जंतरमंतरवरील लाठीहल्ल्याचे लोह्यात तीव्र पडसाद; 'महाराष्ट्र बंद'ला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोहा (प्रतिनिधी - चंद्रकांत वाघमारे):
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीहल्ला हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारा ठरला आहे. या दडपशाहीच्या आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला लोहा शहरात अत्यंत तीव्र आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. फुटीरतेच्या राजकारणाला नाकारत, विद्यार्थ्यांनी छेडलेल्या या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील समस्त व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. परिणामी, लोहाची मुख्य बाजारपेठ गुरुवारी (२३ जुलै) कडकडीत बंद राहिल्याने शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते.‘नीट’ पेपर फुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा; सत्तेच्या मस्तवालांचा निषेधदेशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या 'नीट' (NEET) पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, सत्य ऐकण्याची मानसिकता नसलेल्या केंद्र सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी अमानुष बळाचा वापर केला. या दडपशाहीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे सुप्रिमो ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतच न्यायाची भूमिका घेत एल्गार पुकारला होता. त्याचेच थेट पडसाद आता ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्याचे लोहा येथील बंदवरून स्पष्ट दिसत आहे.पुतळ्याला अभिवादन आणि सर्वपक्षीय संतापाची रॅलीबंदची सुरुवात गुरुवारी अत्यंत शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने झाली. बसस्थानक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलकांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेतली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक पंचशील कांबळे, पुतळा समिती च्या अध्यक्ष कापुरे ताई ,श्याम वाघमारे, नामदेव बुद्धे, काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, आष्टूरचे सरपंच बाबासाहेब बाबर, शेख शेरफोद्दीन, धर्मवीर बुद्धभूषण खिल्लारे,धर्मविर शेतकरी संघटनेचे बाळासाहेब जाधव, सचिन आढाव, देवानंद जोधळे,वसंत लोहकरे,गोलू महाबळे, सिद्धार्थ ससाणे, सुभाष खाडे, धोंडिबा यानभूरे, देवानंद रायबोले आणि राहुल एडके, चंद्रकांत एडके, सिध्दार्थ एडके आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सर्वपक्षीय नेत्यांनी शहरातून निषेध रॅली काढत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही कोणतीही जबरदस्ती न करता, केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःहून दुकानांची शटर्स डाऊन करून या संतापात आपला सहभाग नोंदवला.




stay connected