*रहमतुल्लील आलमीन (स.अ.स.)-प्रेम,दया आणि न्यायाचा संदेश*
हजरत मुहम्मद मुस्तफा (स.अ.स.) यांना अल्लाह तआलाने संपूर्ण सृष्टीसाठी “रहमतुल्लील आलमीन”, अर्थात सर्व जगासाठी दयामूर्ती म्हणून पाठवले. त्यांचे संपूर्ण जीवन करुणा, प्रेम, समता, क्षमा आणि न्यायाचा तेजस्वी दीपस्तंभ आहे.त्यांनी गरिबांना आधार दिला,अनाथांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला,स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिले आणि गुलामगिरीत अडकलेल्या समाजाला स्वातंत्र्य,समानता व माणुसकीचा संदेश दिला. त्यांची दया केवळ एका समाजापुरती किंवा एका वर्गापुरती मर्यादित नव्हती ती संपूर्ण मानवजातीपर्यंत, किंबहुना प्राणिमात्रांपर्यंत पोहोचलेली होती.
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मानवतेच्या कल्याणासाठी एक कल्याणकारी जीवनव्यवस्था जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि इस्लामी शिकवण अख्ख्या जगासमोर मांडली. त्यांनी माणसाला जीवन साफल्याचा मार्ग दाखविला, सत्य धर्माचे आचरण करण्याची शिकवण दिली आणि ईश्वरीय आज्ञापालन कशासाठी व का करावे याचेही मार्गदर्शन केले. अल्लाहचे स्मरण श्रद्धेने, एकाग्रतेने आणि निष्ठेने कसे करावे,याचे सुंदर उदाहरण त्यांनी स्वतःच्या जीवनातून जगासमोर ठेवले. अल्लाहच्या मर्जीने संपूर्ण सृष्टीसाठी संदेश घेऊन आलेले रहमतुल्लील आलमीन (स.अ.स.) हे मानवजातीच्या कल्याणाचे खरे मार्गदर्शक आणि प्रचारक होते.ते शांतीचे महान प्रवर्तक, मानवतेचे उद्धारक आणि माणुसकीला योग्य दिशा देणारे प्रेषित होते.ईश्वरावरील असीम निष्ठा, प्रेम, वचनबद्धता आणि निःस्वार्थ वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महान गुण होते.
त्यांच्या शिकवणुकीचा गाभा हा माणुसकी,शेजाऱ्यांशी सद्वर्तन,गरजूंची मदत आणि अन्यायापासून दूर राहणे हा आहे. मानवाचे चांगले वर्तन हेच त्याचे चांगले कर्म या जीवनमूल्याला त्यांच्या शिकवणुकीत विशेष स्थान आहे. माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या संपत्तीत, पदात किंवा प्रतिष्ठेत नसून त्याच्या उत्तम आचरणात आणि इतरांसाठी असलेल्या उपयुक्ततेत आहे, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी महिलांच्या सन्मानाला आणि अधिकारांना विशेष महत्त्व दिले. मुली, माता, पत्नी आणि स्त्रियांशी आदराने वागण्याची शिकवण त्यांनी दिली. तसेच मालक आणि नोकर यांच्यात माणुसकी, न्याय आणि सन्मानाचे संबंध असावेत, असा संदेश त्यांनी दिला. समाजातील उच्च-नीच, जात-पात, वंश, रंग, श्रीमंती-गरीबी अशा भेदभावांना त्यांनी नाकारले आणि सर्व मानव समान असल्याची शिकवण दिली. त्यांच्या दृष्टीने माणसाची खरी श्रेष्ठता त्याच्या तक्वा, सदाचार आणि उत्तम कर्मात होती.
त्यांच्या हृदयात जाती, वंश, रंग, प्रदेश किंवा सामाजिक स्थान यांचा भेदभाव नव्हता. त्यांनी मानवतेच्या पायावर उभा केलेला संदेश आजही जगाला शांतता, बंधुभाव आणि एकतेचा मार्ग दाखवतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात प्रेम, संयम, क्षमा, न्याय आणि करुणेचे दर्शन घडते.
परंतु आज आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहिले तर अनेक ठिकाणी याच्या अगदी उलट चित्र दिसते. समाजात द्वेष, असहिष्णुता, असमानता आणि धार्मिक तेढ वाढविणारे वातावरण निर्माण होत आहे. कोणत्याही नागरिकाच्या धार्मिक भावना, ओळख किंवा श्रद्धा यांचा अपमान होऊ नये.त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघनही होऊ नये. लोकशाहीमध्ये श्रद्धेचा आदर आणि कायद्याचे पालन, दोन्ही समान महत्त्वाचे आहेत.
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या शिकवणुकीतून आपल्याला स्पष्ट धडा मिळतो की द्वेषाला द्वेषाने उत्तर देणे हा मानवतेचा मार्ग नाही. अन्यायाला न्यायाने, द्वेषाला प्रेमाने, अज्ञानाला ज्ञानाने आणि संघर्षाला संवादाने उत्तर देणे हीच खरी पैगंबरी शिकवण आहे.
आज जग युद्ध, हिंसा, अन्याय, धार्मिक संघर्ष आणि असमानतेने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत रहमतुल्लील आलमीन (स.अ.स.) यांचा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या जीवनातून आपण प्रेम, दया, क्षमा, सहिष्णुता, न्याय आणि मानवतेचे धडे घेऊ शकतो. त्यांनी जगासाठी दिलेले योगदान केवळ एका काळापुरते मर्यादित नाही; जगाच्या कल्याणासाठी प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) हे मानवजातीला मिळालेले महान वरदान आहे.
आपण आपल्या श्रद्धेवर ठाम राहूया पण दुसऱ्याच्या श्रद्धेचा आदरही करूया. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवूया पण कायदा हातात घेऊ नका. अन्यायाविरुद्ध उभे राहूया पण द्वेष पसरवू नका. कारण हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्यावर प्रेम करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्यांच्या दया, न्याय, सहिष्णुता, क्षमा आणि मानवतेच्या शिकवणुकीला आपल्या आचरणात आणणे.आज गरज आहे ती समाजाला विभागण्याची नव्हे, तर जोडण्याची.द्वेष वाढवण्याची नव्हे, तर प्रेम वाढवण्याची.संघर्ष निर्माण करण्याची नव्हे, तर न्याय व शांततेचा मार्ग स्वीकारण्याची. प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) यांनी मानवतेला दिलेला संदेश हा केवळ ऐकण्यासाठी किंवा सांगण्यासाठी नाही, तर आचरणात आणण्यासाठी आहे.
प्रेषित मुहम्मद (स.अ.स.) यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला,दयेचा मार्ग दाखविला, न्यायाची शिकवण दिली, महिलांचा सन्मान करण्यास शिकविले, गरिबांच्या आणि दुर्बलांच्या मदतीची प्रेरणा दिली आणि माणसामाणसातील भेदभाव दूर करण्याचा मार्ग दाखविला. म्हणूनच ते मानवतेचे तारणहार, शांतीचे प्रवर्तक आणि संपूर्ण सृष्टीसाठी रहमत ठरतात.
खरा प्रश्न हा आहे-आपण “रहमतुल्लील आलमीन” यांच्यावर प्रेम केवळ शब्दांत व्यक्त करणार आहोत, की त्यांच्या दया, न्याय, सहिष्णुता, क्षमा आणि मानवतेच्या शिकवणुकीला आपल्या जीवनाचा भाग बनवणार आहोत?

.jpg)
stay connected