शासनाने मंजुर केलेले कांदा अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, नसता आंदोलन छेडले जाईल! रविंद्र ढोबळे
-----------------------
आष्टी/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याचे भाव कमी झालेले होते. शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केलेला खर्च देखील त्यामध्ये मिळत नव्हता तसेच अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच खराब झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले होते. याची दखल घेत शासनाने प्रति क्विटल ३५० रु. शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाची घोषणा केलेली होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्याने बाजारकमीटीकडे या संदर्भात कागदपत्रे जमा केलेली आहेत. परंतु अद्याप शेतकऱ्यांना सदरील कांदा अनुदान प्राप्त झालेले नाही.
तहसिल कार्यालय आष्टी येथे दिलेल्या निवेदनात ते असे म्हटले की,सध्या आष्टी तालुक्यामध्ये काही भागात पाऊस झालेला नाही त्यामुळे पेरण्या देखील झालेल्या नाहीत. त्यामुळे खरीपाचे पिक आता शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. सध्या शेतकरी अर्थिक अडचणीत आहे.
तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ दिवसांच्या आत तात्काळ कांदा अनुदान जमा करावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी दिला आहे.


stay connected