आष्टी ते साबलखेड रस्त्याची दुरावस्था कधी थांबणार ?
सोमवारी या मागणी साठी कड्यात रस्ता रोको आंदोलन करणार - अनिल ढोबळे
आष्टी तालुक्यातील आष्टी ते साबलखेड हा १७ किलोमीटर चा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेकांचे अपघातामध्ये बळी गेले आहेत. सदरील रस्त्याचे कामासाठी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात निधी मंजूर झाला आहे मात्र अजूनही काम सुरू न झाल्यामुळे सोमवारी कडा येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी दिली.
तहसीलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी, कडा ते साबलखेड या सतरा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यावर प्रवास करणे अत्यंत जिकरीचे बनले आहे. या रस्त्यासाठी १२१ कोटी रुपये निधी मंजूर झाला असला तरी अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. टेंभुर्णी येथील कोणीतरी कंत्राटदार हे काम करणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र कुठे झाडे मोजणे कुठे तर कुठे विजेचे खांब मोजणे तर कधी पाईपलाईनची माहिती घेत आहोत असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र कुठेही काम सुरू झाले असल्याचे दिसत नाही. अशा संथ गतीने काम सुरू राहिले तर सतरा किलोमीटर काम पूर्ण व्हायला सतरा वर्षे लागतील. त्यामुळे हे काम नक्की सुरू कधी होणार आहे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरु न झाल्यास कडा येथे सोमवार दि. २० रोजी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर अनिल ढोबळे, सुनील अष्टेकर, महावीर गुगळे, संतोष मोटे, सुनील देशमुख, प्रवीण ढवण, शहादेव गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
stay connected