पत्रकारितेत गुणवत्ता आणि दर्जा राखणे ही काळाची गरज
-ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे
------------------
प्रवीण पोकळे, अनिरुद्ध धर्माधिकारी आणि नितीन कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त गौरव; पत्रकार व मान्यवरांकडून अभिष्टचिंतन
------------------
------------------
आष्टी (प्रतिनिधी)
लोकशाही व्यवस्था ही सर्वोत्तम मानली जाते आणि या व्यवस्थेची मूल्ये समाजात प्रत्यक्षात रुजवण्यासाठी ज्या स्तंभांचा आधार घेतला जातो, त्यात पत्रकारिता हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. सद्यस्थितीत लेखन आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्ता आणि दर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 'प्रजापत्र'चे आष्टी तालुका प्रतिनिधी प्रवीण पोकळे, 'दैनिक सकाळ'चे तालुका प्रतिनिधी अनिरुद्ध धर्माधिकारी आणि 'लोकमत'चे कडा प्रतिनिधी नितीन कांबळे यांनी आपल्या लेखणीतून हा दर्जा आजवर सार्थपणे जपला आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी केला.
आष्टी तालुक्यातील या तीनही अभ्यासू व धडाडीच्या पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त आज एका विशेष अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे हे होते. यावेळी पत्रकारिता, शिक्षण,सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या तिन्ही पत्रकारांच्या आजवरच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट कार्याचा आढावा घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त करताना उत्तम बोडखे बोलत होते.
पत्रकारितेसमोरील वाढत्या आव्हानांवर सविस्तर भाष्य करताना उत्तम बोडखे पुढे म्हणाले की,सध्याच्या काळात पत्रकारितेसमोर अनेक मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.या आव्हानांतून यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावण्यासाठी पत्रकार हा नेहमी सजग,जागृत, सक्षम,स्वाभिमानी आणि अभ्यासू असला पाहिजे. किंबहुना,त्यांच्या लेखनातील दर्जा आणि गुणवत्ता ही सर्वश्रेष्ठच असली पाहिजे.समाज नेहमीच पत्रकारितेकडे आणि माध्यमांकडे एका मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतो. या अपेक्षा फोल न ठरता,जेव्हा त्यांची पूर्तता होते, तेव्हाच पत्रकारिता आपले कर्तव्य यशस्वीपणे बजावत आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांनी सत्य बातम्यांच्या माध्यमातून समाजात समता, बंधुत्व, ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी काम केले पाहिजे. राष्ट्राला व समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येकाच्या सक्षम आणि योग्य लेखणीची आज गरज आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्यादरम्यान अध्यक्षीय मनोगतातून प्रफुल्ल सहस्रबुद्धे यांनीही या पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तालुक्यातील विविध पत्रकार बांधवांनी प्रवीण पोकळे,अनिरुद्ध धर्माधिकारी आणि नितीन कांबळे यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आणि समाज माध्यमांद्वारे या तिन्ही पत्रकारांवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिष्टचिंतन केले.
------------------


stay connected