रमजानुल मुबारक - भाग ११ ते १६

 

रमजानुल मुबारक - ११

*संयम - रोजाचा स्थायीभाव*

*सलीमखान पठाण*
      श्रीरामपूर
   *9226408082*

रमजान महिन्याचा दुसरा अशरा आता सुरु झाला आहे. दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे . उन्हाळ्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे.पूर्वी मंदिरे, मशिदी या कच्च्या होत्या मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते.आता खूप बदल झालाय. रात्रीच्या नमाज मध्ये स्लबमध्ये होणारी गरमीची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कुलरची व्यवस्था करण्यात येत आहे.प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे.आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही,मग जे रात्रंदिवस भट्टी समोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल.              
रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे . संयम(सब्र)निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच रमजानला सब्र का महिना असे ही म्हटले जाते.रमजान मध्ये रोजे सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो.एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो.हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते. उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते. ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणिव निर्माण होते. जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत परंतु या जगात जे दीन आहेत, गरीब, अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणिव रोजामुळे निर्माण होते.एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो. एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःच स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो.(क्रमशः)
--------------------------------
रमजानुल मुबारक - १२

*जग निर्माता , पालनकर्ता - ईश्वर अर्थात अल्लाह*  

*✒️सलीमखान पठाण*
           श्रीरामपूर
      *9226408082*

रमजान महिन्यात सर्वत्र कुरआन शरीफचे पठन होत असतांना त्यातील आशयाचे विवेचन ( तफसीर ) भाषांतरित करुन केले जाते. अरबी आयतांचा अर्थ आपल्या मातृभाषेत स्पष्ट केला जातो. प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहचे     फरमान कुरआनच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविले. त्याला काय पसंत आहे व काय नापसंत आहे, माणसांनी कसे आचरण करावे व कसे करु नये. या सृष्टीतील सर्व चराचर गोष्टींचा निर्माता हा ईश्वर अर्थात अल्लाह आहे. त्याचेच नियंत्रण सर्वत्र आहे. तो ज्ञात, अज्ञात , दृश्य किंवा गुप्त सर्व गोष्टी जाणणारा आहे. त्याची उत्कृष्ट अशी अनेक नावे आहेत. प्रत्येक वस्तूला स्वरुप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे. तो चिरंजीवी व चिरस्थायी आहे. माणसाला ऐकण्याची व पाहण्याची क्षमता व विचारी मन दिले आहे. जीवन व मृत्य देणाराही तोच आहे. पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू त्याच्याच आहेत.सप्त आकाशांचा स्वामी व सर्वाधिकारी तोच आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. तोच सर्वसृष्टीचा पालनकर्ता आहे. आपल्या मनातील लपविलेल्या व प्रकट केलेल्या सर्व गोष्टी त्याला ज्ञात आहेत. त्याच्या अस्तित्वाखेरीज इतर सर्व काही नश्वर व नाशवंत आहे. तोच सृष्टीचा प्रारंभकर्ता व पुनरावृती करणारा आहे. तो कधीही वचन भंग करीत नाही. तो सूक्ष्मदर्शी आहे. त्याला सर्व गोष्टींची खबर असते. सर्व स्तुती त्याच्यासाठीच आहे. तो बुध्दीवंत, माहितगार, परम कृपाळू व क्षमाशील आहे. प्रत्येक वस्तूवर त्याचे आधिपत्य आहे. तोच बनविणारा व तोच बिगडवणारा आहे. अपराधांना माफी देणारा व पश्चाताप स्विकारणारा तोच आहे. तो नजरेच्या चोरीला व ह्रदयातील रहस्यांनाही जाणणारा आहे. तो जेवढा क्षमाशील आहे तेवढाच यातनादायक शिक्षा देणाराही आहे. तो सर्वसाक्षी आहे. तोच वाली व त्राता आहे.
आपल्या भक्तांवर तो फार कृपाळू आहे. असत्याला नष्ट करतो. आशा आणि निराशा निर्माण करणारा तोच आहे. तो सृष्टीचा स्वामी आहे. हवे त्याला मुले देतो, हवे त्याला मुली देतो, हवे त्याला दोन्ही देतो व हवे त्याला वांझ बनवितो. तोच हसवितो, तोच रडवितो, तोच मरण व जीवन देतो, तोच धनवान बनवितो , संपत्ती प्रदान करतो, तोच भिकारी बनवितो . अशा प्रकारे ईश्वराचे सामर्थ्य व अधिकारांचे वर्णन कुरआन मध्ये विविध ठिकाणी केलेले आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले त्याची आराधना करण्यासाठी. एकमेकांना साह्य करण्यासाठी. अल्लाहने एक पुरुष आदम व एक स्त्री हव्वा निर्माण केली. या जगभरातील सर्व स्त्री पुरुष माणसे ही या जोडीची अपत्ये. लाक्षणिक अर्थाने सर्व एकमेकांचे नातेवाईकच. सर्व मानवजातीच्या रक्ताचा रंग एकच लाल. पण आजचे चित्र काय दिसते. माणसंच एकमेकांची वैरी झालेली दिसतात. भविष्यातील भारतासाठी हे चित्र परवडणारे नाही. भगवान महावीरांचा शांती, अहिंसेचा विचार आज पुढे नेण्याचा सर्वांनी विचार करावा.(क्रमशः)
----------------------------------------
रमजानुल मुबारक - १३

