महावीर इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हास्तरीय संगणकीय विचारशक्ती व कृत्रिम बुद्धिमत्तेवरील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कडा (प्रतिनिधी)“संगणकीय विचारशक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण - २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन महावीर इंग्लिश स्कूल, कडा येथे करण्यात आले. सी बी एस ई सेंटर ऑफ एक्सेलंस, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षण क्षेत्रात संगणकीय विचारशक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व, अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत त्यांचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास यावर या विचारमंथनात चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अभिलाष कुडियाथू DDTC, CBSE CoE, Beed District यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, संगणकीय विचारशक्ति हे केवळ संगणक विषयापुरते मर्यादित कौशल्य नसून समस्या सोडविण्याची एक शास्त्रीय आणि तार्किक पद्धत आहे. समस्या विभागणी, नमुना ओळख, अमूर्तीकरण, तार्किक विचार आणि अल्गोरिदमिक विचार या प्रक्रियांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य विकसित करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेता शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मात्र, AI चा वापर जबाबदारीने, नैतिकतेने आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे सहभागी शिक्षकांनी सादर केलेले संशोधनपर शोधनिबंध. विविध शिक्षकांनी संगणकीय विचारशक्ति आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या शैक्षणिक उपयोगांवर तसेच अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत त्यांच्या प्रभावी वापराबाबत आपले संशोधन व नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.
सादर करण्यात आलेल्या संशोधनपर शोधनिबंधांचे परीक्षण मुख्य अतिथी-सह-परीक्षक श्रीमती हरजोत कौर, श्री संभाजी ओव्हाळ आणि श्रीमंती अफशान शेख यांनी केले. शोधनिबंधांची मौलिकता, विषयाची उपयुक्तता, संशोधनाची पद्धत, सादरीकरणातील स्पष्टता, नाविन्यपूर्णता आणि शालेय शिक्षणातील प्रत्यक्ष उपयोगिता या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
सखोल परीक्षणानंतर अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलचे अक्षय घागरे, महावीर इंग्लिश स्कूल च्या स्वाती सारुक आणिअनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल चे निर्मल प्रल्हाद हे विजेते ठरले. त्यांच्या संशोधनपर शोधनिबंधांचे तसेच सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या संशोधनामध्ये नाविन्यपूर्ण विचार, शैक्षणिक संदर्भातील उपयुक्तता आणि वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनासाठी असलेली क्षमता अधोरेखित झाली.
या जिल्हास्तरीय विचारमंथनातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे निवड झालेल्या तीनही संशोधनपर शोधनिबंधांना पुढील विचारार्थ सी बी एस ई सेंटर ऑफ एक्सलेंस,पुणे येथे पाठविण्यात आले. या निवडीमुळे संबंधित शिक्षक तसेच त्यांच्या शाळांसाठी ही अभिमानाची बाब ठरली असून, बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये संशोधन, नाविन्यपूर्णता आणि व्यावसायिक विकासाची वाढती संस्कृती यामुळे अधोरेखित झाली.
कार्यक्रमादरम्यान AI च्या माध्यमातून वैयक्तिकृत अध्ययन, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, शैक्षणिक सामग्री निर्मिती आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यांना चालना देण्याच्या विविध शक्यतांवरही चर्चा झाली. त्याचबरोबर डिजिटल जबाबदारी, नैतिकता आणि मानवी मूल्ये यांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सी बी एस ई सेंटर ऑफ एक्सेलंस, पुणे, बीड सहोदया कॉम्प्लेक्स आणि महावीर इंग्लिश स्कूल कडा यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. शिक्षकांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षणासाठी शिक्षकांना सक्षम करणे, या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या जिल्हास्तरीय विचारमंथनामुळे शिक्षकांमध्ये संगणकीय विचार आणि कृतिम बुद्धिमत्ता विषयी जागरूकता व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. तसेच, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित आणि कौशल्यकेंद्रित जगासाठी तयार करण्याच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अमित राठोड, उपाध्यक्ष श्री. संदीप चानोदिया, सचिव श्री. हेमंत मेहेर, खजिनदार डॉ. प्रमोद भळगट तसेच विश्वस्त श्री. मनीष गांधी, श्री. प्रकाश श्रीश्रीमाळ, श्री. अमोल पटवा, श्री. संजय पितळे, श्री. संतोष गांधी या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.


stay connected