रमजानुल मुबारक -२७
*हिशोबासाठी तयार रहा*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
रमजान महिन्यातील पवित्र अशी शबेकद्र रात्री संपन्न झाली.महिनाभर तरावीहच्या नमाज मध्ये कुरआन शरीफचे पूर्ण पठन ही पूर्ण झाले. त्यामुळे आता आपली जबाबदारी संपली असे समजून उर्वरित दोन किंवा तीन दिवस तरावीह कडे पाठ फिरवू नये. कुरआन शरीफचे वाचन व पठन पूर्ण होत असतांना रमजान महिना अलविदा होत आहे ही जाणिव प्रत्येकाला होत आहे. कित्येक जणांच्या डोळयात अश्रू दाटले आहेत. रमजान महिना आपल्यातून निघून जात असतांना आपण त्याचे किती पालन केले याचा परामर्श प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे.अल्लाहने आपल्याला हा महिना दिला मात्र त्याचे पूर्णतः पालन आपण करु शकलो नाही. कुरआन मध्ये अल्लाहने जीवन कसे जगावे याबाबतचे सखोल मार्गदर्शन केले आहे.त्याप्रमाणे जर प्रत्येकाने आपले आचरण ठेवले तर आपले जीवन सार्थ ठरेल.
दररोजच्या व्यवहारातील अनेक बाबींबाबत आपल्या कडून कधी मुद्दाम तर कधी अजाणतेपणाने दुर्लक्ष होते.पण असे होणे किंवा करणे योग्य नाही. मोजमापाच्या व्यवहारात देतांना कमी देऊ नका व घेतांना जास्त घेऊ नका कारण तुम्हाला प्रत्येक कृत्याचा हिशोब दयावा लागणार आहे याची जाणिव ठेवूनच प्रत्येकाने वागणे अपेक्षित आहे. रोजच्या जीवनात आपल्याकडून घडणारे प्रत्येक वर्तन हे काळजीपूर्वक केले पाहिजे.जगाचा निर्माता आपल्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे. त्याचे दोन फरिश्ते आपल्या वर्तनाची प्रत्येक बाब दर क्षणी नोंदवित आहेत याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कुरआन मध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक बाबीचा हिशोब कयामतच्या दिवशी दयावा लागणार आहे. आपण जे काही कृत्य करतो त्याची नोंद होत असते.भले ते कृत्ये उजेडात करा किंवा गडद अंधारात करा.केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब किंवा जाब प्रत्येकाला दयावा लागेल याबाबत कुणीही शंका बाळगू नये.
अल्लाह किंवा ईश्वराने मानव निर्माण केला. जगातील सर्व मानव सारखेच आहेत. प्रत्येकाला दोन हात, दोन कान,एक नाक, दोन पाय देवाने दिले. जगातील सर्व लोकांच्या रक्ताचा रंग एकच म्हणजे लाल. देवाने माणूस जन्माला घातला.पण या दुनियेने माणसांची विभागणी विविध जातिधर्मात,पंथात केली. बरं *जगातील कोणताही धर्म वाईट शिकवण देत नसतांना माणसं मात्र वाईट वागतात याचेच आश्चर्य वाटते.*
मध्यंतरी एक पोस्ट वाचली कि गेल्या वर्षभरात देशात झालेल्या दंगली,संप, मोर्चे, आंदोलने या मुळे देशाचे एक लाख आठशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. वास्तवतः थोडीशी दूरदृष्टी दाखविली तर हे सर्व टाळता येऊ शकते. दंगली म्हणजे आपल्या देशाला लागलेला शाप होय. यामुळे काहींचा फायदा होत असला तरी समस्त देशाचे, जनतेचे कधीही भरून न येणारे अपरिमित असे नुकसान होते याची जाणिव कुणाला कशी होत नाही याचेच दुःख वाटते. यासाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी म्हणजे या घटना टाळता येऊन माणुसकी दृढ होईल.
*समानता म्हणजे नेमकं काय ?*
रमजान महिन्याचे तीन किंवा चार दिवस आता शिल्लक आहेत.तीव्र उन्हाच्या झळा सोसत अल्लाहच्या प्रार्थनेच्या ध्येयाने पूर्ण महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे.अगदी नऊ दहा वर्षाच्या मुला मुलींनी देखील पूर्ण रोजे केलेले आहेत.ईश्वरावर असलेल्या अपार श्रद्धेचे हे प्रतीक आहे.अल्लाह तआला सर्व रोजेदारांचे रोजे कबूल करो.आमीन.
