आम्हालाही शिकायचंय:कोण शिकवणार?

 आम्हालाही शिकायचंय:कोण शिकवणार?


          वय वर्ष सहा ते चौदा. अचानक मी त्या मुलांना पाहिलं. काहींचे वडील मरण पावले होते अकाली. काहींच्या वडीलांचा पत्ताच नव्हता. त्यांना आई होती. त्या बहुतेक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या. भीक मागत होती ती मुलं. तीनचार भाऊबहीण होते. काहि बहिणींच्या कडेवर लहानसं बाळ. अस्ताव्यस्त केस होते. कपडे मळकट होते. नजर आशेची होती. 

           मी गाडीनं चाललो होतो. अचानक ती मुलगी माझ्यासमोर आली. तिनं हात पसरला व म्हणाली, 

            ''एक दोन रुपये द्या ना. भूक फार लागली आहे.''

             ते शब्द........ते शब्द कुणालाही दया आणणारे होते. कुतूहलानं मी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व म्हटलं, 

           "मी देणार पैसे. एकदोन नाही जास्त देणार. परंतू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल काय?"

            "आम्हाला वेळ नाही."

            तो त्यांचा प्रश्न...... तो त्यांचा प्रश्न. त्या प्रश्नावर उत्तर देत मी म्हटलं,

            "मी तुम्हा सर्वांना जेवणही देणार. परंतू माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या."

            "विचारा. तुमचा प्रश्न विचारा. परंतू लवकर विचारा."

            ती मोठी मुलगी. ती मुलगी म्हणाली. तसा मी भराभर माझे प्रश्न विचारु लागलो व तिही मला भराभर आपली उत्तरं देवू लागली. माझे प्रश्न होते. 

            "तुम्ही भीक का बरं मागता?"

             "काय करणार. उपाय नाय."

             "का बरं?"

             "आमचं पोट भरत नाय."

             "का बरं? वडील काय करतात?"

             "..........." तसं विचारताच ती मुलगी इकडं तिकडं पाहू लागली. बहुतेक तिला वडील म्हटलेलं समजलं नसावं. तसं समजून मीच म्हटलं,

           "तुमचा बाप काय करतो?"

            तो माझा प्रश्न. तसं तिनं डोळ्यातून अश्रू काढले. तसा मी म्हणालो,

            "काय झालं?"

             "काय नाय." ती मुलगी अश्रू पुसत म्हणाली. 

            "आम्हाला बाप नाय."

             तिचं ते उत्तर. मला अतिशय वाईट वाटत होतं. तसा मी तरी काय करणार होतो त्यांच्यासाठी. फक्त प्रश्नच विचारु शकत होतो. बाकी काही नाही. त्यात त्या मुलीचा दोष नव्हता. तसा मी पुन्हा प्रश्न विचारला.

          "किती भाऊबहीण आहात?"

         "पाच. पाच भाऊबहीण."

          माझा प्रश्न. तसं तिचं उत्तर ऐकून सुन्नं वाटलं. पाच. पाच भाऊबहीण. तसं ऐकताच सुन्न वाटणारच. कारण त्यांची आई काही तेवढी मोठी वाटत नव्हती. ती अगदी लहानच वाटत होती. बहुतेक तो बालविवाह असावा. तसा मी पुन्हा एक प्रश्न विचारला, 

          "किती बहिणी अन् किती भाऊ?"

             "आम्ही बहिणी चार. हा मा भाऊ शेवटचा."

            ती लहान मुलं. अगदी माझ्या प्रश्नांचं उत्तर निर्भीयतेनं देत होती. तसे मी त्या मुलीवर दया दाखवून शंभर रुपये दिले व शेवटचा प्रश्न विचारला, 

           "बेटा, शाळेत जाता काय?"

           "नाय."

           "का बरं?"

           "आई,  शिकवत नाय. कोण शिकवणार?"

           "तुमची शिकायची इच्छा आहे का?"

           "होय."

            तो माझा शेवटचा प्रश्न. त्यातच त्या मुलीचं उत्तर. आम्हालाही शिकायचंय. परंतू आई शिकवत नाही आणि ती आई तरी कशी शिकवणार. तिच्यावरच भीक मागण्याची वेळ. ती साधं आपल्या बाळांना जेवनच पुरवू शकत नाही. मग शिक्षण दूरच.

           ती मुलगी शिकू शकत नव्हती. ना तिचे भाऊबहीण. त्यात त्या मुलांचा दोष नव्हता. दोष होता तो त्यांच्या मायबापाचा. परंतू ते तरी काय करणार. त्यात दोष त्यांचाही नव्हता तर दोष होता त्यांच्यातील शिक्षणाचा. कारण ते शिकलेले नव्हते. त्यामुळंच गरज लक्षात न घेता त्या मायबापानं एवढी मुलं जन्मास घातली होती. मी तिला पैसे दिले व निघून गेलो. परंतू माझ्या मनात ते प्रश्न तसेच बोलके राहिले. त्याची उत्तरं मलाही कधीकधी सुन्न करुन सोडतात. 

