चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान द्या भीमराव धोंडे यांची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे मागणी; पाणीटंचाई, टँकर मंजुरी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा

 चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान द्या
भीमराव धोंडे यांची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे मागणी; पाणीटंचाई, टँकर मंजुरी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा



बीड :


जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चारा व पाणीटंचाई, जनावरांचे संगोपन आणि ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकऱ्यांना प्रति जनावर मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.


चारा छावण्यांच्या व्यवस्थापनापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत दिल्यास ते स्वतःच्या सोयीनुसार जनावरांसाठी चारा उपलब्ध करू शकतील. शासनाने निश्चित केलेल्या अनुदानापेक्षा दहा रुपये कमी दिले तरी चालतील; मात्र मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मांडली.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत. टँकर मंजुरीसाठी ग्रामपंचायतींना अधिकार देणारे आदेश काढावेत, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे गावातील पाणीटंचाईची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळामुळे अनेक गावांमधील मजूर रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी गावातच रोजगार हमीची आणि दुष्काळ निवारणाची कामे सुरू करावीत. मजुरांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळेल, अशा योजना प्रभावीपणे राबवाव्यात. पाणी, चारा आणि रोजगार या तीन प्रमुख प्रश्नांवर एकाच वेळी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळ दूर करण्यासाठी कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यांतील अतिरिक्त पाणी तसेच उजनी व जायकवाडी धरणांतील पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे दुष्काळी भागात आणण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. आष्टी, पाटोदा परिसराला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास शेती आणि स्थानिक रोजगाराला आधार मिळू शकतो, असेही त्यांनी जिल्हाधिकारी जॉन्सन यांना सांगितले.

----

थेट अनुदानाने चाऱ्याचा प्रश्न सोडवा

चारा छावण्या सुरू करण्याऐवजी जनावरांमागे मंजूर असलेले अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे. शेतकऱ्यांना स्वतः चारा खरेदी करता येईल आणि जनावरांचे संगोपन करणे सोपे होईल, अशी भीमराव धोंडे यांची मागणी आहे.

----

टँकर मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकर मंजूर करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना द्यावेत. स्थानिक पातळीवर पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेता येईल, अशी भूमिका धोंडे यांनी मांडली.

----

गावातच रोजगार उपलब्ध करा

दुष्काळामुळे मजुरांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. हे रोखण्यासाठी रोजगार हमीची आणि दुष्काळ निवारणाची कामे गावातच सुरू करावीत. स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळेल, अशा योजना प्रभावीपणे राबवाव्यात.

----

दुष्काळी भागाला हवे हक्काचे पाणी

कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यांतील अतिरिक्त पाणी तसेच उजनी व जायकवाडी धरणांतील पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे आष्टी-पाटोदा परिसरात आणावे. कायमस्वरूपी सिंचनाची सोय झाल्यास दुष्काळाचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर