"ढगाआड गेलेला सूर्य दिसतो, मातीआड गेलेला माणूस पुन्हा दिसत नाही!"
---- प्रवचनकार गणेश शिंदे
------------------
------------------
आष्टी (प्रतिनिधी)
"माणूस जन्माला येण्यापूर्वी नऊ महिने आधी त्याची चाहूल लागते, मात्र या जगाचा निरोप घेताना ईश्वराने कोणताही पूर्वसंकेत ठेवलेला नाही. भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण हे विसरतो की, या जगात आपलं कायमस्वरूपी असं काहीच नाही. त्यामुळे हयात असतानाच आई-वडिलांवर भरभरून प्रेम करा आणि रक्ताची, स्नेहाची नाती मनापासून जपा," असा अत्यंत भावस्पर्शी आणि अंतर्मुख करणारा संदेश सुप्रसिद्ध प्रवचनकार व व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिला.ते सेवानिवृत्त तहसीलदार कै. साहेबराव काका चव्हाण यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी मार्गदर्शन करत होते.कै.साहेबराव काका चव्हाण यांचे संपूर्ण जीवन म्हणजे 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी'चे मूर्तिमंत उदाहरण होते.प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी जमिनीवरचे पाय कधी ढळू दिले नाहीत. मुलांवर केलेले उच्च संस्कार आणि दिलेली मूल्यांची शिकवण यामुळे समाज त्यांना सदैव आदर्शाच्या स्थानी मानेल.त्यांच्या याच सुसंस्कारांचे फलित म्हणजे त्यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे माजी सचिव तथा तत्कालीन जिल्हाधिकारी सुनीलदादा चव्हाण आणि माजी सरपंच संतोषभैय्या) चव्हाण हे होत. प्रशासकीय आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर या दोन्ही भावांनी मिळवलेला नावलौकिक हा खऱ्या अर्थाने कै. साहेबराव काकांच्या विचारांचा विजय आहे. त्यांच्याच रूपाने काकांचे विचार समाजाला निरंतर प्रेरणा देत राहतील अशी भावना गणेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे बोलताना गणेश महाराज शिंदे म्हणाले की,
सध्याच्या धकाधकीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात, दशक्रिया विधीसारख्या प्रसंगामधून केवळ पारंपरिक कर्मकांड न होता समाजाला 'नाती जपण्याचा' असा वैचारिक संदेश मिळणे अत्यंत गरजेचे आहे.कै.साहेबराव चव्हाण यांनी दिलेला संस्कारांचा वसा आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना, यातून नव्या पिढीने नक्कीच बोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, राजेंद्र धोंडे, अण्णासाहेब चौधरी,किशोरनाना हंबर्डे,सतीशआबा शिंदे,नामदेवभाऊ राऊत,अमोलराजे तरटे,संजय मेहेर, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,श्रीहरी पुरी महाराज, कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, अमोलराजे तरटे, अमर निंबाळकर, शरद पवार, काका शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वच दिग्गजांनी आपल्या मनोगतातून कै. चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
------------------


stay connected