*वृक्षतोड विकास की विनाश ?*
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा, सावली, फळे, फुले, लाकूड, औषधे आणि अनेक उपयुक्त वस्तू मिळतात. झाडे ही पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहेत. मानव, पशू, पक्षी आणि इतर अनेक जीवांचे जीवन झाडांवर अवलंबून आहे. परंतु आजच्या आधुनिक युगात माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करीत आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्ते बांधणी आणि इमारतींचे बांधकाम यांमुळे जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत.
वृक्षतोड कशासाठी
विविध कारणांसाठी झाडे तोडण्याच्या प्रक्रियेला वृक्षतोड म्हणतो. पूर्वी माणूस आपल्या गरजेनुसार मर्यादित प्रमाणात झाडांचा उपयोग करीत असे. परंतु आज वाढत्या गरजा आणि आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. जंगलातील हजारो झाडे तोडून त्या जागी घरे, कारखाने, रस्ते, रेल्वेमार्ग आणि मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. अनेक ठिकाणी शेतीसाठीही जंगलातील झाडे नष्ट केली जातात. विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी ही हानी भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे वृक्षतोड होण्यामागे अनेक कारणे आहेत. वाढती लोकसंख्या हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे घरांची, अन्नाची, पाण्याची आणि इतर सुविधांची गरज वाढते. या गरजा पूर्ण
करण्यासाठी जंगल तोडून जंगलातील जमिनीचा वापर केला होत आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरीकरण. शहरांचा विस्तार करण्यासाठी नवीन रस्ते, इमारती, शाळा, रुग्णालये, कारखाने आणि व्यापारी संकुले बांधली जातात. यासाठी अनेक झाडे तोडली जातात. लाकूड, कागद, फर्निचर आणि इंधन मिळवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. काही ठिकाणी बेकायदेशीरपणे झाडे तोडली जातात. वृक्षांचे महत्त्व न समजणे आणि पर्यावरणाविषयी जागरूकतेचा अभाव हीदेखील वृक्षतोडीची महत्त्वाची कारणे आहेत. झाडे ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे वातावरणातील वायूंचे संतुलन राखण्यास मदत होते. परंतु मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढण्यास मतद होत आहे. परिणामी जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यांसारख्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढते. शहरांमध्ये सिमेंट आणि काँक्रीटच्या इमारती वाढत असल्याने उष्णता अधिक जाणवते. झाडांची सावली कमी झाल्यामुळे परिसराचे तापमान वाढते. त्यामुळे माणसांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास स्थानिक हवामान आणि पर्जन्यमान बदलू शकते. झाडे कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भूजलसाठ्यांचे पुनर्भरण कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टंचाई वाढल्यास शेती, उद्योग आणि मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
वन्यजीवांचे जीवन धोक्यात
जंगले ही अनेक वन्यप्राण्यांची नैसर्गिक घरे आहेत. वाघ, सिंह, हत्ती, हरिण, माकडे, ससे, विविध पक्षी आणि असंख्य कीटक जंगलात राहतात. त्यांना जंगलातून अन्न, पाणी आणि निवारा मिळतो. परंतु जंगलांची तोड झाल्यामुळे या प्राण्यांचे नैसर्गिक जिवन उध्ववस्त होत आहे. अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागतात. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. वन्यजीव नष्ट झाल्यास निसर्गातील अन्नसाखळी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. झाडे आपल्याला शुद्ध हवा देतात आणि धूळ कमी करण्यास मदत करतात. शहरांमध्ये झाडांची संख्या कमी झाल्यास वायुप्रदूषणाचा त्रास अधिक जाणवू शकतो. प्रदूषित हवा आणि वाढते तापमान यांमुळे श्वसनाचे विकार, उष्णतेमुळे होणारे आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात.
झाडांच्या अभावामुळे माणसाला सावली कमी मिळते. उन्हाळ्यात रस्ते, मैदाने आणि मोकळ्या जागा अधिक तापतात. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांना उष्णतेचा अधिक त्रास होऊ शकतो.
झाडांपासून मिळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींचे अस्तित्वही जंगलांवर अवलंबून असते. जंगलांचा नाश झाल्यास काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतीसाठी अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि पाणी आवश्यक असते. वृक्षतोडीमुळे या तिन्ही घटकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जमिनीची धूप झाल्यामुळे सुपीक माती कमी होते.
*वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजना*
वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले पाहिजे. शाळा, महाविद्यालये, घरे, रस्त्यांच्या कडा आणि मोकळ्या जागांमध्ये योग्य प्रजातींची झाडे लावली पाहिजेत. मात्र, केवळ झाडे लावून उपयोग नाही, तर त्यांना नियमित पाणी घालून त्यांचे संगोपनही केले पाहिजे.जंगलांचे संरक्षण करण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य कारवाई झाली पाहिजे. जंगलातील वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे संवर्धन केले पाहिजे. शाळांमध्ये वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी व्हावे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज
झाडे लावणे हे केवळ एक दिवसाचे काम नाही. झाडांची काळजी घेणे आणि त्यांना मोठे होण्यासाठी मदत करणे ही दीर्घकालीन जबाबदारी आहे. आपण लावलेले एक छोटेसे रोपटे भविष्यात मोठा वृक्ष बनू शकते. त्या वृक्षामुळे अनेकांना सावली मिळेल, पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी जागा मिळेल आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल.
आपण विकास जरूर केला पाहिजे; परंतु तो निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर निसर्गाचे रक्षण करून केला पाहिजे. प्रत्येकाने झाडांचे महत्त्व ओळखून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा, हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणला पाहिजे.
वृक्षांचे रक्षण करूया,
निसर्गाचा समतोल राखूया!”


stay connected