।।भेटला विठ्ठल।।

 ।।भेटला विठ्ठल।।



मागच्या आठवड्यात अलिबाग उपजिल्हाधिकारी असलेले माझे जीवलग मित्र श्री दत्तात्रय नवले यांच्या मातोश्रीचे प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या मूळगावी भानगाव ता.श्रीगोंदा येथे होते..

त्यानिमित्ताने अहमदनगर ते भानगाव असा माझा प्रवास सुरु होता.सकाळची वेळ होती आणि त्यातही सोबतीला कोणीच नसलेने,गाडीत मस्त गाणी ऐकत होतो..गाणं सुरू होतं.. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल।।..

   ..आज का कुणास ठाऊक ..मला अण्णांची फार आठवण येत होती..अण्णा म्हणजे माझे वडील श्री विठ्ठल गायकवाड...अख्खी हयात वारकरी सांप्रदयात घालवलेले अतिशय सरळमार्गी आणि साधेभोळे गृहस्थ..

स्वतःची शेती,आपला संप्रदाय, आणि आपला पांडुरंग हेच त्यांचे जग.गावाकडे आख्या पंचक्रोशीत विठोबा अण्णा.म्हणूनच घराघरात ओळख असलेले माझे अण्णा,बरेच दिवस अण्णांची भेट झालेली नव्हती म्हणून कदाचित त्यांची आठवण येत असावी असे वाटत होते...विचारांची तंद्री,गाडीत सुरू असलेले गाणे,आणि भावनांचा कल्लोळ यांची सरमिसळ होत होती...

  रस्त्याने बरेच अंतर गेल्यावर मुख्य रस्ता सोडून कच्च्या आणि खाच खळगे असलेल्या रस्त्याचा प्रवास सुरु झाला,बरेच अंतर पुढे गेल्यावर एक सत्तरीतले गृहस्थ रस्त्यावर पुढे जाताना दिसले,मळकट पांढरा सदरा, फाटके धोतर,डोक्यावर घामाने काळी झालेली गांधी टोपी..अनवाणी चालता चालता मधेच एखादी दुचाकी,चारचाकी दिसली तर ते हात करत होते..पण त्यांचा एकूणच अवतार पाहता त्यांना कोणी लिफ्ट देण्यास तयार नव्हते. मी गाडी थांबवली त्यांना गाडीत घेतले आणि गप्पा मारत आमचा प्रवास सुरु झाला,बोलता बोलता त्यांनी मला नवले साहेबांच्या इथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आहे तिकडे चाललो असल्याचे सांगितले,मी त्यांना गाडीत घेतल्याचा आंनद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता,उत्स्फुर्तपणे माझ्याशी स्वतःची शेतीवाडी,कुटुंब,गाव याविषयी माहिती सांगत होते,लहान पणा पासून घरात वारकरी पाहत आलोय खूप सरळ आणि साधी असतात ही माणसं यांना कधी स्वतःच्या गरिबीची,फाटक्या कपड्यांची लाज वाटत नाही..की गडगंज श्रीमंत होण्याचे स्वप्न पडत नाही..पांडुरंगाने दिलेले आयुष्य आनंदात आणि समाधानात घालवायचे...बस्स एवढंच त्यांना माहिती असते....गप्पा रंगल्या आणि कार्यक्रमाचे ठिकाण आले...इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असलेने प्रचंड जनसमुदाय लोटलेला.. मी गाडी पार्क केली.. ते गृहस्थ गाडीतून उतरले आणि माझ्या पाया पडले अचानक घडलेल्या ह्या प्रसंगाने मी गांगरलो मला कळेना काय बोलावे,मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला,पण ते म्हणाले,"असे कसे?मी कीर्तनाला निघालो तेव्हा वाटले उशीर होईल,पण माझा माझ्या पांडुरंगावर विश्वास होता त्यानेच तुम्हाला माझ्यासाठी पाठवले...साहेब तुम्हीच माझे पांडुरंग.."

 मला काय बोलावे कळेना..मी काही बोलायच्या आत ते गृहस्थ निघून गेले..त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत माझे डोळे पाणावले...

  मनात आले ..भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल....


    विष्णू गायकवाड,अहमदनगर





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.