*संबंध*

 *संबंध*


          सुख दुःखाचा धागा त्यास जीवन असे नाव.त्यात भेटती आपले जिवलग, मन जुळता,जुळतात प्रेमाचे,मायेचे,स्नेहाचे जवळचे संबंध.काही नाते ही मनातून असतात...त्यांना कोणते नाव देण्याची गरज नसते.मनातून जे नाते जुळते ते खरे आपुलकीचे,माणुसकीचे नाते असते.वर वरच्या नात्याचा काही उपयोग नसतो.

         माणूस समाजप्रिय प्राणी आहे,तो एकटा जगू किंवा राहू शकत नाही.त्या साठी नित्य जीवनात त्याचा कोणाशी ना कोणाशी संबंध हा येतच असतो.तो आला तर तो माणूस...प्रत्येकाला येथे मन आहे..ते प्रत्येकाने जपले पाहिजे. काहींना सवयच असते,नित्य इतरांना नावे ठेवण्याची,बढाई मारण्याची...आपलेच म्हणणे खरे करण्याची,अशा स्वार्थी नात्याचा,संबंधाचा काही उपयोग नाही.त्या पासून चार हात दूर रहावे.आपल्याच नावाचा उपयोग करून मोठे होणारे लाखो भेटतात..अन् काम झाले की तेथेच आपली बदनामी करून मोकळे ही होतात..मग त्याला काय अर्थ राहतो..ते ही विसरतात..आपल्याला नित्य पाहणारा कोणी तरी आहे? त्यांचे अस्तित्व कधी विसरू नका म्हणजे झालं.

      रस्त्याने जाणारे भाऊ बहिण असले तरी,आपण त्यांना नावे ठेवायला कमी पडत नाही,किंवा त्यांचे नको ते संबंध जोडून ही रिकामे होतात? जिभेला हाड च नाही ना? तुम्ही तरी काय करणार? आपल्या अवयवांचा दुरुपयोग केल्याशिवाय करमत नाही ना? चांगले विचार मनाला शिवत च नाही?जे स्वतःच्या मनात,डोक्यात येते ते आपण बोलत राहतो,पण त्याचा दुष्परिणाम किती होतो,हेच विसरत चाललो आहे.माया,ममता,जिव्हाळा नित्य तुडविली जात आहे.

        गोतावळा कमी कमी होत चालला आहे.जो तो स्वार्थी जीवन जगत आहे. खोट्या आशेवर जीवन जगुन काय उपयोग ? मायेचे नाते हे खरे आपले नाते असते.संबंध हा शब्द खूप खोल आहे.त्याच्यात खूप मोठा अर्थ दडला आहे.

      प्रत्येकाने एकमेकांशी जिव्हाळ्याचे,सौख्याचे संबंध ठेवावे.रक्ताच्या नात्यापेक्षा हेच लोक आपल्या लवकर अन् निस्वार्थी वृत्तीने मदतीला येतात.माणुसकी धर्म पाळणारे लोक आपल्या जिवाभावाची असतात.सरड्यासारखी रूपे बदलणारी संबंध नसावी.ते निर्मळ,प्रेमळ,स्पष्ट,पवित्र,एकनिष्ठ, घनिष्ठ असावे.मांडुळालाही दोन तोंडे नसतात,पण येथे माणसांना दोन तोंडे आलीत गोगलगाय अन् पोटात पाय अशी लोक आहेत..नित्य बुरखा घालून अवती भवती वावरतात.पण,त्याचा काय उपयोग.खायचे दात वेगळे,अन् ...जसे दिसते तसे असतेच असे बिल्कुल नाही.समाधान हा फार मौल्यवान खजिना आहे..तो जीवनात नित्य जपावा.

त्याची सर कशालाच नाही? ते ज्याच्याजवळ आहे,त्याचा सारखा कुबेर कोणीच नाही? माणुसकीचा पुजारी तिन्ही लोकी पुजला जातो.कोणी माथ्याला टिळा,गंध लावला म्हणजे तो खूप मोठा योगी होत नाही.त्याचासारखा जहरी साप कोणताच नाही.

     म्हणून म्हणावेसे वाटते....संबंध हे जिवाभावाचे,निस्वार्थी,प्रेमळ, मायाळू,स्पष्ट,एकनिष्ठ असावे..त्यात बिल्कुल गर्व नसावा..


सौ.प्रतिमा अरुण काळे

निगडी प्राधिकरण पुणे,४४





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.