Tejvarta भगवान महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निग (AI & ML) अभ्यासक्रमास शासनाची मान्यता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय Tejwarta News Network

 भगवान महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निग (AI & ML) अभ्यासक्रमास शासनाची मान्यता
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय



आष्टी प्रतिनिधी- येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित भगवान महाविद्यालय आष्टी च्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निग (AI & ML) हा आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या सूचनेनुसार व संस्थेचे प्रशासन अधिकारी यांच्या  पाठपुराव्यामुळे आष्टी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी टी वाघ यांचा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी प्राचार्य डॉ. वाघ यांचे अभिनंदन करताना सांगितले की, साहेबांचे व वाघ सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण व काळानुरूप शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक विषयामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्यास मोठी संधी मिळणार असून उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे.

सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. डी टी वाघ यांनी हा सन्मान संपूर्ण महाविद्यालय परिवाराचा असल्याचे सांगितले. शासनाची मान्यता मिळविण्यासाठी माजी आमदार भीमरावजी धोंडे, सर्व प्रशासन अधिकारी,  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन अभ्यासक्रम, संशोधन आणि कौशल्याधारित उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.