*मानवतेचे पूजारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले*

 *मानवतेचे पूजारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले*

 



     मानवाचे धर्म नसावे अनेक |                

     निर्मिक तो एक जोती म्हणे ||

 

        अशी विषमता निर्मूलनाची शिकवण देणारे मानवतावादी तत्त्वज्ञानाची पायाभरणी करणारे अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी करणारे  स्री शूद्रांना ज्ञानाची म्हणजेच शिक्षणाची ज्ञानगंगा उपलब्ध करून देणारे, शिक्षणतज्ज्ञ आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्ताने कृतज्ञतापूर्वक  अभिवादन🙏 क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला पुणे येथे गोविंदराव व चिमणाबाई या दांम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ गाव कटगुण होय. मूळ आडनाव गोऱ्हे होते. परंतु त्यांचे पूर्वज पेशवाईच्या कालखंडात फुलांचा व्यवसाय करत होते म्हणून गोऱ्हेचे फुले झाले. पेशव्याने त्यांच्या पूर्वजांच्या कामावर खूश होऊन स्वारगेट येथील जमीन त्यांना बक्षीस म्हणून दिली. ज्योतिबा फुले 9 ते 10 महिन्याचे असतानाच त्यांच्या आई चिमणाबाईंचे निधन झाले त्यांच्या सगुणा आत्या क्षीरसागर या बालविधवा असलेल्या मावस आत्याने ज्योतिबा व राजाराम या बंधूंचा सांभाळ केला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याबरोबर इसवी सन 1840 मध्ये ज्योतिबांचा विवाह झाला.विवाहाच्या वेळी जोतिबांचे वय होते तेरा वर्ष आणि सावित्रीबाईंचे वय होते नऊ वर्ष. पुढील काळात या धगधगत्या प्रवाहाने विषमतारूपी बांध उध्वस्त केला.उभ्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षासाठी ज्ञान, न्याय ,बंधुता, स्वातंत्र्य, समता, नीतिमत्ता ,मानवतावादी महास्रोत जन्माला घातला.

            एके दिवशी ज्योतिबा संतापलेल्या अवस्थेत विचारक्रांत होऊन घरी परतले.मनातील खदखदत्या लाव्हारसला त्यांनी वाट मोकळी करून दिली. सावित्रीबाई मनातल्या मनात खूप घाबरल्या .सनातन्यांच्या कर्मठपणाचा त्यांना खूप राग आला. ज्यांच्या  मनात करुणा, ममता, समता नाही ते कसले भूदेव? इतरांचा सामाजिक दर्जा ठरविणारे हे कोण ?कोणी दिला त्यांना हा अधिकार ?असे  तीक्ष्ण बाण त्यांच्या मुखातून निघत होते. संतापाला कारण असे घडले होते की ,एका उच्चवर्णीय मित्राच्या निमंत्रणावरून ज्योतिराव लग्नाच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. इतरांनबरोबर तेही चालत होते. ज्योतिबांचे हे बरोबर  चालणे सहन न होऊन काही कर्मठांनी त्यांचा अपमान केला. हा मिरवणुकीमध्ये सामील झालाच कसा? असा त्यांचा सवाल होता.वास्तविक ज्योतिबा त्यांच्या मित्राच्या निमंत्रणावरून वरातीमध्ये सामील झाले होते. हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. हिंदू धर्मातील भेदभाव हा  एक सामाजिक रोग आहे, स्री शूद्रांना ज्ञानी करणे ,गुलामगिरीतून त्यांची सुटका करणे हा सामाजिक रोगावर उपाय आहे हे ज्योतिबांनी ओळखले.दलित पीडित दीनदुबळ्या समाज बांधवांच्या सर्वांगीण मुक्तीसाठी आपले सर्व जीवन बलिदान करण्याचा त्यांनी वसा घेतला .या पवित्र कार्यासाठी आपली पत्नी सावित्रीबाईंची साथ मागितली .अनेक हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास ज्योतिबांनी वाचन ,मनन ,चिंतनातून केला .

थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथातील विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .स्री शूद्रांना शिक्षण देण्याचा त्यांनी विडा उचलला .ज्या अज्ञानापायी सर्व शूद्र खचले ते अज्ञान घालवण्यासाठी त्यांना विद्येतून सदविवेकबुद्धी दिली पाहिजे शाळा काढल्या पाहिजे या निष्कर्षापर्यंत फुले दांपत्य व त्यांचे सहकारी पोहोचले. अहमदनगरला मिसेस फॅरार या ख्रिश्चन मिशनरी शाळा चालवत होत्या. त्यांना भेटून ज्योतिबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व माहिती मिळवली यावर मिसेस फॅरार म्हणाल्या की "स्री ही घराची मध्य आहे ,ती शिक्षित झाली की, घर आपोआप वर येणार ,तुम्ही तर तुमच्या बायकांना सुद्धा शिकवत नाही हे फार वाईट आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून करा त्या तुमच्या कार्याच्या थोड्या सुद्धा आड येणार नाहीत, तर तुमच्या कार्याच्या वाटेकरी होतील" हे शब्द ज्योतिबांच्या डोक्यात सारखे घुमत होते. परत आल्यानंतर दुपारच्या वेळेला ज्योतिबा शेतात जात दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मातीच्या धूळपाटीवर सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत. अंकगणितासाठी शेतातील कापसाची बोंडे ,भुईमुगाच्या शेंगा, जांभळाच्या बिया यांचा वापर करीत. सावित्रीबाई हळूहळू वाचन, लेखन, अंकगणित शिकल्या .सावित्रीबाईंना  शिक्षिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी अहमदनगर येथे अमेरिकन ख्रिश्चन मिशन या संस्थेत 1849 ते 1851 या दोन वर्षासाठी जोतिबांनी पाठवले.तोपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये एकाही स्त्रीने शिक्षिका म्हणून काम केल्याची कुठेही नोंद नव्हती. म्हणून सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत.

          इकडे ज्योतिबांचे इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यामुळे गोविंद रावांना खूप आनंद झाला. आपल्या मुलाने इतरांसारखे गलेलठ्ठ पगाराची सरकारी नोकरी करावी असे त्यांना वाटत होते. खरंच ज्योतिबांनी जर नोकरी केली असती तर ,समकालीन अधिकाऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना लुबाडून त्यांनी आपले घर भरले असते.  त्यांच्या पुढील सात पिढ्यांची सोय झाली असती .परंतु ज्योतिबा व सावित्री हे वैयक्तिक सुखाच्या मागे न लागता संसार सुखासाठी झटले ते दुसऱ्यांच्या स्री शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला नसता तर हजारो गोरगरिबांची घरे केव्हाच धुळीला  मिळाली असती. ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात एका खोलीत वयाच्या 21 व्या वर्षी  1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू केली. सनातन्यांना आपलाच चार हजार वर्षापासून धर्माच्या नावाने चाललेला भ्रष्टाचार स्त्री शिक्षणामुळे उघडकिस येण्याची भीती वाटू लागली .स्त्रियांना विद्येचे अधिकार नाहीत असे त्यांचे धर्मशास्त्रीय मत होते. 'विद्या शूद्राघरी चालली' असे ते ओरडू लागले. त्यांनी जोतिबा फुले यांनी चालवलेल्या या कार्याला कडाडून विरोध केला.

          सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून उंबरठ्याच्या बाहेर पडल्या तेव्हा शेकडो वर्षानंतर भारतीय स्त्रीचा सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला. एका नव्या युगाचा आरंभ झाला .तत्कालीन सनातन्यांनी त्यांचा खूप छळ केला पण 

तुका म्हणे पतिव्रतेचा भाव|

नवरा हाच तिचा देव ||

 या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे ज्योतिबांच्या ध्येयातच आपले जीवन ध्येय पाहिले. चार हजार वर्षापासून नसानसात भिनलेली ही गुलामगिरी या क्रांती नायिकेने भिंती फोडून ,बंधने तोडून ,दहशत झुगारून मोहमायेचे पाश तोडून उंबरठा ओलांडला, आणि समस्त स्री जातीला एक सुटकेचा श्वास कायमस्वरूपी मिळून दिला. एकापाठोपाठ एक अशा जवळपास 18 शाळा फुले दांम्पत्याने काढल्या.


