पक्षफोडीच्या राजकारणात तत्त्वांचा अंत्यसंस्कार होतोय ? Rajendra Jain Tejwarta News

 पक्षफोडीच्या राजकारणात तत्त्वांचा "अंत्यसंस्कार" होतोय ?

Sanjay Raut


------------------

सत्ता, संपत्ती आणि स्वार्थासाठी बदलणारे चेहरे अनेक असतात; पण वादळातही आपला झेंडा न सोडणारेच इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात.

------------------

हा लेख कोणत्याही व्यक्तीविषयी द्वेष, आकस किंवा वैयक्तिक टीका म्हणून लिहिलेला नाही. हा एका सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात साचलेल्या प्रश्नांचा, वेदनांचा आणि लोकशाहीबद्दलच्या चिंतेचा आवाज आहे. मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात; परंतु लोकशाही, जनादेश आणि निष्ठा यांविषयीचे प्रश्न विचारणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, तेव्हाही आम्ही संजय राऊत यांनाच दोष दिला. अनेकदा त्यांची भूमिका चुकीची वाटली. पण काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे राजकारणाचे खरे चेहरे समोर येऊ लागले.

आज मनात एकच प्रश्न उभा राहतो, राज्यावर दुष्काळाचे सावट आहे, शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगार आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर आहेत; पण सत्तेच्या राजकारणात गुंतलेल्या लोकांना खरंच जनतेची काही काळजी आहे का?

सत्ता, पक्षफोड, आमदारांची खरेदी-विक्री, दबावतंत्र आणि राजकीय गणिते... एवढंच का उरलं आहे लोकशाहीचं स्वरूप?

जसजसा काळ गेला, तसतसं जाणवू लागलं की अनेकजण महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या विकासासाठी नव्हे, तर स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी, संपत्तीच्या संरक्षणासाठी आणि सत्तेच्या मोहासाठी भूमिका बदलत गेले.

खरंतर आता या राजकारणाची किळस वाटू लागली आहे. जनता मतदान करते, लोकप्रतिनिधी निवडते. पण निवडून आल्यानंतर तेच लोकप्रतिनिधी दबावाखाली किंवा सत्तेच्या मोहापायी पक्ष बदलतात. मग जनतेच्या मताची किंमत तरी काय उरते ?

एक-दोन वेळा घडलेली घटना अपवाद असू शकते, पण जेव्हा वारंवार पक्षफोडी होतात, निवडून आलेले प्रतिनिधी मतदारांचा विश्वास तोडतात, तेव्हा लोकशाहीच्या पायालाच तडा जातो.

विशेष म्हणजे, पक्षांतर करताना हेच लोक सांगतात की "आम्ही विकासासाठी जात आहोत, जनतेच्या प्रश्नांसाठी जात आहोत."

मग प्रश्न पडतो.
▪️ NEET पेपरफुटीवर किती जणांनी आवाज उठवला?
▪️ महिला आणि चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेवर किती वेळा चर्चा केली?
▪️ शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, यासाठी किती संघर्ष केला?
▪️ महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेल्याबद्दल किती प्रश्न विचारले?
▪️ मराठी माणसांच्या हक्कांवर होणाऱ्या आघातांविरुद्ध किती वेळा उभे राहिले?
▪️ बंद पडणाऱ्या मराठी शाळांसाठी किती आंदोलने केली?
▪️ महिनाभरात खड्ड्यात रूपांतरित होणाऱ्या रस्त्यांबाबत किती जबाबदारी निश्चित केली?
▪️ जनतेच्या विरोधात स्मार्ट मीटरची सक्ती होत असताना किती जण बोलले?
▪️ बोगस बियाणे, खतांसाठी रांगा आणि शेतकऱ्यांचे हाल यावर किती चर्चा झाली?
▪️ भररस्त्यात होणाऱ्या हत्या आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात किती कठोर भूमिका घेतली?
▪️ सामान्य नागरिकांच्या आर्थिक प्रश्नांवर किती वेळा आवाज उठवला?
उत्तर शोधायला गेलो तर अनेकदा शून्यच हातात येते.

आज महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं की मनात एक वेदनादायक प्रश्न उभा राहतो. लोकशाही खरंच जनतेच्या मतावर चालते की सत्तेच्या गणितांवर ?

