रमजानुल मुबारक -१७
*जकात आदा करण्याचे फायदे*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
इस्लाम धर्माची पाच मूलतत्वे प्रामुख्याने मानली गेली आहेत.पहिला कलमा, दुसरी नमाज,तिसरा रोजा,चौथी जकात व पाचवे हज.यापैकी जकातची अदायगी प्रामुख्याने या रमजान महिन्यात केली जाते.समाजातील सधन वर्गाने (साहिबे निसाब) जकात ही दयावयाची असते. यासाठी ज्याच्या जवळ साडेसात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा त्यांच्या किंमतीची रोख रक्कम शिल्लक आहे अशी व्यक्ति जकात आदा करण्यासाठी पात्र समजली जाते. बहुतांश लोक रमजान महिन्यातच जकात दयावी असे समजतात मात्र तसे नाही.तुमच्या नफ्याच्या मालाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा जकात दिली पाहिजे. रमजान महिन्यात मिळणारे जास्त पुण्य प्राप्त व्हावे या हेतूने जकात या महिन्यात देण्याकडे कल जास्त असतो.
समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. कुणी गरीब राहू नये, असेल तर त्याच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने हजरत पैगंबरांनी जकातीची ही व्यवस्था निर्माण केली.
समाजातील अगदी शेवटचा घटक देखील वंचित राहू नये हा या मागचा मुख्य उद्देयश आहे. समाजातून गरीबीचे उच्चाटन करणे हा देखील हेतू आहे.
तसेच समाजातील वृध्द , विधवा,अनाथ यांचे पालनपोषण करणे, गंभीर आजारी रुग्णांना मदत करणे, शिक्षणासाठी हातभार लावणे असे अनेक उद्देश यामागे अभिप्रेत आहेत.
जकात आदा केल्याने आपल्या व्यापार उदिमात वाढ होते.बरकत येते.जे व्यापारी किंवा ईतर व्यावसायिक वर्षभराच्या आपल्या व्यापार, व्यवसायाचा काटेकोरपणे हिशोब करुन योग्य ती जकात आदा करतात त्यांची भरभराट झालेली पहावयास मिळते.तर जे याबाबत कुचराई करतात त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात.
आपल्याकडे प्रामुख्याने धार्मिक पाठशाळा (मदरसा) ना जकातीची रक्कम मोठया प्रमाणावर दिली जाते. या रकमेतून मदरसात शिकणाऱ्या मुलामुलींचे जेवण,कपडे व राहण्याचा खर्च भागविला जातो. अलिकडच्या काळात समाजातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही या रकमेचा सदुपयोग केला जात आहे.गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च जकात च्या रकमेतून केला जात आहे. अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती याबाबत अग्रेसर आहेत.जकात देतांना ती देण्याचे जाहीर प्रदर्शन टाळावे, घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पध्दतीने दयावी. गरजूंचा शोध घेऊन शक्य तो गुप्तपणे त्यांची मदत करावी. ही मदत अल्लाहच्या मर्जीसाठी दिली जात असल्याने तोच याचा मोबदला आपल्याला देईल ही श्रध्दा त्यामागे असावी .
दरवर्षी एकूण वार्षिक व्यवहारातून झालेल्या नफ्यावर शेकडा अडीच टक्के जकात देणे फर्ज आहे.जकात म्हणजे इस्लामी टॅक्स.जो समाजातील गरजू व गरीब घटकांच्या मदतीसाठी वापरला जातो.जगामध्ये इन्कम टॅक्स आणि सेल टॅक्स म्हणजे आयकर व विक्रीकर देण्याची पद्धत आहे.परंतु इस्लाम मध्ये तुम्हाला जे उत्पन्न मिळाले आहे,त्यातून जो नफा झाला आहे,त्या नफ्यावर तुमच्या मर्जीने टॅक्स म्हणून जकात आदा करावयाची आहे.विक्री करामध्ये चोरी केली जाते.उत्पन्न दडवले जाते. विक्री लपविली जाते.जकाती मध्ये मात्र झालेला नफा लपवता येत नाही. जकातीच्या टॅक्स रुपी रकमेची चोरी करता येत नाही.खोटी रक्कम अदा करता येत नाही.कारण नफा आपला असतो.