विद्ये विना मती गेली,

 मतीविना नीती गेली ,

नीतीविना गती गेली,

 गतीविना वित्त गेले ,

वित्ताविना शूद्र खचले  ,

 एवढे अनर्थ एका अविद्येने केले.

        विद्या ग्रहण केल्याशिवाय समाज ज्ञानी होऊ शकत नाही. अशी ज्योतिबांची विचारधारा होती. धनंजय कीर यांच्या महात्मा ज्योतिराव फुले या पुस्तकात असा उल्लेख आला आहे की,29 मे 1852 च्या अंकात पुना ऑब्झर्वर वृत्तपत्र म्हणते की, 'आपल्या देशाची प्रगती व्हावी असे ज्यांना वाटते त्यांना एका दानशूर वृत्तीच्या मानी गृहस्थाने पदरमोड करून पुन्हा पुण्याच्या वेताळ पेठेत महार मांग आणि कुणबी यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी शाळा घातली आहे.हे ऐकून समाधान वाटेल.या शाळेत मुलांची संख्या बरीच आहे आणि शाळेत जास्त सोयी करण्यात आलेल्या आहेत त्या पाहता आम्ही अशी आशा करतो की या शाळेच्या संस्थापनेमुळे त्या जातींना बराच लाभ होईल. आम्हाला असे कळते की ,या मुलींच्या शाळा चालविणाऱ्या कार्यकारी मंडळांने शिक्षा मंडळींकडे ह्या शाळा चालविण्यात मासिक साहाय्य मिळावे म्हणून अर्ज केला आहे. आम्हास असा विश्वास वाटतो की, मेजर कॅन्डी आणि दक्षिणा पारितोषिक समिती आपल्या निधीतून या शाळांसाठी वार्षिक अनुदान देण्याचा विचार करत आहे.' दक्षिणा प्राईज समितीकडून शाळांना 75 रुपयांचे अनुदान मिळू लागले. 1852 ला शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल विश्रामबाग वाड्यात मेजर कॅन्डी यांच्या हस्ते ज्योतिबांचा सन्मान करण्यात आला.1855 ला मुलींच्या आई वडिलांना शिक्षणाचे महत्त्व समजावे म्हणून रात्र शाळेची स्थापना केली. 1863 साली आपल्या राहत्या घरी "बालहत्या प्रतिबंधक गृह" ही संपूर्ण देशातील पहिली संस्था फुले दांम्पत्याने सुरू केली."विधवांनो इथे या गुप्तपणे बाळंत व्हा सर्व काही गुप्त ठेवले जाईल तुमच्या मुलांचे संगोपन केले जाईल " अशा आशयाची पत्रके संपूर्णपणे शहरांमध्ये लावली गेली. त्यामुळे आपल्या माहेरापेक्षाही हा बालहत्या प्रतिबंधक ग्रह विधवांना सुरक्षित ठिकाण  वाटू लागले. अनेक स्त्रिया या ठिकाणी दाखल झाल्या. अशाच एका वाट चुकलेल्या काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा यशवंत याला फुले दांम्पत्याने दत्तक घेतले शिकवून पुढे डॉक्टर केले. बहुपत्नीत्व, बालविवाह ,जरठविवाह , केशवपन, वाघ्या मुरळी या सर्व प्रथांना महात्मा फुले यांनी विरोध केला. 24 सप्टेंबर 1873 ला समता, मानवता या नीतीमूल्यांची शिकवण देणाऱ्या सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली.

सर्व साक्षी जगतपती 

त्याला नकोच मध्यस्थी

    अशी सत्यशोधक विचारधारा त्यांनी समाजात रुजवली.


        क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते. पुण्यातील खडकवासला धरणाचे काम, मुंबईचे व्हिक्टोरिया टर्मिनस, अहमदनगर येथील भंडारदरा धरण ,महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पॅलेस इत्यादींचे बांधकाम फुले यांच्या पुणे कॉन्ट्रॅक्टींग कंपनीकडून करण्यात आले.

          शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती तसेच त्यांच्यासाठी वस्तीग्रह सुरू करावेत या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याची मागणी सुद्धा महात्मा फुलेंनी केली. 1882 साली आलेल्या हंटर आयोगाला निवेदन देताना महात्मा फुले म्हणाले की प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे करावे ,प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी, प्राथमिक शिक्षणावर सरकारने जास्त खर्च करावा, शाळेत शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित असावेत अशा मागण्या केल्या.1888 साली पुणे येथे इंग्लंडचे ड्यूक ऑफ कॅनॉट आले होते त्या कार्यक्रमास महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात गेले आणि

 शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी निवेदन दिले.

       मुंबईतील मांडवी कोळीवाडा हॉल येथे 11 मे 1888 रोजी मुंबईतील जनतेने रावसाहेब वड्डेदार यांच्यामार्फत ज्योतिरावांना महात्मा ही पदवी देण्यात आली .आणि तेव्हापासून ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी मुंबई शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, दुकानदार ,कारखानदार, मजूर असे एकूण जवळपास 25 हजार लोकसमुदाय जमला होता.

        सोळाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा 1869 साली शोध घेऊन पहिली शिवजयंती रायगडावर साजरी केली. आणि कुळवाडी भूषण हा पोवाडा त्यांनी रचला. तसेच तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी,शेतकऱ्याचा असूड, अस्पृश्यांची कैफियत,सार्वजनिक सत्यधर्म यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज इंग्रज सरकारला केला.

             या समाजकार्यासाठी महात्मा फुलेंना मोरो वाळवेकर, केशवराव भवाळकर, सदाशिव गोवंडे, उस्मान शेख, सखाराम परांजपे ,लहुजी उस्ताद साळवे अण्णासाहेब चिपळूणकर, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णाराव भालेकर, शिवराम कांबळे,  डॉक्टर विश्राम घोले रामय्या अय्यावारू रामशेठ उरवणे,जाया कराडी लिंगू, तुकाराम तात्या पडवळ, डॉक्टर संतोष लाड इत्यादी सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

        1888 मध्ये ज्योतिबांना अर्धांगवायूचा झटका आला. जोतिबा अंथरुणावर खिळून होते. अशा विकलांग अवस्थेत शाश्वत सत्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चिंतनातून चालू होता. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजेच 'सार्वजनिक सत्यधर्म' होय.हा ग्रंथ काही प्रमाणात ज्योतिबांनी डाव्या हाताने लिहिला तर उरलेला भाग सावित्रीबाईंनी लिहून पूर्ण केला. या महात्म्यास कष्टमय जीवनातून थोडासा आराम सावित्रीबाईंनी दिला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी रात्री बरोबर 2 वाजून 27 मिनिटांनी काळजाचा ठोका चुकला जनसामान्यांचा खरा कैवारी दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.सावित्रीबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. यशवंताला पितृशोक अनावर झाला.ज्योतिरावांनी आपल्या मृत्युपत्रात आपले दहन न करता मिठात घालून पुरावे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.अशातच भाऊकीचा वाद उपस्थित झाला. यशवंताला हातात टिटवे धरण्याचा अधिकार नाही कारण तो जातीचा सभासद नाही, असा विरोध भाऊकीने केला.तेव्हा स्वतःच्या हाताने जोतिबांच्या पार्थिवाला सावित्रीबाईंनी अग्नीडाग दिला. अंत्ययात्रेत सुमारे दीड हजार माणसे जमले होते. भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात एका स्त्रीने टिटवे धरण्याचा व अग्नी देण्याची ही पहिलीच घटना होय.आज मात्र आपण वंशाला दिवा हवा या अज्ञानापोटी मोठ्या प्रमाणावर भ्रूण हत्या करताना दिसतो आहोत. ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे चरित्र नुसते वाचायचे नाही तर त्यांनी घालून दिलेली स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आपली मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.

   क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन



प्रा.स्वाती शिवाजी चौधरी
       मराठी विभाग 
ॲड.बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी
 ता. आष्टी जि. बीड









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.