फी वाढीविरोधात न्यू इंग्लिश शाळेविरोधात पालकांचे उपोषण
शुल्क नियमानुसारच घेतल्याचे शाळेचे म्हणणे
उल्हासनगर दि :- उल्हासनगर मधील न्यू इंग्लिश स्कुल आणि जुनियर कॉलेजने विद्यार्थ्यांच्या फी दरात वाढ केल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेताजी चौकात साखळी उपोषण सुरु करण्यात आले.
उल्हासनगर कॅम्प 4 येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश शाळेच्या व्यवस्थापणाने यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक शुल्कात अचानक चार हजार पासून १५ ते २० हजारपर्यंत शैक्षणिक शुल्कात वाढ केली. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.कोणतीही पूर्वसूचना न देता साडेचार हजारावरून पंधरा हजार रुपये फी वाढ केली. या प्रकाराने संतापलेल्या पालकांनी शाळेसमोर आपला रोष व्यक्त केला. मात्र शाळा प्रशासनाने पालकांच्या कोणत्याही विनंतीला दाद दिली नाही.
याबाबत शाळा व्यवस्थापन यांना भेटण्यासाठी आमदार गणपत गायकवाड व भाजपा पदाधिकारी यांच्यासह भाजपा शिष्टमंडळ शाळेवर धडकले असता महिला शिक्षिकेने आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत उध्दट भाषेत बोलून असभ्य वर्तन केले. यामुळे संतापलेल्या आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी शाळेच्या शिक्षिकेला चांगलेच धारेवर घरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.
या बाबत आमदार गणपत गायकवाड यांनी शाळेच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांच्याकडे केली आहे. शाळेच्या विरोधात शाळेसमोर भरपावसात भाजपाचे सुनील तांबेकर, भाजपा 4 मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे,बेटी पढाव बेटी बचाओ संयोजिका रेश्मा नवले, पीटर वर्गिस, महासचिव भाजपा परिमंडळ 4 भावेश टोळ, स्नेहल राणे, पिंकी सिंह यांच्यासमवेत अन्य कार्यकर्ते साखळी उपोषणास बसले आहेत.
या बाबत शाळेचे व्यवस्थापक प्रकाश गुरनानी यांनी पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यावर कसला ही दबाव टाकण्यात येत नाही. शाळेची फी नियमानुसार घेतली जात आहे. तरीही शाळाव्यवस्थापन आमदार गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे असे बोलताना त्यांनी सांगितले.


stay connected