त्यावर जकात आदा केल्याने आपली एक जबाबदारी पूर्ण होते. या जकातीच्या आदा करण्यामध्ये काही अफरातफर केल्यास होणारे नुकसान देखील आपलेच असते व गुन्हा सुद्धा आपल्याच नावावर नोंदवला जातो.ही जाणीव असल्यामुळे कोणतीही व्यक्ती जकात आदा करण्यामध्ये कुचराई करीत नाही.
समाजातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि समाजातील सर्वांना समान न्याय,समान आनंद,समान संधी देण्यासाठी जकातीची व्यवस्था रुढ झालेली आहे.जे लोक आपल्या सर्व प्रकारच्या कारभारावर,वार्षिक उत्पन्नावर जकातीची रक्कम अदा करतात, अल्लाहच्या नजरेमध्ये ते फार भाग्यवान आहेत. गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करुन पुण्य कमावण्याची संधी अल्लाहतआला ने त्यांना उपलब्ध करून दिलेली असते. प्रत्येक जण या संधीचं सोनं करण्यासाठी आतुर झालेला असतो. एकटया आपल्या भारत देशामध्ये सरकारी टॅक्स शिवाय या देशातील मुस्लिम बांधव अब्जावधी रुपये जकात म्हणून दरवर्षी देत असतात. शासकीय कर व धार्मिक कर अशाप्रकारे दुहेरी कर ते आदा करतात.
समाजातील अनाथ, विधवा,आजारी रुग्ण व सर्व प्रकारच्या गरजू घटकांना जकातच्या रूपातून मदत दिली जाते.
आज मुस्लिम समाजाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आर्थिक सुधारणांची खूप गरज आहे.दुर्दैवाने केंद्र सरकार तर मुस्लिम समाजाचे किती हितरक्षण करते हे जगजाहीर आहे. राज्य सरकारकडूनही फार अपेक्षा नाहीत.परंतु जोपर्यंत मुस्लिम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेऊन इतर घटकांबरोबर विकासाच्या समान संधी मिळत नाहीत,तोपर्यंत हा समाज प्रगती करू शकत नाही.सध्यातरी समाजाच्या मूलभूत गरजा या समाजातील जकातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविल्या जातात.
जकातीची एक आदर्श व्यवस्था इस्लामने जगाला दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून प्रत्येक समाज आणि देश आपली प्रगती करू शकतो (क्रमशः)
**********************
रमजानुल मुबारक - १८
*कुरआनचा मानवता संदेश*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
रमजान महिन्याचा पूर्वार्ध पूर्ण होऊन उत्तरार्ध सुरू झाला आहे.सतरा दिवस कसे निघून गेले ते कळले देखील नाही.आता प्रत्येक घरातील वातावरण रमजानमय झाले आहे.कुरआन शरीफचे दुसऱ्यांदा तर काहींचे तिसऱ्यांदा वाचन सुरु आहे. कुरआन मध्ये अल्लाहने असे ही म्हटले आहे कि - अजाणतेपणामुळे झालेल्या चुका अल्लाह माफ करील पण जाणूनबुजून,मुद्दामहून केलेल्या चुकांना माफी नाही,कुणीही कुणाचे गुन्हयाचे ओझे उचलू शकणार नाही,ज्याचा भार त्यालाच पेलावा लागेल.अल्लाहचे आदेश उपदेश रुपाने लोकांपर्यंत पोहोचवा गरीबी व दारिद्रयाच्या भितीने आपल्या मुलामुलींची हत्या करू नका , ज्या गोष्टीचे ज्ञान नाही तिच्या मागे धावू नका,निराधार व अस्पष्ट कामांच्या मागे लागू नका,परवानगी शिवाय कुणाच्याही घरात प्रवेश करू नका,जीवनाकडे दुर्लक्ष करू नका,जे अल्लाह वर यकीन
(विश्वास) ठेवतील, अल्लाह त्यांचे सरंक्षण करील.जमीनीवर सावकाश व आरामात चला,अल्लाह सोबत कुणालाही सामिल करु नका,समलैंगिक संबंधापासून नेहमी दूर रहा,चांगल्या कामाचा नेहमी उपदेश करा, वाईट कामाची मनाई करा,जमिनीवर गर्वाने चालू नका,अल्लाह शिर्क (अल्लाह समान अन्य कुणाला सामिल करणे) शिवाय सर्व गुन्हे माफ करील,वाईटाला चांगल्याने नामशेष करा, विचारविनिमय (मशवरा) करुन कामे हाती घ्या, ज्ञानी लोक अल्लाहच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत, इतरांशी उचित सदवर्तन करा,चुका झाल्यास अल्लाहची माफी मागा, तो दयालु व माफ करणारा आहे.अशा प्रकारच्या मानवतेशी निगडीत खूप सूचना (हिदायात) कुरआन मध्ये अल्लाहने केल्या आहेत.या सर्व सूचनांचा प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनंदिन जीवनात वापर केल्यास जगातून सर्व प्रकारची दुष्कृत्ये नामशेष होतील.यासाठी प्रत्येकाने या सूचना अंगीकारल्या पाहिजेत.