प्रत्येक समाजाचे आपल्या धर्मानुसार चालीरीती,रूढी,परंपरा यांच्याशी संबंधित काही कायदे आहेत.त्यानुसार समाज आपली वाटचाल करीत असतो.विवाह, मृत्यु,व्यवहार यांचे सुद्धा काही नियम प्रत्येक समाजाने आपल्या धर्मानुसार निर्माण केलेले आहेत.कुरआन शरीफनुसार प्रत्येक मुस्लिमाने कसे जगावे आणि कसे जीवन व्यतीत करावे यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार इस्लामी शरीयत कायदा तयार झाला आहे व त्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाने आपले आचरण ठेवावे अशी अपेक्षा आहे.आपल्या बहुधर्मीय देशात विवाह आणि घटस्फोट याबाबत विविध धर्माचे वेगवेगळे नियम आहेत तसेच मृत्यू नंतर अंत्यविधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक समाजाच्या चालीरीती सुद्धा वेगळ्या आहेत.आजपर्यंत सर्व जण त्याप्रमाणे आपले आचरण,वर्तन करीत आहेत.एका धर्माच्या चालीरीतीचा दुसऱ्या धर्मावर कोणताही परिणाम झालेला नाही. गुण्यागोविंदाने सर्व देशवासी राहत आहेत. एक देश म्हणून देशवासियांसाठी भारतीय घटनेनुसार काही कायदे समान केलेले आहेत.गृह खात्याशी संबंधित कायदे देशाच्या सर्वधर्मीय नागरिकांना लागू आहेत.त्यामुळे वेगवेगळ्या धर्माच्या शिक्षा वेगळ्या असल्या तरी आपल्या देशात त्या लागू होत नाहीत. उदाहरणार्थ इस्लामी राजवटीमध्ये चोरी करणे,बलात्कार करणे, खून करणे अशा गुन्ह्यांना ज्या शिक्षा आहेत,त्या आपल्या देशातील घटनेने देशवासीयांना लागू केलेल्या नाहीत. फसवणुकीसाठी जी शिक्षा इस्लामी कायद्यात आहे,भारतीय कायद्यात ती नाही.सर्व भारतीयांसाठी वेगळे नियम आहेत.असे असताना देखील कधी कधी समान नागरी कायदा या विषयाची चर्चा होत असते. जवळजवळ ९८ टक्के भारतीयांना एकच कायदा लागू आहे.फक्त विवाह आणि वारसा हक्क यांचे कायदे प्रत्येक धर्मानुसार वेगळे आहेत. सर्व देशवासियांसाठी समान कायदा हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण काही संवेदनशील विषयांबाबत व्यापक चर्चेतून निर्णय झाले पाहिजे.मुस्लिमांमध्ये बहुपत्नीत्वाचा कायदा अस्तित्वात आहे.त्याला सातत्याने विरोध होत असतो.परंतु तो कायदा आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती लोक करतात यावर ही संशोधन झाले पाहिजे म्हणजे वस्तुस्थिती स्पष्ट होईल.एकीकडे दुसरी पत्नी करू नये असा काही धर्मात नियम आहे पण मग अनैतिक संबंध ठेवलेले चालतात का ? याबाबतही नियम झाले तर सर्वांना समान सूत्रात गुंफणे योग्य होईल. (क्रमशः)
------------------------------------
रमजानुल मुबारक = २८
*स्वयंशिस्त कायम टिकावी*
*✒️ सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
*स्वयंशिस्त कायम टिकावी*
*✒️ सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
पवित्र रमजान महिन्याची उदया सांगता होण्याची दाट शक्यता आहे.महिना कसा गेला ते समजले देखील नाही. महिनाभर रोजे, पाचवेळची नमाज, तरावीहची नमाज,
सहेरी,इफ्तार या दिनक्रमामुळे दररोजच्या जीवनाला एक दिशा प्राप्त झाली. वेळेची शिस्त निर्माण झाली. सर्व कामे वेळेवर करण्याची स्वयंशिस्त निर्माण झाली. उन्हाळ्याची तीव्रता असतांना देखील अल्लाहच्या भक्तांनी रोजे धरले,प्रार्थना केली. सर्व धार्मिक विधी पार पाडले. विशेष म्हणजे रमजान महिन्यात काय केले पाहिजे हे अल्लाहने नमूद केले,भक्तांनी स्वतः त्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्णय घेतला व त्यावर अंमल केला. तहान लागलेली असतांना व समोर पाणी उपलब्ध असतांना त्याला हात ही लावला नाही हे नियंत्रण स्वतः मध्ये निर्माण केले.यासाठी कोणताही कायदा करावा लागला नाही.
हीच स्वयंशिस्त मानवाला अध्यात्माकडे प्रोत्साहीत करते.
ईश्वराने मानवाच्या भल्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची निर्मिती केली.अन्नसेवन करतांना किंवा केल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला , फळे,कंद आदि उगवले. मानवी शरीराला अपाय होऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या जडीबुटी निर्माण केल्या.निरर्थक अशी एक ही गोष्ट या सृष्टीत निर्माण केलेली नाही.मात्र मानवाला त्यांचा योग्य प्रकारे उपभोग घेता आलेला नाही.सृष्टीच्या निर्माण कर्त्या परमेश्वराने सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या मात्र आपण त्याचा योग्य विनियोग न करता गैरवापर केल्याने मानव आज अडचणीत सापडला आहे.
