आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्या ! बिबट्याचा ट्रॅक्टर वर हल्ल्याचा प्रयत्न !

 आष्टी तालुक्यात पुन्हा बिबट्या !
बिबट्याचा ट्रॅक्टर वर हल्ल्याचा प्रयत्न !


तेजवार्ता न्यूज नेटवर्क - 

आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या चे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .शनीवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शेतात ट्रॅक्टरने मशागत करत असताना ट्रॅक्टरच्या उजेडात समोर बिबट्या उभा असल्याचे चालकाच्या लक्षात आले . क्षणार्धात झाडावरून उडी घेऊन तो बिबट्या ट्रॅक्टरकडे धावला, बिबट्याच्या रूपात चक्क मृत्यू समोर दिसल्याने पाच मिनिटे जीव मुठीत धरून प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरसह साथीदाराला घेऊन धूम ठोकल्याने बिबट्याच्या तावडीतून ते दोघे बचावले. ही घटना हिवरा येथील लगडवस्ती येथे घडली.



आष्टी तालुक्यातील हिवरा येथील लगड वस्तीवरील अविनाश लगड हा शेतातील मशागतीसाठी ट्रॅक्टरसह साथीदार श्रीकांत लगड याला घेऊन शनिवारी रात्री गेले. श्रीकांत शेतात मोकळ्या हवेत झोपला होता. अविनाश ट्रॅक्टरने काम करत असताना रात्री साडेबाराच्या दरम्यान उजेडात समोर बिबट्या उभा होता. त्याला पाहताच अंगाचा थरकाप उडाला. बिबट्याने ट्रॅक्टरकडे धाव घेत चालू ट्रॅक्टरवर हल्ला चढवला. पाच मिनिटे हा खेळ सुरू होता. थोड्या अंतरावर बिबट्या जाताच शेजारी झोपलेल्या साथीदाराला ओढत ट्रॅक्टरमध्ये बसवून त्यांनी धूम ठोकली. तरीदेखील दोनशे फूट अंतरापर्यंत बिबट्याने पाठलाग केला. समोर मरण उभे असतानादेखील जिवाची बाजी लावली. 




दोन महिन्यांपूर्वीही कारखेल येथे तरुणावर हल्ला


कारखेल बुद्रुक येथील राम बबन गायकवाड हा तरुण शौचास गेला असता त्याच्यावर देखील हल्ला चढवला होता. यात तो तरुण जखमी झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती.

याबाबत आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ म्हणाले की. बिबट्या नजरेस पडला तर खोडसाळपणा करू नये, तो स्वतःहून हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाही. खोड काढली तरच तो हल्ला शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

समोर बिबट्या दिसत असताना काळजाचे पाणी झालेले असताना प्रसंगावधान राखल्याने आम्ही वाचलो. नसता बिबट्याच्या हल्ल्यात आम्हा दोघा मित्रांचा जीव गेला असता, असे अविनाश लगड यांनी सांगितले. 

रविवारी सायंकाळी वन विभागाच्या पथकाने लगड वस्ती परिसरात जाऊन पाहणी केली असता हा मादी बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे . रात्री अपरात्री शेतातील कामे टाळावीत किंवा सतर्क राहुन करावी असे आवाहन त्यांनी केले आहे . या  प्रकारामुळे हिवरा ,देवळा ,भोजेवाडी , डोंगरगण , दादेगाव , परिसरातील शेतकऱ्यां मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे .



 तेजवार्ता प्रतिनिधी महादेव वामन सह शेख हमजान धानोरा / आष्टी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.