मतदार लाखो आशा उराशी बाळगून मतदान करतो. पण निवडणूक संपताच अनेकदा जनादेशाचा अपमान सुरू होतो. कालपर्यंत एका पक्षाच्या विचारांवर निवडून आलेले लोक अचानक दुसऱ्या पक्षाच्या छत्राखाली जातात. कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात. आणि या सर्वाला "विकास" असे नाव दिले जाते.

मात्र विकासाच्या नावाखाली जर जनतेचे प्रश्नच मागे पडणार असतील, तर अशा विकासाचा उपयोग कोणासाठी?

सत्ता कायमची नसते. पद कायमचं नसतं. संपत्ती कायमची नसते. पण जनतेच्या मनात निर्माण झालेला सन्मान किंवा अविश्वास मात्र पिढ्यान्पिढ्या जिवंत राहतो.

म्हणूनच कधी कधी वाटते, मतभेद असले तरी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणारी माणसं राजकारणात आवश्यक असतात. कारण निष्ठा, तत्त्व आणि जनतेशी प्रामाणिकपणा हीच लोकशाहीची खरी शक्ती आहे.

जनतेने मतदान करून दिलेला विश्वास हा केवळ एक आकडा नसतो; तो लाखो लोकांच्या आशा-आकांक्षांचा मान असतो.

पक्ष बदलताना किमान थोडी तरी नैतिकता, थोडी तरी लोकशाहीची लाज आणि मतदारांचा आदर ठेवावा.

कारण पैसा, सत्ता, पद, प्रतिष्ठा -हे सर्व क्षणभंगुर आहे.

पण माणूस गेल्यानंतरही त्याचे नाव जिवंत राहते.

आणि इतिहास नेहमी सत्तेची नव्हे, तर निष्ठेची, तत्त्वांची आणि जनतेशी प्रामाणिक राहिलेल्या व्यक्तींची नोंद ठेवत असतो. हे पैसा आणि सत्तेसाठी बेडूक उड्या मारणाऱ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

 ------%-------

सत्ता, पैशाच्या मोहापायी स्वतःच्या जन्मदात्या विचारांचा, पक्षाचा आणि मतदारांनी दिलेल्या विश्वासाचा अनादर करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींना पाहिलं की मन विषण्ण होतं.
कालपर्यंत ज्या पक्षाच्या झेंड्याखाली उभं राहून मतं मागितली, ज्या विचारसरणीची शपथ घेतली, ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभं राहून मोठेपणा मिळवला, त्याच विचारांना एका क्षणात तिलांजली देऊन सत्तेच्या दिशेने उड्या मारताना जनाची नसेल किमान मनाची तरी शरम कशी वाटत नाही?
बेडक्याप्रमाणे एका डबक्यातून दुसऱ्या डबक्यात उडी मारणे सोपं असतं; पण तत्त्वांशी निष्ठावंत राहण्यासाठी कणा लागतो. सत्तेच्या खुर्च्या बदलतात, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण जनतेच्या मनात उमटलेली विश्वासघाताची जखम मात्र कायम राहते.
राजकारण हे जनसेवेचं साधन असावं, स्वार्थपूर्तीचं बाजारपेठ नव्हे. कारण पद आणि पैसा क्षणिक असतो, पण निष्ठा आणि चारित्र्य यांची किंमत इतिहास ठरवत असतो.

---------%-------

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हा अनेकांनी संजय राऊत यांनाच दोष दिला. त्यांच्या अनेक भूमिका पटल्या नाहीत, अनेकदा ते चुकीचे वाटले. पण काळ जसजसा पुढे गेला, तसतसं एक सत्य स्पष्ट होत गेलं. या माणसाची पक्षनिष्ठा कधीच डळमळली नाही.

आज सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांची, विचारांचा सौदा करणाऱ्यांची आणि स्वार्थासाठी झेंडे बदलणाऱ्यांची गर्दी दिसते. अशा काळात संजय राऊत यांच्यासारखा नेता वेगळा ठरतो. पत्राचाळ प्रकरण, चौकशा, तुरुंगवास आणि प्रचंड राजकीय दबाव असूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

विचार पटोत अथवा न पटोत, पण संकटातही झेंडा न बदलणारी निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे. राजकारणात अशी निष्ठा आज दुर्मिळ झाली आहे.



-राजेंद्र जैन कडा

--------%------

Tejwarta News


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.