*इन्सानियत (मानवता) हाच मोठा धर्म*     

*✒️सलीमखान पठाण*
             श्रीरामपूर
       *9226408082*

रमजान महिन्याचा दुसरा भाग (अशरा) मगफिरत सध्या सुरु आहे. रहेमत( कृपादृष्टी)चा  काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी)चा दुसरा भाग सुरु होऊन तीन दिवस झाले आहे. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन,विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही. कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती, सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहेत. अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआन मधील आयता सारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला.पण त्यात कुणी ही यशस्वी होऊ शकला नाही. त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ग्रंथ आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे.
प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरु केला. त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अधापतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते.गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला.त्यांनी अल्लाह कडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला.सुरुवातीला हा आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधक ही समर्थक बनले.समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. मानवता,समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला.आपण सर्वसमान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही.सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या.
मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली.अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला.
आपसातील भांडण, तंटे,वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली.सुख,दुःख,हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रती ही तुमची काही कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले.
स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला.ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय.ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली.
आज जगामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे.व्यभिचार, दुराचार वाढत आहे. कुटुंबातील माणसं सांभाळणे अवघड झाले आहे.कधी काय होईल याचा नेम राहिलेला नाही.अशा गंभीर प्रसंगी हजरत पैगंबरांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे.
(क्रमशः)                      
------------------------------------
रमजानुल मुबारक - १४

