लेडी सिंघम - शुभदा चव्हाण

आष्टीकरांचा अभिमान

लेडी सिंघम - शुभदा चव्हाण



 समाजात स्त्री ही पुरुषांपेक्षा दुर्बल, कमजोर अशीच ब-याचदा समजूत आहे. म्हणून तर स्त्रीला अबला म्हणून संबोधलं जातं. मात्र भावनिक अन् शारीरिक बाबतीत पाहिल तर स्त्री पुरुषापेक्षाही कणखर व सबळ आहे. हेच पोलिस दलात कार्यरत असलेल्या कड्याच्या रहिवासी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शुभदा प्रदीप चव्हाण यांनी दाखवून दिले. आजपर्यंत त्या असंख्य पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. विक्रोळी पोलिस ठाण्यांतर्गत फोफावलेल्या गुंडगिरीवर नियंत्रण मिळवून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य प्रत्यक्षात

आणून, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून परिचित झालेल्या ग्रामीण साहसी कन्येने आपल्या धडाकेबाज दबंग कामगिरीमुळे लेडी सिंघम म्हणूनच, महाराष्ट्राच्या राजधानीत नावलौकीक मिळविला आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील सर्वसामान्य कुटूंबातील मंदाकिनी साहेबराव घोगरे या लग्नानंतर शुभदा प्रदीप चव्हाण झाल्या आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन जिद्दीच्या बळावर सन १९९३ साली पोलिस दलात दाखल झाल्या. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. आठवी ते दहावी अमोलक जैन विद्यालयात झाले तर पदवीचे शिक्षण आष्टीच्या वाणिज्य महाविद्यालयात घेतले. कॉमर्स शाखेच्या त्या पदवीधर आहेत. तीस वषापुर्वी वडीलांचे छत्र हरपल्यानंतर आईसह सहा भावंडाचं शिक्षण अन् कौटुंबिक जबाबदारीचं ओझं अंगावर पडले. मात्र परिस्थितीसमोर न झुकता या धाडसी कन्येने मोठ्या धैयानें प्रसंगाला तोंड दिले. सन १९९० ला प्रथम पीएसआयची परिक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत दिली. पण निवड झाली नाही. परंतू अपयशाची खंत न बाळगता जिद्द सोडली नाही. पुन्हा दुस- याच वर्षी परिक्षा देऊन घवघवीत यश पटकावले. नासिक येथे पोलिस उपनिरिक्षकच्या ट्रेनिंगसाठी अखेर निवड झाली. त्यानंतर शुभदा चव्हाण यांना सनः १९९३ ला मुंबईत प्रथमच पोष्टींग मिळाली.

त्यानंतर एका ग्रामीण भागातील साहसी कन्येने मुंबई सारख्या बलाढ्य शहरात पोलिस दलातील सेवेला ख-या अथार्ने प्रारंभ केला. सध्या विक्रोळी ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. त्या पोलिस ठाण्यांतर्गत फोफावलेल्या गुंडगिरीवर धाडसी कारवाया करुन नियंत्रण मिळविले. मोठ-मोठ्या गुन्ह्यांची उकल केली. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा कर्दनकाळ, अशीच त्यांची





ओळख झाली. त्यामुळे पोलिस दलातील दबंग कामगिरीमुळे लेडी सिंघम म्हणून महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत नावलौकिक मिळविला. दरम्यानच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता कर्तव्यापासून सुतभर ढळल्या नाहीत. विविध क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असताना गुंडगिरी, कॉपीराईट, पब, बार, वेश्याव्यावसाय जुगार, मटका इत्यादी ठिकाणी छापे मारून अनेकांना गजाआड करुन किचकट गुन्ह्याची उकल केली. बहुतांश गुन्ह्यात आरोपींना शिक्षा लागली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे वाक्य त्यांच्याकरिता तंतोतंत जुळत आहे. कायद्याचं रक्षण करतानाच, पोलिस निरिक्षक शुभदा चव्हाण यांनी सामाजिक उपक्रम राबवले. अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करुन त्यांना वेश्याव्यवसायातून मुक्त केले. शैक्षणिक, सामाजिक प्रवाहात आणले. पति- पत्नींची घटस्पोट घेण्यापर्यंत न्यायालयात गेलेली प्रकरणे, विस्कटलेली संसाराची घडी नव्याने जुळवून अनेक दाम्पत्यांच्या रेशीमगाठी बांधण्याचं पुण्यकर्म करुन कर्तृत्वाचा ठसा उमटविला. पोलिस प्रशासनात कार्य करीत असताना आई - वडीलांच्या संस्काराची पाठीशी असलेली शिदोरी अन् पती अॅड प्रदीप यांची साथ मिळाली. मागील तीस वर्षे पोलिस दलात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पोलिस आयुक्त राकेश मारिया, उपआयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी मान्यवरांसह पत्रकार संघटनांकडून पंधरा ते वीस पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आल्याचे शुभदा चव्हाण यांनी सांगीतले. समाजात बुरसटलेल्या पुरुषी संस्कृतिला तडा देत चार भिंतीत वावरणा-या खाकीतल्या लेडी सिंघमने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आकाशाला गवसणी घातली. त्यामुळे संघर्षाच्या गाथेत परिस्थितीवर मात करणा-या वर्दीतल्या शुभदाचा प्रवास हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. 

- शुभम तांगडे / कडा


मुलींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे !


संघर्ष केल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी निश्चित ध्येय ठरवून मुलींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. कारण संघर्ष हाच प्रत्येकाचा यशाचा मार्ग ठरत असतो.
- शुभदा चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, विक्रोळी मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.