अवैध मद्यवाहतुकीचा पर्दाफाश; १३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी रंगेहात जेरबंद
-----------------
राजेंद्र जैन | कडा
------------------
दारूबंदी कायद्याला हरताळ फासत अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द शिवारात रचलेल्या नियोजनबद्ध सापळ्यात एका आरोपीस रंगेहात पकडत देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा आणि चारचाकीसह तब्बल १३ लाख ३८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून रोजी आष्टी विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यानगर–बीड मार्गावरील हॉटेल निसर्ग ढाब्यासमोर कारखेल खुर्द शिवारात सापळा रचला. यावेळी धनंजय बाबासाहेब बडे यास अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ५७६ बाटल्या देशी दारू (बॉबी संत्रा), १७६ बाटल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या तसेच टाटा पंच ईव्ही (एमएच-१६-डीझेड-१४४४) या चारचाकीसह एकूण ₹१३,३८,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे अवैध मद्यव्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई निरीक्षक डी. जी. देवकाते, दुय्यम निरीक्षक आय. बी. मुल्ला, सहाय्यक दुय्यम निरीक्षक तुळशीराम करंजुळे तसेच जवान सतीश सावंत, प्रसाद औटे, गणेश गायखे आणि महिला जवान कु. पल्लवी राख यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक आय. बी. मुल्ला करीत आहेत.
---------%-------
अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाचा घाव
आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत धनंजय बाबासाहेब बडे यास रंगेहात पकडले. आरोपीकडून ५७६ देशी व १७६ विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच टाटा पंच ईव्ही वाहनासह एकूण ₹१३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक आय. बी. मुल्ला करीत आहेत.
-------%--------



stay connected