           मी पैसे दिले त्या मुलीला. ती माझी चूकच होती. कारण असे पैसे दिल्यानं मुलांना सवय पडते. त्यातच मायबापांनाही वाटते की आम्ही कितीही मुलं पैदा केले तरी आमचं काही कमी होत नाही. आमचं व आमच्या मुलांचं पोट भरतं. म्हणून अशी कुटूंब अनेक मुलं जन्मास घालत असतात. 

           आज विचार येतो की भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्ष झालीत. परंतू ख-या अर्थानं देशाचा विकास झाला काय  तर याचं उत्तर नाही असंच येतं. आज भारत विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. देश अवकाशातच नाही तर मंगळावरही पोहोचला आहे. सरकार म्हणतं की देशात गरीबी नाही. कशी दिसणार. कारण ज्यावेळेस सरकारचे देशपातळीवरील नेते जिल्हास्तरावर भेटीस येतात. तेव्हा स्थानिक नेते तेथील रस्ते सुशोभीत करतात. तसेच इतरही देश म्हणतात की भारत एक विकसीत देश असून सुसंपन्न देश आहे आणि तेही म्हणणारच. कारण ज्यावेळेस ते येतात. तेव्हा याच देशातील सामान्य प्रशासन विभागाद्वारे रस्ते सुशोभीकरण केलं जातं. नालेही कापडानं झाकली जातात. तशाच भिंतीही रंगवल्या जातात. 

           महत्वाचं सांगायचं म्हणजे आजही आपल्या देशाला जगात सुसंपन्न समजलं जातं. परंतू या देशातील सामान्य लोकांकडे पाहिल्यास ख-या स्वरुपात देश सुसंपन्न दिसतो काय? याचं उत्तर नाही असंच येईल. कारण देशात आजही विश्वकोटीचं दारिद्र्य आहे. परंतू दारिद्र्य का आहे याचा विचार आपण करीत नाही. आपल्याला माहीत आहे की देश स्वतंत्र झाला व कायदे बनले. देश कायद्यानुसार चालतो. परंतू खरंच जे कायद्यानुसार चालत नाहीत. त्यांच्यावर आजही देशातील प्रशासन विभागाचे लक्ष आहे कायदेशीर? याचेही उत्तर नाही. आज देशात विश्वकोटीचे दारिद्र्य तर आहेच, व्यतिरीक्त शिक्षणाचा अभावही आहे. आज याच शिक्षणाच्या अभावानं काही काही परिवारात विवाह होतो तो बालवयातच आणि मुलंही जन्मास घातली जातात बालवयातच. किती मुलं जन्मास घालावी याची मर्यादा पण नाही. तसं पाहता आजही काही काही कुटूंबात मुलगी नकोच म्हणतात. मुलाच्या जन्मासाठी अनेक मुली जन्मास घातल्या जातात. काही काही परिवारात तर मुलांचा जन्म होवूनही मुलं जन्मास घातली जातात. काही काही महाभाग तर दोष धर्माला देत म्हणतात की मुस्लिम लोकं मुलांना अल्लाची देण मानून मुलं जन्मास घालतात. कुटुंबनियोजन करीत नाहीत. परंतू जे बोलतात त्यांना कळत नाही की आपली चार बोटंही आपल्याकडंच आहेत. आज मुस्लिम समुदाय जरी मुलांना अल्लाची देण समजत असले तरी बरीचसे मुस्लिम लोकं आज सुधारले आहेत. तेही कुटूंब नियोजन मानतात. परंतू जे त्यांना दोष देतात. त्यांच्या धर्मातही आज काय दिसते? आजही त्यांच्या समाजात कुटूंब नियोजनाचा अभाव दिसतो. आजही बालवयातच बालविवाह होतो. अशी बालविवाह करणारी बरीचशी कुटूंबं आहेत. अन् अशी बरीचशी कुटूंबं देशात आहेत की जी कुटूंब नियोजन न करता अनेक मुलं जन्मास घालतात. त्यांना कुटूंब नियोजन समजावून सांगीतलं तर म्हणतात की ती आमची मुलं. आम्हाला पोसायचा नेट नाही लागत. मग तुम्हाला का वाटावू असं. बरोबर आहे त्यांचं. परंतू देशाला त्यांची मुलं पोसायचा नेट लागतो. ते कोण समजून घेणार? त्यातच मुलं तर आजही एवढी जन्मास घातली जातात की एकाला चड्डी मिळत असते घालायला आणि दुस-याला बनियान. लहान मुलं तर नग्नच असतात बाराही महिने. 