*समता आणि बंधूता*

*✒️ सलीमखान पठाण*
           श्रीरामपूर
      *9226408082*

समाजातील सर्व घटकांना समान संधी देऊन आपली प्रगती साधण्याची संधी इस्लाम ने जगाला उपलब्ध करुन दिली आहे. जगभरातील सर्व लोकांना समान कायदा निर्माण करुन समतेचे सूत्र इस्लाम धर्माने निर्माण केले आहे.
रमजान महिन्यात सर्व मशिदी या भक्तांनी फुलून गेलेल्या असतात. गर्दीचा जणू महापूर आलेला असतो. पाच ही वेळची नमाज तसेच तरावीहच्या नमाजसाठी भक्तिभावाने सर्वांनी हजेरी लावलेली असते. नमाज ही अल्लाहसाठी आदा केली जाते. तशी प्रतिज्ञा(निय्यत) करुनच तिचा प्रारंभ होतो.एका रांगेत(सफ) शेजारी शेजारी एकमेकाला खेटून सर्वजण उभे राहतात.यावेळी कोण कोणाच्या शेजारी उभा राहील याचे बंधन नसते. बादशाहच्या शेजारी गुलाम,राजा शेजारी रंक, गोऱ्या शेजारी काळा असा कोणीही उभा राहू शकतो. तेथे कोणी उच्च किंवा कनिष्ठ नसतो. सर्वजण समान असतात.व्ही.आय पी दर्शन ही पध्दत तेथे नसते.नमाजची निश्चित केलेली वेळ झाल्यावर कुणाची ही वाट न पाहता प्रार्थनेला प्रारंभ होतो. मशिद हे अल्लाहचे घर असून तेथे सर्व समान आहेत. कोणताही भेदभाव तेथे केला जात नाही. खलिफा,बादशाह, सुलतान यांच्या काळात व आज ही जेथे इस्लामी राजवट आहे,अशा देशात बादशाह व त्याचे नोकर चाकर एकमेकांच्या शेजारी उभे राहून अल्लाहची प्रार्थना करतांना तसेच रोजा ईफ्तार करतांना एका ताटात बसलेले पहावयास मिळतात.
समानता किंवा मसावात हे इस्लाम धर्माचे मुख्य सूत्र आहे.
हजरत पैगंबरांनी त्यांच्या जीवनात जेव्हा हजच्या प्रसंगी शेवटचा खुत्बा (प्रवचन ) दिला. त्यावेळी जाहीर केले कि, लोक हो,आज तुमच्यावर तुमचा धर्म मी पूर्ण केला आहे. माझ्यावर जी जबाबदारी अल्लाहने दिली होती, ती सर्व मी,तुमच्या पर्यंत पोहोचविली आहे.तुम्ही सर्व समान आहात. कुणाचेही कुणावर वर्चस्व नाही.काळा गोरा, अरबी व अरबेतर असा कोणताही भेद इस्लाम मध्ये नाही. तुम्ही सर्व एकमेकाचे भाई भाई आहात.
इस्लामला जाती भेद मान्य नाही. पोटजाती हा प्रकार आपल्या कडे मुस्लिमांमध्ये व्यावसायावरुन पडला आहे.धर्म म्हणून इस्लाम व जात म्हणून मुस्लीम किंवा मुसलमान एवढी एकच जात मान्य आहे. शासनाच्या सवलतीसाठी जातीभेद हा इस्लाम मध्ये मान्य नाही.
सर्वांनी एकदिलाने रहावे,आपल्यातील गरजूंना सर्वांनी मिळून मदत करावी व त्यांचा भार हलका करावा. कुणीही विकासापासून वंचित राहू नये. सर्वांना प्रगतीच्या समान संधी प्राप्त व्हावी ही इस्लाम धर्माची शिकवण आहे. रमजान महिन्यातील विविध उपक्रम हे या समानतेचाच एक भाग आहे.(क्रमशः)
-------------------------------------
रमजानुल मुबारक - १५
*महत्वपूर्ण दिन - शुक्रवार*

