कर्तव्याचा किरीट: बजरंग बनसोडे यांना ‘DGP सन्मानचिन्ह’ बहाल
----------------
निष्ठा, धाडस आणि नेतृत्वाचा गौरव- मुंबई पोलीस दलाचा अभिमान उंचावला
-----------------
राजेंद्र जैन/ कडा
-----------------
कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि शिस्तीची उज्ज्वल परंपरा जपणारे मुंबई पोलीस दलातील विद्यमान पोलीस उपायुक्त तथा आष्टीचे भूमिपुत्र बजरंग बनसोडे यांना त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे अत्यंत मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DGP Insignia) जाहीर झाले आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे पोलीस दलात तसेच सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बनसोडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध जबाबदाऱ्यांची धुरा समर्थपणे सांभाळत शिस्त, धैर्य आणि कुशल नेतृत्वाची प्रभावी छाप उमटवली आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आव्हानात्मक परिस्थितीत दाखवलेली समयसूचकता व निर्णयक्षमता यामुळेच त्यांच्या नावाची या सन्मानासाठी निवड झाली आहे.
१५ वर्षांहून अधिक काळ निष्कलंक व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांनाच हे सन्मानचिन्ह बहाल केले जाते. पोलीस महासंचालकांकडून दिला जाणारा हा सन्मान पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानचिन्हांपैकी एक मानला जातो.
बनसोडे यांच्या या यशामुळे मुंबई पोलीस दलाचा गौरव अधिकच वाढला असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन तरुण अधिकारी नव्या जोमाने कर्तव्य पार पाडत आहेत.
समाजासाठी प्रेरणादायी कार्य
कर्तव्यनिष्ठा, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे बजरंग बनसोडे यांनी आपल्या सेवेतून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरत आहे.
------%-------


stay connected