म. मुस्लिम कबीर, लातूर
******************************
तरुणाई हरवत चाललीय… मानसिक आरोग्याचा वाढती समस्या...
******************************
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाच्या सुखसोयी वाढल्या, तंत्रज्ञान हाताशी आले आणि संवादाची साधनेही मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र या सगळ्याबरोबर मनःशांती मात्र कमी होत चालली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा, करिअरची चिंता, नात्यांमधील बदल आणि भविष्याबाबतची असुरक्षितता यामुळे विशेषतः तरुण पिढी मानसिक तणावाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे.
परवा एका दैनिकात बातमीचा मथळा अत्यंत अस्वस्थ करणारा आहे“देशात ४१ टक्के तरुण लपवतात मानसिक आजार.” ही आकडेवारी केवळ एक बातमी म्हणून वाचून पुढे जाण्याची वेळ आता राहिलेली नाही. या आकडेवारीच्या मागे हजारो-लाखो तरुणांचे न बोललेले दुःख, भीती, नैराश्य, अस्वस्थता आणि एकटेपणा दडलेला असू शकतो.
मानसिक आजार लपविण्याची वेळ का येते?
शारीरिक आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो. ताप आला, रक्तदाब वाढला किंवा एखादी शारीरिक समस्या निर्माण झाली तर उपचार घेण्यास फारशी लाज वाटत नाही. मात्र मनावर ताण आला, नैराश्य जाणवले, भीती सतावली किंवा सतत अस्वस्थता वाटू लागली की अनेक जण ते स्वीकारण्यासही कचरतात.
यामागे समाजातील एक चुकीची धारणा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे“मानसिक समस्या म्हणजे कमजोरी.”ही धारणा बदलण्याची गरज आहे.मानसिक आरोग्य बिघडणे म्हणजे व्यक्ती कमजोर आहे, अपयशी आहे किंवा त्याच्यात इच्छाशक्ती नाही, असे अजिबात नाही. शरीराप्रमाणे मनालाही थकवा येतो, जखम होते आणि कधी कधी उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी मदत मागणे ही कमजोरी नसून स्वतःची काळजी घेण्याची जबाबदारी आहे.
@' सगळं ठीक आहे’ म्हणणाऱ्या चेहऱ्यामागे काय दडलंय?------
अनेक तरुण आपली मानसिक अवस्था इतरांपासून लपवतात. बाहेरून पाहता एखादा तरुण अत्यंत आनंदी, आत्मविश्वासू आणि यशस्वी दिसू शकतो; परंतु त्याच्या मनात सतत संघर्ष सुरू असण्याची शक्यता असते.
सोशल मीडियाने या समस्येला आणखी एक परिमाण दिले आहे.इन्स्टाग्रामवर यशस्वी जीवनाची छायाचित्रे, फेसबुकवर आनंदाचे क्षण, व्हॉट्सॲप वर शुभेच्छांचा वर्षाव आणि प्रत्यक्ष जीवनात मात्र एकटेपणा,ही विरोधाभासी परिस्थिती आज अनेकांच्या आयुष्याचा भाग झाली आहे.दुसऱ्यांचे ‘परिपूर्ण’ आयुष्य पाहताना स्वतःचे आयुष्य अपुरे वाटू लागणे, हीदेखील मानसिक तणावाची एक महत्त्वाची कारणे आहेत.
@तरुणांवर अपेक्षांचे ओझे-------
आजच्या तरुणांकडून कुटुंब, समाज आणि स्वतःच्या मनातही प्रचंड अपेक्षा आहेत.
चांगले शिक्षण हवे, उत्तम नोकरी हवी, व्यवसायात यश हवे, आर्थिक स्थैर्य हवे, चांगले घर हवे, सामाजिक प्रतिष्ठा हवी—आणि हे सगळे शक्य तितक्या कमी वेळेत मिळावे, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
त्यात स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
परीक्षेतील अपयश, नोकरी न मिळणे, प्रेमसंबंधातील अपयश, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, करिअरची अनिश्चितता किंवा मित्रांपासून दूर जाणे,या प्रत्येक गोष्टीचा तरुणांच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
परंतु प्रश्न असा आहे की, आपण त्यांच्या गुणपत्रिकेकडे जितके लक्ष देतो, तितके त्यांच्या मनःस्थितीकडे देतो का?
पालकांनी ‘किती गुण?’ ऐवजी ‘काय वाटतंय?’ विचारण्याची गरज आपल्या शिक्षणपद्धतीत मुलांना सतत प्रश्न विचारले जातात—“किती मार्क मिळाले?”, “नोकरी कधी लागणार?”,“पगार किती आहे?”“पुढे काय करणार?”पण फार कमी वेळा विचारले जाते,"तुला आतून कसं वाटतंय?”हा छोटासा प्रश्न एखाद्या तरुणासाठी मोठा आधार ठरू शकतो. पालकांनी मुलांशी संवाद साधताना केवळ त्यांच्या यशाचे मोजमाप करू नये. त्यांच्या अपयशालाही स्वीकारले पाहिजे. “तू अपयशी झाला आहेस” आणि “तुला अपयश आले आहे” या दोन वाक्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.अपयश ही व्यक्तीची ओळख नसते; तो जीवनातील एक अनुभव असतो.
@शिक्षणसंस्थांचीही जबाबदारी-----
शाळा आणि महाविद्यालये ही केवळ परीक्षा आणि गुण मिळविण्याची केंद्रे नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक संस्थेत मानसिक आरोग्याबाबत जागृती, समुपदेशन आणि विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. अचानक शांत होणे, मित्रांपासून दूर जाणे, अभ्यासातील रस कमी होणे, सतत चिडचिड करणे किंवा स्वतःमध्येच गुरफटून जाणे—अशा बदलांकडे केवळ “शिस्तीचा प्रश्न” म्हणून न पाहता त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.तज्ज्ञांची मदत घेण्याबाबतचा गैरसमज दूर झाला पाहिजे.मानसिक समस्यांबाबत व्यावसायिक मदत घेणाऱ्या तरुणांचे प्रमाण कमी असणे ही चिंतेची बाब आहे.समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे व्यक्ती “वेडी” आहे, हा गैरसमज समाजातून पूर्णपणे दूर करावा लागेल.
ज्याप्रमाणे शरीराच्या आजारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाते, त्याचप्रमाणे मनाच्या समस्यांसाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची मदत घेणे स्वाभाविक आणि योग्य आहे.
फक्त तरुणांचा प्रश्न नाही
मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ तरुणांपुरता मर्यादित नाही. पालक, शिक्षक, कर्मचारी, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक—प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मात्र तरुणाई ही देशाची ऊर्जा आहे. त्यांच्या मनावर जर सतत भीती, नैराश्य आणि असुरक्षिततेचे सावट असेल, तर त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर होत नाही; त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि अखेरीस देशाच्या भवितव्यावर होतो.
समाजाने ‘ऐकण्याची संस्कृती’ निर्माण करावी
आज आपल्याकडे बोलणारे खूप आहेत; पण ऐकणारे किती आहेत?एखादा मित्र आपली समस्या सांगत असेल तर लगेच सल्ला देण्याऐवजी आधी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकणे आवश्यक आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर “विसरून जा”, “सगळ्यांच्या आयुष्यात असंच असतं”, “तू मजबूत बन” असे नसते.
कधी कधी माणसाला उपायापेक्षा आधी समजून घेणारा माणूस हवा असतो.
म्हणून कुटुंबात संवाद, मित्रांमध्ये विश्वास, शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन आणि समाजात मानसिक आरोग्याबाबत खुले वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
@सोशल मीडिया- साधन की संकट?----
सोशल मीडिया स्वतः वाईट नाही. प्रश्न त्याच्या वापराचा आहे.माहिती, शिक्षण, रोजगार, संवाद आणि सामाजिक जागृतीसाठी सोशल मीडिया अत्यंत प्रभावी साधन ठरू शकतो. पण सततची तुलना, लाईक्स-कमेंट्सची अपेक्षा, आभासी लोकप्रियतेची स्पर्धा आणि स्क्रीनवर घालवलेला वाढता वेळ मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.
म्हणून तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा; तंत्रज्ञानाने त्यांचा वापर करू नये.आपण आकडेवारीपासून कृतीकडे कधी जाणार?
“४१ टक्के तरुण मानसिक आजार लपवतात” हा आकडा धक्कादायक आहे. पण केवळ धक्का बसून उपयोग नाही.
आपल्याला काही मूलभूत प्रश्न विचारावे लागतील.आपल्या घरात मुलांना मन मोकळे करून बोलण्याची जागा आहे का?आपल्या शाळेत मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होते का?आपल्या महाविद्यालयात समुपदेशनाची सुविधा आहे का?आपल्या मित्राच्या शांततेमागचे दुःख आपण ओळखतो का?
आणि सर्वात महत्त्वाचे,आपण स्वतः आपल्या मनाची काळजी घेतो का?
या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली तरच या समस्येवर प्रभावी उपाययोजना सुरू होतील."
@शेवटी एवढेच….....
तरुणांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी त्यांना संवादाची भाषा शिकवावी लागेल. त्यांना स्पर्धेत उतरवण्यापूर्वी पराभव स्वीकारण्याची ताकद द्यावी लागेल. त्यांना यशाची स्वप्ने दाखवण्याबरोबरच अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याचे धैर्य द्यावे लागेल.कारण प्रत्येक हसरा चेहरा आनंदी असेलच असे नाही.
काही जण मदतीची वाट पाहत असतात; फक्त ते ती मागण्याच्या स्थितीत नसतात.
म्हणून मानसिक आरोग्याबाबतचा पहिला बदल औषधांमध्ये नव्हे, तर आपल्या दृष्टिकोनात झाला पाहिजे.
मन आजारी पडणे हा गुन्हा नाही, लाजेची बाब नाही आणि कमजोरीही नाही. मदत मागणे हा पराभव नाही,तो जीवनाकडे पुन्हा आशेने पाहण्याचा पहिला टप्पा आहे.
******************************
कबीर वाणी
म. मुस्लिम कबीर, लातूर
8208435414
*****************************



stay connected