*म्हसोबा महिला शेतकरी गटाच्या कार्याची किरण राव यांनी घेतली दखल*
*पारोडी (ता. आष्टी, जि. बीड) :*
*पाणी फाउंडेशनच्या सहसंस्थापिका सौ. किरण राव यांनी पारोडी येथील म्हसोबा महिला शेतकरी गटाला भेट देऊन गटाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.* महिला सक्षमीकरण, शेती विकास, सामूहिक बचत, ग्रामीण विकास आणि लोकसहभागाच्या माध्यमातून उभारलेल्या कार्याची त्यांनी विशेष दखल घेतली.
म्हसोबा महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा ज्योती कांतीलाल सायंबर, सचिव सारिका नानासाहेब सायंबर, उपाध्यक्षा स्मिता जालिंदर सायंबर तसेच गटातील सर्व सदस्य महिलांनी एकत्रितपणे राबविलेल्या उपक्रमांची माहिती किरण राव यांना दिली. महिलांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले कार्य, शेतीपूरक उपक्रम आणि गावविकासातील सहभाग याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पाणी फाउंडेशनच्या लिपी मेहता, वैभव हिवसे, वॉटरशेड प्रोजेक्ट मॅनेजर नितेश आदमणे व महेश मस्के, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, उमेद अभियानाचे साळवे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित "सुजलाम सुफलाम महाराष्ट्र – जलसंवर्धन जनजागृती कार्यक्रमात" जलसंवर्धन, शाश्वत शेती, महिला नेतृत्व आणि ग्रामीण विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. किरण राव यांनी महिला सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सामूहिक प्रयत्नांच्या बळावर गावविकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जालिंदर सायंबर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बंकट परकाळे, जालिंदर सायंबर, प्रकाश परकाळे, आकाश गांगर्डे, नामदेव सायंबर तसेच म्हसोबा महिला शेतकरी गटाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
किरण राव यांच्या भेटीमुळे महिला शेतकरी गटातील सदस्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही दखल संपूर्ण पारोडी गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.




stay connected