेमाच्या नितळनिळ्या झ-याचा सुखद अनुभव त्यांना कधीच घेता येत नाही याची खंत वाटते.

       प्रेमाच्या या सा-या प्रवासात नकाराने किंवा इतर कोणत्याही कारणाने प्रेमात यशस्वी होऊ न शकलेल्या विफल ह्रदयांचा विचार मनाला सतत सतावत राहतो. या धक्क्याने आयुष्य संपवून घेना-या अनेक रोमिओ-ज्युलिएटच्या कहाण्या वृत्तपत्रातून वाचताना क्षणभर डोळे पाणावतात आणि मन म्हणतं, 'अरेरे! यांना प्रेमाचा खरा अर्थ कळलाच नाही.' खरंतर, प्रेम हे एखाद्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नसतंच मुळी! ते असतं प्रेम करतानाचे धुंद, गुलाबी क्षण जगण्यासाठी..! कधी चोरट्या आणाभाका, धावत्या भेटीगाठी, कधी जोडीदाराच्या मिठीतला ऊबदार स्पर्श तर कधी विरहातली आर्त हुरहुर...

       म्हणूनच, प्रेम लाभो अथवा न लाभो. ते करत राहणं हेच प्रत्येकाच्या हातात असतं. जोपर्यंत या प्रेमाचा अभिषेक तुमच्यावर होतो आहे, तोपर्यंत बेधुंद होऊन जगत राहा. कर्तव्याचं भान ठेवून आनंदाच्या सोनसरी झेलत राहा. नेहमीच तुम्हाला आवडणारे डोळे शोधत बसण्यापेक्षा कधीतरी तुम्हाला शोधणारे डोळेही आवडून घ्या. कुणावरतरी प्रेम करणं हे तर सुंदर आहेच. पण आपल्यावर कुणीतरी प्रेम करेल इतकं आयुष्य सुंदर करणं हे त्याहून अधिक सुंदर आहे..!



           शब्दस्पर्शी
   कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९




        त्या वळणावर



नागमोडी वळणाची ती वाट

असंख्य काट्यांची रास

कल्पनाच्या त्या वळणावर 

मनी वसे फुलांची आस


जबाबदारीचं ओझं पेलताना 

थकल्याचा होई भास

आयुष्याच्या त्या वळणावर

न मिळे जीवन श्वास


गर्दीच्या या दुनियेत

स्वप्नांची लागे आरास

चढाओढीच्या त्या वळणावर

सत्य होई नापास


फिरकू देऊ नये कधी

संबंधात स्वार्थाला आसपास

नात्यांच्या त्या वळणावर

नसावा कसला बायपास


मधूर रहावी साथसंगत

हिच असावी कास

ऋणानुबंधाच्या त्या वळणावर

नसावी फसगतीचा फास



           शब्दस्पर्शी
   कमळवेल्ली,यवतमाळ

भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.