भारतासारख्या बहुधर्मिय देशात अनेक चालीरितींची सरमिसळ होऊन त्या रुढ झाल्या आहेत.मात्र यातील चांगल्यांचा स्विकार व वाईटांचा इन्कार करुन आपले जीवन ईतरांना व स्वतःला ही प्रेरणादायी वाटेल असे वर्तन प्रत्येक स्त्री पुरुषांकडून होणे अपेक्षित आहे.
कुरआन हा दैवी ग्रंथ फक्त मुस्लीमांसाठी नाही तर जगभरातील समस्त मानवजातीसाठी आहे व तो जगाच्या प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. जगात कोटयावधी लोक आज कुरआन चा अभ्यास करीत आहेत. त्याचा अर्थ समजाऊन घेत आहेत. त्यात सांगीतलेल्या बाबींची पडताळणी करून घेत आहेत.त्याप्रमाणे आचरण करीत आहेत. प्रत्येक गोष्टीशी संबंधित मार्गदर्शन कुरआन मध्ये सामावलेले आहे.
कुरआन हा जीवनाचा गाईड असून प्रत्येकाने तो समजून घेण्याची गरज आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.
तरावीहच्या नमाज मध्ये दरवर्षी संपूर्ण कुरआन शरीफ चे वाचन आणि पठण केले जाते.ही साडे चौदाशे वर्षांची परंपरा आहे.त्यामाध्यमातून कुरआनचा संदेश आणि त्यामध्ये अल्लाहतआला ने मानव जातीसाठी केलेले मार्गदर्शन समजून घेतले जाते.मानव जातीच्या कल्याणासाठी हा दैवी ग्रंथ अल्लाहने पाठवला.यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल नमूद केली आहे. पण त्यासाठी वारंवार कुरआन पठण करून, त्यावर चिंतन करून तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडायला नको. त्यासाठी कुरआनच्या दिव्य प्रकाशामध्ये प्रश्न सोडवले गेले पाहिजे. हजरत पैगंबरांच्याकाळात त्यांचे अनुयायी (सहाबा) कुरआनला खूप समजून घेत.एकट्या सूरए बकरा चे आकलन करून घेण्यासाठी त्यांना आठ वर्ष लागल्याची नोंद इतिहासात आहे. ते दररोज आठ-दहा आयत पठण करीत.त्यांचा अर्थ समजून घेत.त्याच्यावर स्वतः अंमल करीत. आणि मग पुढचे पाठ सुरू होत. केवळ तरावीहमध्ये कुरआन पठण केल्यामुळे त्याचे हक्क आदा होत नाही. कुरआनमध्ये अल्लाह तआला ने दिलेली शिकवण प्रत्येकाने प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. जगातील प्रत्येक मानवासाठी हा ग्रंथ आहे.जर आपण त्यातील अल्लाहच्या आदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली तर या जगामध्ये कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. दुर्दैवाने हे घडत नाही.वेगळे विचार, वेगळे आचार यामुळे मूळ प्रश्न समजून न घेता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मनमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात रब चाही जिंदगी व्यतीत करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी वारंवार कुरआन समजून घेऊन त्याचा अर्थ आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल कुराणमध्ये कठोर शिक्षा सांगितलेली आहे.आजही अनेक वाईट घटना घडतात. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होतात. यामुळे जे पीडित आहेत,त्यांच्यावर अन्याय केला जातो. अल्लाहच्या नजरेत हा न्याय नाही.जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतात.त्यावेळी पृथ्वीवर कोरोना सारखी संकटे,भूकंप,अतिवृष्टी, वादळे, मोठे अपघात, अग्नितांडव अशा घटना घडतात.त्यासाठी आपल्या जीवनामध्ये कुरआन शरीफचा अंगीकार करून त्यामधील मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे.अल्लाहतआला आम्हाला आमच्या जीवनामध्ये सत्य मार्ग स्वीकारण्याची सुबुद्धी देवो.आमीन.(क्रमशः)
*********************
रमजानुल मुबारक -१९
*कसे वागावे कसे जगावे*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे दहा अकरा दिवस आता बाकी आहेत.उद्या रमजान महिन्याचा दुसरा कालखंड पूर्ण होणार आहे. मगफिरतच्या या काळात प्रत्येकाने अल्लाहतआलाची माफी मागून आपल्या कृत्यांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.करीत आहेत.
