गेट टू गेदरचे शालेय जीवनात महत्व काय ?
*गेट टू गेदरचं शालेय जीवनात महत्व काय? हे शब्दात मांडणं कठीण आहे. तो क्षण जो अनुभवतो. त्याला खरंच स्वर्गप्राप्तीची अनुभूती प्राप्त होत असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
तो गेट टू गेदरचा दिवस. त्या दिवशी जुने विद्यार्थी शाळेला भेट द्यायला आले होते. त्यांनी एक दिवस शाळेत राहून आपल्या गतकाळातील शाळेचा अनुभव घेतला. नेहमीप्रमाणेच शाळा भरली. ज्यात संगीतखुर्ची व नृत्य यांचा समावेशही करण्यात आला होता. जेवनखावण वैगेरे सर्व काही होतं.
तो गेट टू गेदरचा दिवस. त्या दिवशी सर्व मुलं शाळेत आली. त्यांनी शाळा सजवली. जसा आपल्या घरी वाढदिवस साजरा करतो. तशीच शाळा सजावट करण्यात आली. तसंच शाळेचं सुशोभन करण्यात आलं. त्यानंतर भाषणं झाली व भाषणात एक मुलगी म्हणाली, 'माझी अंतिम इच्छा होती की मला माझ्या दहावीच्या शाळेत एक दिवस तरी जायचं आहे. ती माझी अंतिम इच्छा आज पुर्ण झाली. आता कोणतीच इच्छा बाकी उरलेली नाही. तसं बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं की जुन्या शाळेत एखाद्या दिवशी तरी जावं. अनुभवावा तो दिवस. अन् आज अगदी तसंच घडलं.'
अंतिम इच्छा........ अंतिम इच्छा तेव्हाच केली जाते. जेव्हा आपल्याला सगळं मिळतं आणि एक इच्छा बाकी असते. तसंच त्या मुलीला वाटलं.
आपल्या सर्वसाधारण इच्छा असतात की आपलं शिक्षण पुर्ण व्हावं. आपला विवाह व्हावा. चांगला पती मिळावा. सासर चांगलं मिळावं. त्यातच सासूसासरे चांगले मिळावे. मुलंबाळं चांगली निघावी. तशी तिची ती अंतिम इच्छा. तिला सगळं मिळालं असेल कदाचित. परंतु शाळेत येवून एक दिवस आनंदाचा घालवायचा असेल. तो तिला घालवायला मिळाला. म्हणजेच तिची इच्छा पुर्ण झाली. जिला तिनं एक नाव दिलं, अंतिम इच्छा.
इच्छा...... अंतिम इच्छा बऱ्याच असतात. त्या इच्छा कोणी मृत्यूच्या वेळेस करतात तर कोणी मधातही करु शकतात. बरेच जण यात गैरसमज ठेवतात. असं मानलं जातं की आपली संपण्याची वेळ येते. तेव्हा अंतिम इच्छा केली जाते. विचारात घेतली जाते. परंतु तसं काही नाही. अंतिम इच्छेबाबत आपल्या मन जेव्हा विचार करायला लावतं व वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात जेव्हा निर्माण होतात. तेव्हा त्यावर उपाय म्हणून ही इच्छा केली जाते. जी पुर्ण व्हावी असं वाटत असते आणि ती जेव्हा पुर्ण होते. तेव्हा असीम असा आनंद प्राप्त होतो. त्याला अंतिम इच्छा म्हणतात. तशी तिची अंतिम इच्छा. ती अंतिम इच्छा तशी आजच संपणार नाही आणि संपूही नयेच. मात्र तिच्या त्या बोलण्यावरुन कळलं की मुलांची आणि खासकरुन विद्यार्थ्यांची अंतिम इच्छा असते आपल्या जुन्या शाळेत जाणे. आपला एक दिवस त्या शाळेत घालवणे. ज्यात तोच एक दिवस जर आपल्या वाट्याला आल्हाददायक व उत्साहवर्धक पद्धतीनं आला तर त्याचं मूल्यांकन आणि सीमांकन करणं कठीण जातं. तो आनंद शब्दातून व्यक्त करता येत नाही. त्याचं मोजमापही करता येत नाही. तेच त्या दिवशी घडलं. जे स्वप्न नव्हतं तर सत्य होतं. तेच अंतिम सत्य आणि तीच अंतिम इच्छाही होती.
प्रत्येकाची दहावीपर्यंतचं शिकलेल्या शाळेत जाणे. हे इच्छा म्हणजे अंतिम सत्यच आहे म्हणजे प्रत्येकाची इच्छा विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंतिम इच्छा तशाच असू शकतील. तशा अंतिम इच्छा वेगवेगळ्या असतात. हे सांगायला नकोच. फाशावर जाणाऱ्या लोकांनाही प्रत्येकाच्या अंतिम इच्छा विचारल्या जातात. ज्यात त्या इच्छेची प्रतिपुर्ती केली जाते.
अंतिम इच्छेबाबत सांगायचं झाल्यास अलिकडील काळात अशा अंतिम इच्छेला शालेय जीवनात अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. शाळेतून शिकून गेलेल्या मुलांना नेहमी वाटत असतं की आपण आपल्या शाळेत जावू. तिथं आपल्या शाळेत शिकण्यादरम्यानचा एक दिवस अनुभवू. तसंच घडलं त्या दिवशी व त्या दिवशी तोच दिवस अनुभवण्यासाठी फार दुरदुरुन मुलं मुली आले. ज्यांनी शाळेत आनंद अनुभवला.
