जन्म-मृत्यू नोंदणीसाठी सुधारित नियम लागू; विलंबित नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल
आष्टी | प्रतिनिधी : जन्म-मृत्यू नोंदणीबाबत केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांची अंमलबजावणी आता करण्यात आली आहे. भारत सरकारच्या राजपत्रात दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम १३(३) मध्ये सुधारणा करण्यात आली असून, त्यानुसार विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील सर्व जनतेस तहसीलदार आष्टी यांनी आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या या सुधारणांनुसार जन्म-मृत्यू नोंदणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू, जिल्हा परिषद बीड यांनीही याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सुधारित नियमानुसार, जन्म किंवा मृत्यूची माहिती देण्यास एक वर्षापेक्षा अधिक मात्र दोन वर्षांच्या आत विलंब झाल्यास, संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने नोंदणी करता येणार आहे.
तसेच जन्म किंवा मृत्यूची नोंद अथवा माहिती देण्यास दोन वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्यास, जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचा लेखी परवानगी आदेश आवश्यक राहणार आहे.
ज्या कार्यक्षेत्रात जन्म किंवा मृत्यूची घटना घडली आहे, त्या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची सत्यता पडताळून आदेश निर्गमित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच जन्म-मृत्यू निबंधकांकडून घटना घडल्याची सत्यता पडताळून विहित शुल्क आकारून नोंदणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठी अर्ज केलेला असेल, मात्र संबंधित व्यक्तींना जन्म किंवा मृत्यूचा आदेश अद्याप मिळालेला नसेल, तर संबंधितांनी तहसील कार्यालयामार्फत आपला दाखल केलेला अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे सादर करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे जन्म-मृत्यू आदेश मिळण्यासाठी प्रकरण दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन सुधारणांमुळे विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत स्पष्टता येणार असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








stay connected