महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक

 महात्मा फुले बहुजन संस्कृतीचे जनक 

**************************



11 एप्रिल 1827 रोजी महापुरुष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कडगून या गावचा,बालपणीच वयाच्या 13 व्या वर्षीच सावित्रीमाई शी त्यांचा विवाह झाला व त्यानंतरच खऱ्या अर्थाने पुणे येथे त्यांच्या सामाजिक जीवनास सुरुवात झाली.

सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्यजनक व आधुनिक भारताच्या क्रांतिकारातील पाहिले आद्य क्रांतिकारक,एक युगपुरुष, समाजाला दिशा देणारा,शूद्र अतिशूद्र यांना संघटित करणारा, समता व शिक्षण हा विचार सामान्य लोकात पेरणारा एक महान समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले होय.

ज्योतिबा फुले यांचा त्याग व समाजसेवेचा विचार करून अखिल समाजाने त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली.महात्मा गांधीनी खरा महात्मा असा उल्लेख ज्यांचा केला,सामाजिक क्रांतिकारक म्हणून स्वातंत्रवीर सावरकर यांनी त्यांना संबोधले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आपल्या गुरू स्थानी मानले.

ज्योतीबा फुले हे जातीयवादचे,गुलामगिरीचे व असमतेचे मूळ कारण अविद्या अर्थात ज्ञानाचा आभाव आहे असे म्हणत,बहुजन समाजला या सर्वातून बाहेर काढायचे असेल तर शिक्षण शिवाय तरणोपाय नाही असे त्यांचे मत होते.त्यादृष्टीने घरातील प्रत्येक स्त्री आधी शिकली पाहिजे कारण स्त्री शिकली तरच समाज सुधारणेला वेग येईल त्यामुळे त्यांनी त्याकाळी समाजाचा प्रचंड विरोध पत्करून 1848 साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली दिन दलितांसाठी महार मांग शिक्षण बोर्ड पुण्यात सुरू केले आज ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले असा तो महान ज्ञानदाता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले अस म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही.

क्रांतीची सुरुवातच त्यांनी आधी स्वतःच्या घरातून केली व स्त्री जातीचा खरा उद्धार करण्याचे काम त्यांनी सुरू केले आपल्या अशिक्षित पत्नीला स्वतः शिक्षित करून पहिली मुलींच्या शाळेतील शिक्षिका म्हणून नेमणूक दिली.

1864 साली पुण्यात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला एका गरीब ब्राम्हण विधवा महिलेचा मुलगा यशवंत हा दत्तक घेतला व त्यालाच आपल्या कुटुंबाचे उत्तराधिकारी नेमले.

आजपर्यंत चा इतिहास पहिला तर ज्या ज्या  माणसाने देवाचे पाय धरले ते देवदासी झाले,ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले,ज्यांनी पांडुरंगाचे पाय धरले ते वारकरी झाले व आज या मातीमध्ये ज्यांनी ज्यांनी महात्मा फुले व सावित्रीमाई ने सांगितलेल्या शिक्षणाची ,ज्ञानाची कास धरली ते ग्रामपंचत च्या सरपंचापासून  राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले.

1863 साली पुण्यात त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली,रात्रशाळेची सुरुवात केली,1882 साली ब्रिटिश सरकारने नेमलेल्या विल्यम हंटर कमिशन समोर भविष्यातील शिक्षण व्यवस्थेत काय सुधारणा असाव्यात हे मोठया प्रभावीपणे मांडले.

रायगडा वरील काट्या कुपट्यात गुडूप झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून या बहुजनाच्या राजाला व त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे,समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करून पहिली शिवजयंती साजरी करणारे महान व्यक्ती ज्योतीबा फुले हेच होते.

शिवाजी महाराजांचा खरा समतावादी विचार समाज मनात रुजविण्याचे महान कार्य याच महात्म्याने केले शिवाजी महाराजांची महती सांगनारा एक हजार ओळींचा पहिला पोवाडा त्यांनी रचला व अठरा पगड जातींचे व शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या शिवाजी या राजाला कुळवाडी भूषण राजा ही बिरुदावली देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला महात्मा फुले नसते तर शिवाजी महाराज व त्यांचे महान कार्य आज आपल्याला कळलेच नसते ह्या गोष्टीची नोंद  पुढील येणाऱ्या पिढीसाठी सर्वाना कायम ठेवावीच लागेल.