ज्यावेळी अल्लाहने या पृथ्वीतलावर मानव जन्माला घातला.
त्यावेळी पैगंबर हजरत आदम आणि हजरत हव्वा ही जोडी निर्माण केली.पुढे त्यांच्यापासून अपत्य निर्मिती होऊन आजच्या जगातील सर्व माणसे अस्तित्वात आली. (या अनुषंगाने आजची सर्व माणसं ही एकमेकांचे नातेवाईक आहेत).वेळोवेळी या माणसांनी जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग सोडून इतर मार्ग धरला,तेव्हा त्यांना परत योग्य मार्गावर आणण्यासाठी त्या त्या काळामध्ये अनेक पैगंबर निर्माण केले गेले.त्यांनी आपल्या समकालीन लोकांना अल्लाहला अभिप्रेत असलेला मार्ग सांगितला.ज्यावेळी लोकांनी फारच मनमानी केली,त्यावेळी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा पण मिळाली. अशाप्रकारे जवळपास सुमारे एक लक्ष चोवीस हजार पैगंबर या पृथ्वीतलावर होऊन गेले. शेवटी अल्लाहतआलाने कुरआन मार्फत हे जाहीर करून टाकले कि हजरत मोहम्मद हे आता शेवटचे प्रेषित असून यानंतर कोणीही पैगंबर येणार नाही.मानवाने जर आपल्या चुका सुधारल्या नाही तर या सृष्टीचा शेवट होईल.
अनेक धर्मांच्या शिकवणुकीतून ही बाब सर्वमान्य आहे कि या सृष्टीचा शेवट आता जवळ आलेला आहे. कारण माणसे आता सर्व प्रकारची नीतिमत्ता सोडून वागू लागली आहेत.स्वैराचार वाढला आहे.कोणत्याही धर्माने वाईट कृत्यांचे समर्थन केलेले नाही.तरी सुद्धा आज सर्वत्र दुष्कृत्ये वाढीस लागली आहेत. जो तो आपल्या मर्जीने वागत आहे.मुस्लिम असेल तर कुरआनमध्ये सांगितलेल्या गोष्टी विरुद्ध ते वागत आहेत. इतर धर्मीय असतील ते सुद्धा धर्माच्या विरुद्ध वर्तन करीत आहेत. त्यामुळे अल्लाह किंवा ईश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे कयामत जवळ आलेली आहे.प्रत्येक जण हा विचार करतोय कि मी कसा जरी वागलो तर काय होणार आहे.परंतु या विकृत विचारसरणीतूनच गैरप्रकार वाढले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले करणारे कमी आणि वाईट करणारे जास्त झाले आहेत.त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.एकीकडे धार्मिक कार्याचा महापूर येतो. प्रवचने होतात,तब्लिगी मेळावे होतात,हरिनाम सप्ताह होतात,दानधर्म होतात,नेकीची कार्ये केली जातात आणि दुसरीकडे अल्लाह किंवा ईश्वराने जे करायला सांगितले नाही ते करणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य करतात.धर्माने दारू निषिद्ध केली तरी दारू पिणारे आणि विकणारे वाढले.अश्लीलता वाढली.व्यभिचार, दुराचार वाढले. नीतिमत्ता बदलली. व्याजाचे धंदे वाढले. फसवणूक करणारे वाढले.कर्जबुडवे सुद्धा वाढले.खोटेपणाने सत्ता उपभोगणारे वाढले.आपल्या जवळच्या माणसांचाच विश्वासघात करणाऱ्यांची संख्या ही वाढली.