अल्लाहने कुरआन शरीफच्या माध्यमातून मानवासाठी आचारसंहिता निर्माण करून दिली आहे. प्रत्येकाने त्याप्रमाणे वर्तन करायचे, वागायचे आहे.आपल्या सर्व कर्माचे आडिट कयामतच्या दिवशी होणार आहे. या जगात जीवन जगतांना केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट कार्याचा खाते उतारा (नाम ए आमाल किंवा आमालनामा) आपल्याला त्या दिवशी मिळेल आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वर्ग कि नरक याचा फैसला झालेला असेल.जे जे चुकीचे केले असेल त्याची परतफेड करावी लागेल.सर्व हिशोब काटेकोर असेल.तेथे समायोजन नाही.कारण आपल्या सर्व कार्याचा आडिटर अल्लाह आहे. दुनियेतला आडिटर लाच घेऊन तुमच्या बाजूने सकारात्मक अहवाल देईल मात्र तो जगाचा आडिटर कोणतीही लाच घेत नसल्याने तो अहवाल जसा येईल तसा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. म्हणून प्रत्येकाने सचोटीचा स्विकार करावा व त्याप्रमाणे जीवनक्रमण करावे हाच एकमेव पर्याय आहे.
अजून खूप काही घडणार आहे.
पवित्र रमजान महिना कसा निघून गेला ते कळले देखील नाही.प्रेषित हजरत पैगंबरांनी याबाबत असे सूतोवाच केलेले आहे कि ज्यावेळी कयामतचा कालावधी जवळ येईल,तेव्हा दिवसाची बरकत निघून जाईल.आता हेच पहा ना.नवीन वर्ष सुरू होऊन जवळ जवळ चार महिने झाले.पण असं वाटतंय कि नवीन वर्ष कालच सुरू झाले. दिवस असा निघतोय आणि असा मावळतोय.जीवनाचा एक एक दिवस कमी होत आहे.आपण मात्र वाढदिवस साजरे करतोय.निसर्गाच्या नियमाविरुद्ध आपले वर्तन सुरू आहे.
कोरोनाच्या एका छोट्याशा अतिसूक्ष्म विषाणूने जगाची सर्व गणितं बदलून टाकली आहेत.माणूस,ज्याला आपल्या प्रत्येक कृत्यावर फार गर्व होता. त्याचे गर्वहरण झाले आहे.चांगले चांगले गर्भश्रीमंत धन,संपत्ती असूनही ज्यावेळी कोरोना ने निधन पावले तर त्यांना शेवटचा निरोप द्यायला पी पी किट मधील दोन माणसांशिवाय तिसरा माणूस नव्हता.सत्ता, संपत्तीचं मूल्य सध्या शून्य आहे हे सिद्ध झाले.
हे सर्व दिवस आपल्याला का पहावे लागत आहेत ? याचा अध्यात्मिक दृष्ट्या अभ्यास केल्यास असे दिसून येते कि आपले स्वैर वर्तन याला कारणीभूत आहे. आपण ईश्वराचा सांगितलेला मार्ग सोडून गैरमार्गाने परिक्रमण सुरू केल्याने या सर्व बाबी घडत आहेत.माणसाने सर्व प्रकारची नैतिक बंधने तोडून आपल्या मनमानी पद्धतीने जगण्यास आणि वागण्यास सुरुवात केली. ईश्वर आणि अल्लाहची भीती मनात न ठेवता स्वैराचारी वागणूक आणि वर्तन केल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका सूक्ष्म विषाणू पुढे सर्व काही हतबल झाले. आता तरी आपण सुधारणार आहोत का? कारण कुरआनमध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे जगाचा विनाश जवळ आला असून अनेक मोठ्या घटना त्यात घडणार आहेत. या सर्व घटनांना सामोरे जाण्याची तयारी आपण केली आहे का ?
जे घडतंय ते आपण रोखू शकत नाही,पण आपले वर्तन बदलून जगत निर्मात्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मात्र आपण करू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर काही नैतिक व सामाजिक बंधने लादून घेऊन आपल्या मनातील भावनांना आवर घालून ईश्वर आराधनेचा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे. समाजातील गरजूंना मदत करणे म्हणजे ईश्वराची मदत करणे आहे. स्वार्थाचा त्याग करून परमार्थकडे वळण्याची आवश्यकता आहे. हे जर आपण केले नाही तर येणारे दिवस खूप वाईट आहेत.आपण हतबल, निर्बल आहोत. आपल्या जवळची माणसं अचानक पणे आपल्याला सोडून गेली. आपण काही करू शकलो नाही. आपल्या हातात काहीच नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपल्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे सत्य मार्गाचा अवलंब करावा आणि ईश्वर,अल्लाहची नाराजी दूर करण्यासाठी त्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा येणार्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
रमजानुल मुबारक या लेखमाले द्वारे दैनिक सार्वमत मध्ये मार्गील पंचवीस वर्षे व या वर्षी दैनिक कॉमन न्यूज, दैनिक साई संध्या या सह समाज माध्यमातून इस्लाम धर्माबद्दलची माहिती इतर धर्मिय बंधू भगिनीपर्यंत पोहोचवून इस्लामचा खरा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न गेली २६ वर्ष मी करीत आहे.वाचकांचा या लेखमालेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने संस्मरणीय आहे.
(क्रमश:)
-------------------------------------


stay connected