1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रत सामाजिक क्रांतीचे वारे निर्माण केले  समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी सुक्ष्म अभ्यास करून त्याचे यथायोग्य अवलोकन करून त्याच्यातील सुधारणा विषयी आपले परखड मत मांडले प्रसंगी तुच्छ समजल्या गेलेल्या दिन दलित लोकांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद मोकळा करून दिला पुण्यातील खडकवासला धरण सुद्धा महात्मा फुले यांनीच बांधलेले आहे.

त्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी या पुस्तकातून त्याकाळी उचवर्णीय लोकांकडून दिन दलित लोकांवर केले जाणारे अत्याचार हीन वागणूक समाजापुढे व ब्रिटिश सरकार समोर मांडली. दारूचे दुकान बंद करण्यासाठी मोठे आंदोलनं त्यांनी केली.

महात्मा फुले यांनी कधी ही कुठल्या ब्राह्मण व्यक्तीला विरोध केला नाही,त्यांचा खरा विरोध ब्रह्मण्यवाद,मनुस्मृती विचार सरणीला होता त्याच्यातील कर्मकांडाला होता.विषमता,

जातीभेद या धर्मज्ञा नाहीत त्या एक समाजात कुप्रथा,अंधश्रद्धा आहेत असे त्यांचे ठाम मत होते.प्रत्येक धर्मातील ईश्वराच्या संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी खरा ईश्वर हा एकच आहे,त्याची प्रत्येकाने आराधना प्रार्थना केली पाहिजे,देवाला भेटायला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही हा खरा विचार त्यांनी समाजाला दिला.मोठ्या संख्येने बहुजन असलेला 

शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे शेतकरी टिकला तरच हा देश व या देशाची अर्थव्यवस्था टिकेल हे मर्म ओळखून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम त्याकाळी केले शेतकर्यांच्या हलाखीच्या परिस्थिती चे सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केले त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी उद्धबोधन तसेच प्रसंगी आंदोलने केली शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न तळमळीने ब्रिटिश सरकारपुढे मांडले त्यांनी आपल्या शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या व्यथा व करावयाच्या सुधारणा लिखित स्वरूपात पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या सामाजिक आशयावरचे अनेक पोवाडे, नाटक,अनेक ग्रंथ पुस्तक,खरे शिवचरित्र त्यांनी लिखित स्वरूपात समाजापुढे सादर केले त्यांचे हे साहित्य आज ही आपल्या सगळ्यासाठी प्रेरणास्त्रोत  ठरत आहे.महात्मा फुले हेच खऱ्या अर्थाने बहुजन संस्कृतीचे जनक होते 

महात्मा फुले यांनी आपले शेवटचे समाजासाठी आदर्श असणारे पुस्तक सार्वजनिक सत्य धर्म लिहीत असताना तर त्यांना अर्धांगवायू चा झटका आला होता तरी समाजाला प्रबोधन करणारे हे पुस्तक त्यांनी त्याही परिस्थितीत लिहून पूर्ण केले व खरा सार्वजनिक सत्य धर्म काय आहे हा समाजापुढे मांडला तो लिखित ठेवा आज च्या आधुनिक युगातील समाज वर्गासाठी तर खूपच उपयोगी आहे.

आपले संपूर्ण जीवनच समाजसेवेसाठी समर्पित करून असंख्य समाजहिताची कामे केली व समाज सुधारणेचा हा झेंडा महात्मा फुले यांनी सर्वदूर फडकवला त्यांच्या या महान कार्यामुळे " असा महात्मा होणे नाही" हे ही तितकेच खरे आहे.

आपल्या महत कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या विचारांना व जीवन कार्याला कोटी कोटी नमन व विनम्र अभिवादन...!!


लेखक-

प्रा.महेश कुंडलिक चौरे,

आष्टी.

मो.9423471324











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.