हे चित्र जगात सर्वत्र पाहायला मिळत आहे.हे सर्व अति झाल्यामुळे या जगाचा ऱ्हास जवळ आला आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. म्हणून येणाऱ्या युगामध्ये जे सत्मार्गाने जीवन जगतील,ते अल्लाहची मर्जी संपादन करतील आणि कयामतच्या दिवशी ते स्वर्गाचे हक्कदार होतील. इतरांचे काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही.देवाने ही जीवन दिले.त्यात आपण कसे वागायचे हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे.
अल्लाहतआला सर्वांना चांगले वागण्याची सुबुद्धी देवो.आमीन. (क्रमशः)
*ता.क.-गेली 26 वर्षे रमजान महिन्याच्या निमित्ताने या लेखमालेचे लेखन मी करीत आहे.दैनिक सार्वमतमध्ये सलग 25 वर्षे ही लेखमाला प्रकाशित झाली. त्याशिवाय महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात देखील छापून आली.वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे शक्य झाले.बऱ्याच मित्रांच्या आग्रहाखातर या लेखमालेचे रूपांतर पुस्तकात करण्याचा निश्चय केला आहे. म्हणून या लेखमाले बद्दल आपले मत अगदी थोडक्यात माझे वैयक्तिक नंबर वर आपण पाठवावे. निवडक प्रतिक्रियांना प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये स्थान देण्यात येईल. प्रतिक्रिया देतांना शेवटी आपले नाव, गाव आणि फोन नंबर जरूर टाकावा.*
आपल्या प्रतिक्रिया वैयक्तिक या नंबर वर पाठवाव्यात.
9226408082
(सलीमखान पठाण)
रमजानुल मुबारक - २०
*आदर्श इस्लामी शासन प्रणाली*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
पवित्र रमजान महिन्याची आता उत्तरार्धाकडे वाटचाल सुरू झाली आहे. दहा किंवा अकरा दिवसच शिल्लक राहिलेले आहेत.त्यामुळे आता रमजान ईदची लगबग देखील सुरू झाली आहे. नवीन कपडे खरेदी करतानाच आपले जवळचे नातेवाईक, गरजू लोक यांना मदत करण्यासाठी सुद्धा अनेक हात पुढे सरसावले आहेत. जकातीच्या रकमेचा विनियोग जवळ आला आहे. यानिमित्ताने जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा कल आहे. ईदचा आनंद सर्वांना मिळावा हा हेतु या मागे आहे.
इस्लामी राजवटीतील शासन प्रणाली ही जगातील एक आदर्श शासनव्यवस्था होती. भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. त्या वेळी बोलतांना महात्मा गांधींनी असे म्हटले होते कि नेहरूंनी हजरत उमर यांची कार्यप्रणाली स्वीकारली पाहिजे.
हजरत उमर बिन खत्ताब हे इस्लामी राजवटीतील दुसरे खलिफा अर्थात बादशाह होते. त्यांच्या काळामध्ये इस्लामी राजवट जगातील बहुतांश प्रदेशावर होती. त्यांनी एक आदर्श शासन प्रणाली अमलात आणली. विशेषत: सरकारी खजिना ज्याला इस्लामी भाषेत बैतुलमाल म्हणतात.
त्याचा कधीही दुरुपयोग होऊ दिला नाही. शासन प्रमुख असताना देखील सरकारी खजिन्यातील एक रुपया देखील स्वतःवर कधी खर्च केला नाही.सुरक्षारक्षक हा प्रकार त्या काळात नव्हता.त्यांच्या राजवटीत एकदा ते एका मोहीमेवर गेले असता शत्रुपक्षातील एका शिष्टमंडळाने त्यांची भेट मागितली.तेव्हा इस्लामी राजवटीचा हा प्रमुख एका झाडाखाली विटेवर डोके ठेवून झोपला होता.त्या लोकांना खूप आश्चर्य वाटले.खलीफा असतांना आठवड्यातून एक दिवस ते सुट्टी घेत होते.लोकांना भेटत नव्हते.त्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले कि त्यांच्याकडे एकच पोशाख आहे आणि तो धुऊन टाकल्यानंतर मला बाहेर निघणे शक्य नाही. त्यांच्या कपड्यांना अनेक ठिकाणी थिगळं लावलेली होती. राज्यकारभार करतांना कोणावरही अन्याय होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष होता. स्वतःच्या मुलाने चूक केल्यानंतर त्याला कोड्याने इतके मारले कि तो गतप्राण झाला. परंतु फिर्यादीला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली.राज्यकारभार करताना ते खूप हळवे होत.रस्ते तयार करताना कुठे खड्डा पडला आणि कुणाला ठोकर लागली तर त्याचाही जाब आपल्याला अल्लाह ला द्यावा लागेल,त्यामुळे रस्ते तयार करताना सुद्धा कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घ्या असे त्यांचे आदेश होते.