*✒️ सलीमखान पठाण*
            श्रीरामपूर
       *9226408082*

पवित्र रमजान महिन्याने आज मध्यंतर गाठले आहे. आज पंधरा तारखेला रमजान महिन्याचे मध्यंतर पूर्ण होत आहे. आतापर्यंतचे चौदा दिवस कसे निघून गेले ते कळले सुद्धा नाही.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आठवड्याचे सात ही वार खूप महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक धर्माने एखाद्या विशिष्ट वाराला महत्त्व दिले आहे.इस्लाम धर्मामध्ये सुद्धा शुक्रवार म्हणजे जुमा (फ्रायडे) महत्वपूर्ण समजला जातो.शुक्रवारला ईद उल मोमिनीन म्हणजे मोमिनो की ईद का दिन म्हणून संबोधले जाते. इस्लामी इतिहासानुसार जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये शुक्रवार या दिवसाला फार महत्त्व आहे. या सृष्टीची निर्मिती शुक्रवारच्या दिवशी झाली.पृथ्वीची निर्मिती शुक्रवारी झाली.धार्मिक दृष्ट्या सर्व ऐतिहासिक घटना शुक्रवारी घडल्या असून या जगाचा शेवट सुद्धा शुक्रवारी होणार आहे म्हणून शुक्रवार हा दिन महत्त्वपूर्ण गणला जातो.
पृथ्वीवरील पहिला मानव असणारे हजरत आदम अलैसलाम ( जे समस्त मानवजातीचे पिताश्री आहेत) हे शुक्रवारीच स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले गेले.याच दिवशी अल्लाहने त्यांची माफी स्विकारली.शुक्रवारीच हजरत नुह अलै सलाम यांची नौका प्रचंड प्रलयानंतर किनारी लागली.शुक्रवारीच हजरत इब्राहीम अलै सलाम नमरुदच्या आगीतून सुखरुप बचावले.हजरत मुसा अलै सलाम फिरऔनच्या जाचातून मुक्त झाले.हजरत युनूस अलै सलाम माशाच्या पोटातून सुखरूप बाहेर आले.अशा खूप घटना सांगता येतील .
या दिवशी साप्ताहिक नमाज (नमाज ए जुमा) म्हणून अदा केली जाते. या दिवशी दुपारी सर्व जण मशिदीमध्ये एकत्र येतात आणि सामूहिक नमाज आदा करतात. रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार सुद्धा जुमातुल विदाअ म्हणून ओळखला जातो.
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे सोमवारला महत्व दिले जाते.ख्रिश्चन धर्मात रविवार (संडे) ला महत्त्व दिले जाते. असे प्रत्येकाचे वेगवेगळे वार निश्चित झालेले आहेत. अल्लाहने ही सृष्टी निर्माण केली त्याचबरोबर सृष्टीचा कारभार पुढे चालवण्यासाठी या सर्व चालीरीती,प्रथा,परंपरा रुढ झाल्या.धर्म वेगळे, पंथ वेगळे,वार वेगळे, पद्धती वेगळ्या असल्या तरी सर्वांचा हेतू हा मानवी कल्याण एवढाच आहे.मानवाच्या कल्याणासाठी सगळ्याच धर्मांनी विविध उपाय सुचविले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना माणसाने मात्र गफलत केली.त्यातून  संपूर्ण जगभरामध्ये धर्म आणि जातीच्या भिंती उभ्या राहिल्या.त्यातून मतभेद निर्माण झाले. वाद विवाद निर्माण झाले आणि मग सदाचाराची जागा तिरस्काराने घेतली.
प्रेषित हजरत पैगंबर साहेबांनी इस्लामची शिकवण देताना इतर कोणत्याही धर्माचा द्वेष करू नका असे सांगितले आहे. म्हणूनच आपण पाहतो की इस्लाम,
मुसलमान आणि त्यांच्या प्रथा याबद्दल सातत्याने कितीही लोक विरोधात बोलत असले तरी मुस्लिम समाजातील कोणीही इतर धर्मियांच्या धार्मिक चालीरीती, प्रार्थना यांना नावे ठेवीत नाही. कारण इस्लामची ती शिकवण नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वार्थीपणा शिरल्यामुळे आपले हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राजकारण केले जाते. त्याचा फटका धार्मिक कार्याला सुद्धा बसतो. रमजान महिन्यातील सहेरी आणि इफ्तारची वेळ लोकांना समजावी यासाठी मशिदीतून अजाण दिली जाते.
अजाण देणे म्हणजे लोकांना गोळा करणे नव्हे.फक्त एक माणूस त्याठिकाणी अजाण  पुकारतो आणि लोक घराघरातून रोजा इफ्तार करतात.
आजच्या दिवशी विशेष साप्ताहिक प्रार्थना नमाज ए जुमआ ही केली जाते. दुपारी नमाज ची अजान झाल्याबरोबर सर्व व्यवहार बंद करुन नमाजला जावे अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे . शुक्रवारी एक क्षण (पल) असा आहे कि या क्षणाला जे काही मागाल,दुआ कराल ती स्विकार केली जाते.पण तो क्षण नेमका कोणता हे अल्लाहने गुप्त ठेवलेले आहे.मात्र तो क्षण दुपारच्या वेळेत आहे असे म्हणतात ( क्रमशः)
-----------------------------------
रमजानुल मुबारक -१६

