*राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी बीड जिल्हा बंदची हाक - शिवप्रेमी नागरिकांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय*
बीड दि. ०७ (प्रतिनिधी) : आज दिनांक ७ डिसेंबर रोजी सूर्या लॉन्स मध्ये बीड शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांची एक व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध पक्षाचे, संघटनांचे सामाजिक संस्थांचे, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील बैठकीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जे अक्षम्य विधान केले या विधानाचा प्रथमच तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्याबरोबरच भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानबरोबरच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा महाराजांच्या संबंधी अतिशय अवमानकारक शब्द वापरून महाराजांच्या आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळ केलेला आहे. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर मंगलप्रसाद लोढा, रावसाहेब दानवे, संतोष दानवे, प्रसाद लाड ही मालिका भाजपच्या पिलावळीने चालू ठेवली याचा देखील या बैठकीमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या संबंधाने साधकबाधक विचार करून बीड शहरातील सर्व राजकीय पक्षाचे समविचारी संघटनांचे शिवप्रेमी एकत्र जमले आणि त्यांनी एकमुखाने दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा बंद करण्याचे आवाहन केलेले आहे. तरी शाळा, कॉलेज, व्यापारी बांधवांनी बंदला सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, सावता परिषद, रिपाई, एमआयएम, आम आदमी पार्टी, स्वराज्य संघटना, महिला फेडरेशन, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शिवक्रांती संघटना, मराठा क्रांती मोर्चा शिव संग्राम, राष्ट्रीय छावा आणि विविध शिक्षक संघटना, मराठा विचार मंच सह सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित होते. दि. १२ डिसेंबर रोजी बंदच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मुक मोर्चा काढण्यात येईल. बीड शहरातील तमाम संघटनेचे लोक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. ज्या निवेदनामध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येईल. त्या मोर्च्यात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तरी सर्व शिवप्रेमी बांधवांनी आणि भगिनींनी या मोर्चाची नोंद घेऊन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि बीड जिल्हा बंद यशस्वी करावा अशा प्रकारचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
stay connected