दुसरे हजरत उमर बिन अब्दुल अजीज हे सुद्धा एक खलिफा होते. सरकारी खजिन्यातून कधी त्यांनी स्वतःच्या कामासाठी दिवा देखील वापरला नाही. वैयक्तिक कामासाठी ते स्वतःला मिळणाऱ्या मानधनातून तेलाचा खर्च करून वेगळा दिवा वापरत असत .
जनतेचा पैसा हा जनतेसाठी आहे.आपण त्याचे रक्षक आहोत. राज्यकारभार करताना केल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाचा जाब आपल्याला द्यावा लागणार आहे ही भिती मनात बाळगून इस्लामी राजवटीत राज्यकारभार होत असे.जगात चालणाऱ्या आजच्या राज्यकारभारापेक्षा इस्लामी राजवटीतील शासन प्रणाली ही खूप आदर्श होती. याची नोंद जगाच्या इतिहासाने घेतली आहे.
अधिकार किंवा सत्ता ही जनतेच्या सोयीसाठी असते तिचा सुयोग्य असा वापर झाला पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. सर्वसामान्य लोकांना शासनाकडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासकांची असते.(क्रमशः)
------------------------------------
रमजानुल मुबारक -२१
*जे पेराल ते उगवेल*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082*
रमजान महिन्याचा तिसरा आणि शेवटचा भाग काल सायंकाळपासून सुरु झाला आहे.याला जहन्नुम पासून मुक्तीचा काळ संबोधले जाते. रमजानचा हा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे.या दहा दिवसात दररोज रात्री अधिक काळ प्रार्थना करुन अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. या महिन्याच्या शेवटच्या भागात लैलतुल कद्र ही एक अशी रात्र आहे कि या रात्री केलेल्या प्रार्थनेचे पुण्य हे हजार महिन्यांच्या पुण्यासमान आहे.पण ती रात्र नेमकी कोणती हे अल्लाहने गुप्त ठेवले आहे. शेवटच्या खंडातील २१ते २९ तारखा दरम्यान विषम संख्येतील ती एक रात्र आहे.म्हणून दहाच्या दहा रात्री जर आपण थोडी अधिक प्रार्थना केली तर बिघड़लं कुठं ? अल्लाहने आपल्याला दिलेले जीवन सत्कारणी लावण्यासाठी आपण सद्वर्तन,सद् विचार, सदाचाराने जगणे आवश्यक आहे. आपण जे इतरांना दयाल ते तशीच परतफेड करतील म्हणून जीवनात प्रत्येक कार्य करतांना मनात हा विचार असावा.
व्यापार,व्यवहार,वर्तन या सर्व बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवहारात खोटेपणा, फसवणूक असे प्रकार करू नये,कारण ज्याला फसवले जाते त्याची हाय किंवा तळतळाट ज्याला बददुआ म्हणतात,ती चांगली नसते. व्यवहारात सचोटी नसल्यास माणसे जीवनातून उठतात.
दिलेले शब्द पाळणे व आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणिव ठेवणे आवश्यक आहे. कृतज्ञता बाळगल्याने आत्मशांती प्राप्त होते तर कृतघ्नपणा केल्याने मनोशiती भंग पावते.जे पेराल ते उगवेल या न्यायाने आपण केलेल्या कामाचा तसाच मोबदला आपणास मिळत असतो.यासाठी ईश्वराशी नाते जोडुन सत्य आणि सचोटीची कास धरल्यास जीवन यशस्वी होते.