          अशी मुलं........त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचं झाल्यास त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं जातं. ते प्यायल्यावर गुरगुरणार. परंतू ते दूध प्राशन करतील तेव्हा ना. कारण बरीचशी अशी कुटूंब देशात आहेत की त्यांचं पिढीजात तेच ते पिढीजात जगणं सुरु आहे. बालविवाह, मुलं जास्तीत जास्त पैदा करणं. त्यांना भीक मागायला लावणं. त्यातूनच कसंतरी जगवणं. शिक्षण अजिबात न शिकवणं. मुली पैदा होत असल्यास भ्रृणहत्या करणं. मुलांच्या जन्माचा उत्सव मानणं. मग लोकसंख्या वाढो वा काहीही होवो. त्यांना यात काहीही घेणंदेणं नाही. कारण त्यांना काहीच फरक पडत नाही. 

          त्यांची विचारशक्तीच मरण पावलेली असते. त्यांच्या जीवनात मुलांना कसं पोसावं? कसं वाढवावं? शिक्षण शिकवावं की नाही? या गोष्टीचं काही महत्व नाही. फक्त मुलं जन्मास घालणं एवढंच जाणतात ते. संस्कार अजिबात नाही त्यांच्या जीवनात. मग एक मुलगा मेला काय अन् जीवंत राहिला काय? याचंही महत्व नाही त्यांच्या जीवनात. समजा प्रकृती बिघडलीच तर ते दवाखान्यात जात नाहीत. ते त्या भोंदू वैद्यूकडं जातात. तो तात्पुरती जडीबुटी देतो. त्यावर काही किरकोळ आजार बरे होतात. परंतू काही आजार गंभीर स्वरुपाचे असतात. ते बरे होत नाही व प्रसंगी त्यात ते मरण पावतात. अगदी अकालीच मरण पावतात काही काही लोकं. तसंच ते अनेक मुलं जन्मास घालत असल्यानं आपल्या मागे मरणानंतर अनेक सोडतात. जे नाईलाजास्तव रस्त्यारस्त्यावर भीक मागून कसेतरी जगतात. त्यांच्यातही शिक्षणाचा अभाव असल्यानं तेही पुढं तसंच अल्पवयात विवाह करुन मोकळे होतात.

            मुलं जन्मास घालणं ठीक आहे. प्रत्येकानं मुलं जन्मास घालावी. तो त्यांचा प्रदत्त अधिकार आहे. परंतू त्यात काही मर्यादा आहे की नाही. मुलं तरुणपण आहे तेव्हापर्यंत अमर्याद जन्मास घातली जावू शकतात.  परंतू त्यासाठी देशाचा विचार व्हावा की नाही. कारण आज देशाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामानानं राहण्यासाठी लागणारी जमीन कमी आहे. अन्नधान्य आहे. परंतू ते तेवढंच कमी आहे. त्यामुळंच लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करुन लोकांचे पोट पालवत असतांना वा त्या लोकांसाठी सर्वच प्रकारच्या सोई करीत असतांना देशाला कित्येक कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागतं. याचाही विचार होणं गरजेचं आहे. शिवाय त्या लोकांच्या शिक्षणाच्या सोई. त्या इवल्या इवल्या बाळांची मनं. तेही जाणणं गरजेचं आहे. त्यांनाही वाटतं की आम्हालाही शिकता यावं. परंतू शिकवणार कोण? त्यातच काहींचे मायबाप अंधश्रद्धेनं मरतात. अनेक जन्मास घातलेली मुलं मागे सोडून. ती डॉक्टरकडे न गेल्यानं व भोंदूकडं गेल्यानं मरण पावतात.  ते जाणारही कसे? कारण डॉक्टरकडे जायला पैसे लागतात. 

          महत्वाचं म्हणजे यावर आजच उपाय करण्याची गरज आहे. तो उपाय म्हणजे अशा अनेक मुलं जन्मास घालणा-या लोकांचे सर्वेक्षण व्हावे. त्यांना सरकारनं शेट्टी होममध्ये टाकावे. त्यांना शिक्षण द्यावे. ते शिक्षण निःशुल्क असावे. तसंच जे अनेक मुलं जन्मास घालतात. त्यांना देशातील कोणत्याही सोईसुविधा देवूच नये. कारण त्यांच्यासाठी सोईसुविधा करण्यासाठी व्यवस्था करीत असतांना त्या सुविधेचा बोझा देशावरच पडतो. 

           विशेष सांगायचं म्हणजे देशात कुटूंब नियोजनाची प्रक्रिया  जबरदस्तीनं राबवावी. कुटूंब नियोजन एक किंवा दोनवरच जबरदस्तीनं करावं. तिसरं अपत्य झाल्यास कोणत्याच सुविधा देवू नये. सुविधा नाकाराव्यात. मग ते उपाशी मेले तरी चालेल. सरकारही याबाबत कठोर बनावं. केवळ मतदान मिळतं हा उद्देश ठेवू नये. देशहिताचा विचार व्हावा. तसंच अशी जर मुलं भीक मागत असली तरी त्यांना कोणीही भीक देवू नये. तरंच ती मंडळी सुधारतील. जेणेकरून मुलं जन्माला घालणार नाहीत. 


           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.