श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड येथे सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी आ.सुहास कांदे, आ. नितीन पवार यांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची दिली देणगी.

 श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड येथे सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी आ.सुहास कांदे, आ. नितीन पवार यांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची दिली देणगी. 




आष्टी (प्रतिनिधी) : नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे व विकासाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून या पवित्र कार्यासाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे व आमदार नितीन पवार यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची देणगी देत मोठ्या भक्तीभावातून योगदान दिले आहे.

मच्छिंद्रनाथ गड हे नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते.दररोज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गडावरील मंदिराचा जीर्णोद्धार, परिसर सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा निर्माण करणे तसेच धार्मिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. या कामासाठी लोकप्रतिनिधी, भाविक व दानशूर व्यक्तींकडून सहकार्य मिळत आहे.

आ. सुहास कांदे यांनी मंदिराच्या विकासासाठी दहा लाख रुपयांची देणगी देत “मच्छिंद्रनाथ गड हे अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कृतीचे केंद्र असून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळणे ही भाग्याची बाब आहे,” असे सांगितले.

तर आ. नितीन पवार यांनीही गडाच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करत मंदिर विकासासाठी आपले सहकार्य कायम राहील, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी दिलेली दहा लाख रुपयांची देणगी मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला मोठी मदत ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या गडावर मंदिर दुरुस्ती, सभामंडप उभारणी, परिसर विकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी निवारा व अन्य सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ, भक्तगण आणि विविध संस्थांकडूनही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला जात आहे.

या देणगीबद्दल मंदिर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आ. सुहास कांदे आणि आ. नितीन पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या योगदानामुळे मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असून भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.