*दारिद्रय निर्मुलनासाठी - जकात*

*✒️सलीमखान पठाण*
          श्रीरामपूर
       *9226408082*

इस्लामी तत्वानुसार प्रत्येक ऐपतदार मुस्लीम व्यक्तिने जकात आदा केली पाहिजे.न देणारे गुन्हेगार आहेत.यासाठी आपल्या दैनंदिन व्यवहाराचा चोख हिशोब ठेवला पाहिजे.हजरत पैगंबरांनीही म्हटले आहे कि कुणाशी देणे घेणे व्यवहार करतांना नेहमी लिहून ठेवीत जा म्हणजे हिशोबात गोंधळ होत नाही.आपल्या देशात करप्रणाली एवढी किचकट आहे कि इन्कम टॅक्स किंवा सेल टॅक्स आदा करतांना खोटे रेकार्ड करुन कर चुकवेगिरीकडे बहुतेकांचा कल असतो. जीएसटीने तर व्यापारी व सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे.
मात्र इस्लामी जकातीमध्ये चोरी अथवा चुकवेगिरी करुन चालत नाही तर दिलेली जकात म्हणजे आपल्या संपत्तीचा मळ असून जकात दिल्याने माल स्वच्छ होतो.व्यापार, व्यवहार,शेती व सर्व प्रकारच्या उदिम व्यापारातील नफ्यावर जकात आदा करणे आवश्यक आहे.एक वर्ष झाल्यावर जकात दिली पाहिजे.
जकातीच्या अनेक बाबी आहेत ज्यावर जकात लागू आहे.दैनंदिन वापरातील गाड्या,राहते घर आदिवर जकात नाही.मात्र मालवाहू किंवा प्रवासी वाहने, भाडोत्री दिलेली घरे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जकात दिली पाहिजे.
शेकडा अडीच टक्के म्हणजे हजार रुपयाला पंचवीस रुपये एवढे जकातीचे प्रमाण आहे.जकात देतांना रोख स्वरूपात किंवा कपडे , धान्य, किराणा माल आदि स्वरूपातही दिली जाते. समाजातील गरिब व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण होऊन त्यांनाही इतरांप्रमाणे जीवन जगता यावे हा जकातीचा मूळ उदेयश आहे.मोठ्या शहरातून श्रीमंत लोक गरीब लोकवस्तीत जकातीच्या रकमेतून मदत वाटप करतात.
जकात देतांना जवळच्या गरजू नातेवाईकांना प्रथम दिली पाहिजे.मात्र आई, वडील,मामा हे जकातीची मदत घेण्यास पात्र नाहीत.इतर नातेवाईकांना ती देता येते.एखादयाच्या गरजा पूर्ण होतील एवढी मदत त्याला केली पाहिजे. १०० लोकांना देण्यापेक्षा १० लोकांना देऊन ते स्वयंपूर्ण होतील व पुढच्या वेळी त्यांना जकात घेण्याची वेळ येणार नाही अशा पध्दतीने नियोजन करुन समाजाच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
सामाजिक,आर्थिक विषमता दूर करण्यामध्ये जकातीचा मोठा वाटा आहे.कधी कधी व्यापार किंवा धंद्यामध्ये तोटा झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते.दिर्घ आजारपणामुळे ही कुटुंबाची वाताहात होते. गरीबीमुळे जीवन जगणे अशक्य होते अशा उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी जकातीच्या रकमेचे मोलाचे योगदान असते. ज्यांच्या मागे कुणी नाही अशा कुटुंबांना यातून मदतीचा हात दिला जातो.अनेक सामाजिक संघटना समाजातील अशा गरजू घटकांना वर्षभर मदत करीत असतात. या कामासाठी लागणारा निधी रमजान महिन्यात जकातीच्या रकमेतून एकत्रित केला जातो व गरजूंना त्याचे वितरण केले जाते.
इस्लामी संस्कृतीमध्ये जकातीची व्यवस्था ही सामाजिक दृष्ट्या समरसता कायम करण्यासाठी प्रामुख्याने अस्तित्वात आली आहे.समाजामध्ये कोणीही फार श्रीमंत आणि कुणीही फार गरीब राहू नये. सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे.यासाठी जे घटक कमकुवत आहेत.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून सामान्य जीवन जगता यावे हा या जकातीचा मूळ उद्देश आहे.