एका राजाने आदल्या दिवशी घोषणा केली कि उद्या सकाळी दरबारात येऊन कोणी ही व्यक्ति ज्या वस्तूला हात लावील ती त्याची होईल.हे ऐकून प्रत्येक जण विचार करु लागला कि मी सोने, चांदी,नाणे, महाल घेईल. एक खूपच दरिद्री माणूस दरबारात आला व त्याने राजालाच हात लावला. आता राजाच त्याचा झाल्याने राजाची प्रत्येक वस्तू त्याची झाली. याप्रमाणे या सृष्टीचा जो राजा आहे तो ईश्वर / अल्लाह,त्याला आपले केले तर सर्व जग आपले होणार आहे.तेव्हा त्याला आपले करण्याचा जो काही मार्ग आहे तो आपण अंगीकारल्यास सर्व काही आपले होईल हे ध्यानात घ्यावे.
पवित्र रमजान महिन्याचा दुसरा अशरा संपन्न काल संपन्न झाला.
मगफिरत अर्थात माफीचा हा कालखंड प्रत्येकाने आपल्या कृत्यांबद्दल अल्लाहची माफी मागून व्यतीत केला आहे.
आपल्याकडून घडणारे प्रमाद हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.काही चुका मुद्दाम केल्या जातात,काही अनावधानाने होतात.कोणी कशाप्रकारे चुका केल्या हे परमेश्वर चांगल्या प्रकारे जाणतो.
अनावधानाने झालेल्या चुका तो माफ करतो. परंतु जाणून-बुजून, मुद्दामहून केलेल्या चुकांची माफी अल्लाह सुद्धा देत नाही.आपण जर ठरवून कुणाची निंदा-नालस्ती केली तर संबंधित व्यक्ती जोपर्यंत आपल्याला माफ करीत नाही तो पर्यंत अल्लाह सुद्धा तो गुन्हा माफ करणार नाही.एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी कुणी षड्यंत्र रचले असेल तर त्यात तो स्वतः अडकतो.
हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि कुणालाही कमी लेखू नका.कुणाची निंदा करू नका.ज्याचा त्याचा हिशोब ज्याला त्याला आखेरत मध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतरांची चिंता आपण करू नये.आपले आत्मपरीक्षण करावे.
अल्लाहच्या प्रती नेहमी कृतज्ञताभाव (शुक्रगुजारी) आपल्या मनात असला पाहिजे.
आपण सदैव कृतघ्नपणा (नाशुक्री)करीत असतो.
अल्लाहतआला हा आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतो.सत्तर मातांपेक्षा जास्त प्रेम करतो.आपण त्याला विसरून जातो.तो आपल्याला विसरत नाही.आपण अडचणीत सापडल्यावर देवाचा धावा करतो.तो मात्र दररोज आपल्यावर प्रेम करीत असतो.आपल्या सर्व गरजा पूर्ण करीत असतो.आपल्याला तंदुरुस्त ठेवतो.एक छोटासा जरी आजार झाला तरी आपली अवस्था बिकट होते. शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याची कृपा आहे.जे आंधळे आहेत त्यांना उजेडाचे महत्त्व समजते.जे अपंग आहेत त्यांना धडधाकटपणाचे महत्त्व समजते.तेव्हा आपण सातत्याने नेहमी सदैव अल्लाहची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
रमजान महिन्याच्या या कालखंडामध्ये ही दुआ प्रामुख्याने मागितली जाते कि,ऐ अल्लाह,तू माफ करणारा आहे, माफिस पसंत करतो, मलासुद्धा माफ कर.
ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता असते तो दयाळू असतो. त्याच्या आचार आणि विचारात दयाभाव असतो.
इतरांना मदत करतो. आणि मदत करून अल्लाहशी जवळीक (कुर्ब) साधीत असतो.रमजान महिन्यात आपण सुद्धा मनोभावे त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे. आपल्या आचरणाने कायमस्वरूपी त्याच्याबद्दलची कृतज्ञता केवळ शाब्दिक नव्हे तर आपल्या वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून सिद्ध केली पाहिजे.चांगले केले तर चांगले होणार आहे.ही श्रद्धा मनामध्ये ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे. अल्लाहतआला ला सुद्धा हेच अभिप्रेत आहे. हजरत पैगंबरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे, त्या मार्गानुसारच आपण आचरण केले पाहिजे. तरच आपली सुटका होणार आहे. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.(क्रमशः)
-------------------------------------

stay connected