बीड शहर स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी मोदी सरकारने दिला 48 कोटींचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजाताईंचे आभार - सलीम जहाँगीर

 बीड शहर स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी 
मोदी सरकारने दिला 48 कोटींचा निधी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजाताईंचे आभार - सलीम जहाँगीर 



बीड ( प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टिकोन व्यापक आहे. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठपुरावाचे बळ मिळत असून त्याच दृष्टिकोनातून केंद्र सरकारने बीड शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 48 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बीड शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून हा निधी जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी जाहीर आभार मानले आहेत.



बीड शहरातील नागरिकांना स्वच्छता व पाणीपुरवठ्याच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठा दिलासा मिळणार असून, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र शासनाकडून बीड नगर परिषदेला ₹४८,२९,०७,४८२/- (अक्षरी रुपये अठ्ठेचाळीस कोटी एकोणतीस लाख सात हजार चारशे ब्याऐंशी फक्त) इतका निधी प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या प्रशासकीय कालावधीतील पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेला निधी संबंधित वर्षांमध्ये बीड नगर परिषदेला प्राप्त झाला नव्हता. सदर प्रलंबित निधी आता चालू वर्षात एकत्रित स्वरूपात नगर परिषदेला प्राप्त झाला असून, त्यामुळे शहरातील प्रलंबित नागरी सुविधा विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकसंख्येच्या निकषावर केंद्र शासनामार्फत वितरित केला जातो. त्यानुसार बीड जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या लोकसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निधी “बंधनकारक अनुदान ” स्वरूपात असून, त्यातील 50  टक्के निधी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा, पाणीपुरवठा सक्षमीकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याच्या पुनर्वापरासाठी, तर उर्वरित 50  टक्के निधी प्रभावी घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उपक्रमांसाठी वापरणे बंधनकारक आहे. हा निधी जाहीर करून केंद्र सरकारने देशासाठी सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन व्यापक असल्याचे दाखवून दिल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.