जकातीच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम समाजातील गरजू घटकांवर खर्च करावयाची असते. बेरोजगारांना रोजगार निर्मिती साठी देखील जकातीच्या रकमेचा विनियोग केला जातो. त्यातून पुढे त्यांनी स्वतः अर्थार्जन करावे. दरवर्षी कुणाकडे भिक मागू नये हा यामागचा उद्देश आहे. गोरगरिबांना रक्कम देताना धान्य,कपडे,
गृहपयोगी वस्तू या माध्यमातून ती दिली जाते.रोख रक्कम सुद्धा देतात.आपल्या उत्पन्नावर जेवढी जकात लागू झाली आहे तेवढी रक्कम या पद्धतीने वाटली जाते. हे करीत असताना थोडे थोडे पैसे वाटण्याऐवजी,दहा लोकांना देण्याऐवजी ती जर दोन लोकांना दिली तर ते दोन लोक त्या रकमेतून स्वतः च्या उदरनिर्वाहाची साधने निर्मिती करून पुढच्या वर्षी लाभार्थी मधून बाजूला होतात आणि अशा पद्धतीने समाजातून दोन गरजू कमी होऊन भविष्यात ते देखील जकात देऊ शकतात अशी ही आदर्श रचना आहे.
खलिफा हजरत उमर बिन अब्दुल अजीज यांच्या काळामध्ये समाजात एवढी सुबत्ता होती कि जकात घेणारे कुणीही नव्हते.आदर्श समाजव्यवस्था त्यांनी उभारली होती.
मुस्लिम समाजामध्ये परिवर्तनाचे वारे सध्या वहात आहे.शैक्षणिक बाबीसाठी प्रामुख्याने जकातीच्या रकमेचा विनियोग केला जात आहे. शासनाच्या मदतीशिवाय अनेक सामाजिक संस्था शिक्षणासाठी आपले योगदान देत आहेत. युपीएससीचे क्लासेस देखील या द्वारे चालविले जात आहेत.उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज मुस्लिम समाजाची अवस्था इतर मागासवर्गीय समाजापेक्षाही खूप वाईट आहे. शासनाकडून कोणतीही फारशी मदत समाजाला मिळत नाही म्हणून एससी-एसटी च्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु यासाठी शासन व्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. अशावेळी अनेक एनजीओ आपल्या परीने शैक्षणिक विकास करण्याचे कार्य करीत आहेत ही समाधानाची बाब आहे. जकात व्यवस्थित अदा न करणाऱ्याबाबत कुरआन शरीफ मध्ये तसेच हजरत पैगंबरांनी ठिक ठिकाणी सूतोवाच केले आहे. जे लोक धार्मिक निर्देशांचे पालन करून योग्यप्रकारे आपली जकात आदा करतात ते नफ्यात राहतात आणि जे दुर्लक्ष करतात ते तोट्यात जातात हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे प्रत्येक ऐपतदार मुस्लिम व्यक्तीने आपल्या सर्व व्यवहाराचा योग्य हिशोब करून जकात आदा करून आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.
इस्लाम धर्मामध्ये एक आदर्श समाज व्यवस्था निर्मितीसाठी योग्य अशी रचना केलेली आहे. आपला विकास करीत असताना इतरांचाही विकास झाला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन समाजाने पुढे गेले पाहिजे. समानता हा प्रमुख गुणधर्म यामध्ये आहे. सर्वांना विकासाची समान संधी प्राप्त करून दिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.जेवढे चांगले करता येईल तेवढे करावे.वाईट विचार डोक्यात आणू नये. ही सुद्धा शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.
(क्रमशः)
************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.