शाळेत जसे विद्यार्थी आले होते कार्यक्रमाला. तसेच त्यांचे शिक्षकही आले होते. जे निवृत्त झाले होते कितीतरी वर्षापुर्वी. कोणी खरंच चालता येण्यासारखे नव्हतेच. तरीही ते आले होते व तेही आपल्या शाळेदरम्यानचा दिवस अनुभवत होते.
शाळेचं हे एकत्रीपण. ते एकत्रीपण वाखाणण्याजोगंच असतं. कारण बरीच वर्ष झालेली असतात आपल्या शाळा सोडण्याला. ज्यातून आठवण येत असते शाळेची. सारखी हूरहूर लागलेली असते. अशातच जेव्हा एखादा प्रसंग उद्भवतो, शाळेत येण्याचा. तेव्हा अगदी बरं वाटत असतं. मग ओढ निर्माण होते शाळेची आणि अचानक पावलं वळतात. ती पावलं कितीही आपण दूर असो. कितीही आपल्याला खर्च येवो. कितीही रस्त्यावर संकटं येवो. आपण सर्व त्या संकटांवर मात करुन शाळेत येत असतो. ज्यातून शाळेत आल्यानंतर जेव्हा आपण शाळेचा गतकाळातील अनुभव अनुभवतो. तेव्हा अगदी हायसं वाटतं. वाटत असतं की असले क्षण वारंवार यावेत. परंतु त्याला बंधन असतं. परंतु असले क्षण अनुभवण्यासाठी जी इच्छा निर्माण होते. त्या इच्छेलाच आपण अंतिम इच्छाही म्हणू शकतो. हे सत्य आहे.
दहावीपर्यंतचं आपलं शिक्षण. ज्यातून दंगामस्ती करीत करीत मुलं एकेक पायरी चढत असतात. मग अंतिम वर्ष उजाळतं व निरोप समारंभ येतो. तेव्हा या शाळेत कधीच यायला मिळणार नाही. हे क्षण कधीच अनुभवायला मिळणार नाही. असं वाटून दुःख होतं. जे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. दहावी झाल्यानंतर पुढे कितीही शिकलो, फार मोठ्या पदावर गेलो, तरी तो दहावा वर्ग व त्या वर्गात केलेली कृत्य अर्थात दंगामस्त्या सतत आठवत असतात. त्या आठवल्या की गहिवरुन येतं. वाटतं की एखाद्यावेळेस आपण परत शाळेत जावं. शाळेचे क्षण अनुभवावे. परंतु तसं घडत नाही. अन् हे जेव्हा घडतं. तेव्हा बर्याच प्रमाणात आनंद होतो. ज्या आनंदासाठी दहावी झाल्यानंतर आपण तळपत असतो. असा असीम आनंद अनुभवावयास मिळाला की विद्यार्थी भावूक होतात. तसेच शिक्षकही. एक शिक्षक यावर म्हणाले की हा आम्हाला पुरस्कारच आहे.
पुरस्कार...... शिक्षकांच्या जीवनात पुरस्काराला तेवढे महत्व नाही. पुरस्कार हा त्या शिक्षकांच्या चांगल्या कार्याची पावती होवूच शकत नाही. कारण सर्वच शिक्षक हिरीरीनं कामे करतात व सर्व शिक्षक तसं पाहिल्यास पुरस्काराचे भागीदार ठरतात. तसं पाहिल्यास सर्वच शिक्षक हे अपुर्ण असतात. ते जीवनभर विद्यार्थीच असतात. त्यांच्यात पुर्णत्व तेव्हाच येतं, जेव्हा त्याचे माजी विद्यार्थी त्याला भेटायला येतात. भेटतात. त्या शिक्षकांचे सुखदुःख विचारतात. ते दूर करण्याचा प्रयत्न करतात नव्हे तर त्यांना एखादं बक्षीस देवून त्यांचा गौरवही करतात. ती गोष्ट शिक्षकांच्या जगण्याला, जीवनाला व त्याच्या असण्याला नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाला लाभदायी ठरणारी असते नव्हे तर त्याच्या अपुर्णतेस आकार देणारी असते. हे तेव्हाच घडतं, जेव्हा असे गेट टू गेदरचे कार्यक्रम होतात. तसे कार्यक्रम आयोजित केले जातात. आयोजित करण्यात येतात.
महत्वाचं सांगायचं झाल्यास गेट टू गेदरचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेतून गेल्यानंतर कालांतरानं का होईना, शाळेत यावे. आपल्या शिक्षकांना भेट द्यावी. आपल्या शिक्षकांचे हालहवाल विचारावेत. जेणेकरुन शिक्षकांनाही बरे वाटेल. तसाच एखादा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम घडवता आला तर घडवावा. कारण शिक्षक म्हणून शिकविणारा घटक हा आपल्या विचारानं कितीही पुढे गेला तरी त्यास पुर्णत्व प्राप्त होत नाही. त्याला पुर्णत्व प्राप्त होण्यासाठी गरज पडते, त्यानं शिकविलेल्या गतकाळातील माजी विद्यार्थ्यांची. ते ज्या शिक्षकांना भेटत असतील, तो शिक्षक नशीबवान असतो व त्यालाच पुर्णत्व प्राप्त होतं. तसंच विद्यार्थ्यांचंही आहे. ज्या विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक जर त्या विद्यार्थ्यांना भेटले असतील भविष्यात. तर तो विद्यार्थी खरंच नशीबवान असतो. ते भेटणं म्हणजे त्याला अंतिम इच्छा पुर्ण झाल्यासारखं वाटते नव्हे तर तो आनंद गगणात मावेनासा असतो. त्या आनंदाचं कधीच मोजमाप करता येत नाही. म्हणूनच गेट टू गेदरला शालेय जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

stay connected