लोहा तालुक्यातील निळा येथे ३६ वर्षीय शेतकर्याची गळफास लावून आत्महत्या; २ लाखांचे कर्ज आणि नापिकीमुळे उचलले टोकाचे पाऊल
लोहा: प्रतिनिधी / चंद्रकांत वाघमारे
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील निळा येथील एका ३६ वर्षीय तरुण शेतकर्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कै. बालाजी व्यंकटी बाचेवाड (वय ३६ वर्ष, रा. निळा ता. लोहा) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बालाजी बाचेवाड यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी अंदाजे रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. सततची नापिकी आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यांच्या नावावर निळा येथील ग.क्र. १२२ मध्ये ०.६४ हे. आर शेतजमीन असून, त्यांच्यावर 'एसबीआय सोनखेड' शाखेचे सुमारे २,००,०००/- (दोन लाख) रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे तपास पोलीस अधिकारी नागरगोजे सर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन नांदेड येथील डॉ. के. एन. सदावर्ते यांनी केले. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीमती बी. बी. तेलंगे यांनी लोहा तहसील कार्यालयात प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
मृत शेतकरी बालाजी बाचेवाड यांच्या पश्चात वृद्ध वडील व्यंकटी बाचेवाड (६० वर्ष), पत्नी ज्योती (३३ वर्ष), दोन मुले श्रीकांत (१५ वर्ष), शिवन (८ वर्ष) आणि एक ५ वर्षांची अविवाहित मुलगी अनुष्का असा परिवार आहे. कमावता व्यक्ती गमावल्यामुळे बाचेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, निळा गावावर शोककळा पसरली आहे.


stay connected