एकतेचा दरवळता उत्सव : मौलाली बाबांच्या यात्रेची भावस्पर्शी परंपरा ------------------ बुद्ध पौर्णिमेपासून श्रद्धा, संस्कृती आणि बंधुभावाचा अविस्मरणीय सोहळा

 एकतेचा दरवळता उत्सव : मौलाली बाबांच्या यात्रेची भावस्पर्शी परंपरा

------------------

बुद्ध पौर्णिमेपासून श्रद्धा, संस्कृती आणि बंधुभावाचा अविस्मरणीय सोहळा



-----------------

राजेंद्र जैन/ कडा

-----------------

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक मानला जाणारा हजरत मौलाली बाबांचा यात्रोत्सव यंदाही भक्तिभाव आणि उत्साहाने उजळून निघणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी सुरू होणारा हा दहा ते पंधरा दिवसांचा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा भावस्पर्शी अविष्कार ठरतो.


कडा परिसरातील कडी नदीच्या रम्य तीरावर वसलेला बाबांचा दर्गाह रोषणाईने झगमगून उठतो, जणू श्रद्धेच्या प्रकाशाने संपूर्ण हा परिसर अक्षरश: उजळून निघतो. रखरखत्या उन्हालाही न जुमानता भाविकांची गर्दी उसळते. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या चादरींच्या मिरवणुका, संदलचा सुगंध, भक्तीने भारलेले जयघोष वातावरण भारावून टाकतात. उत्सवाच्या निमित्ताने गावकंदुरी, छबीना मिरवणूक, पहाटेची फटाक्यांची आतिषबाजी आणि दुसऱ्या दिवशी होणारी कुस्त्यांची दंगल हा सोहळा अधिकच आकर्षक बनवतात. या आखाड्यात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नामांकित मल्ल सहभागी होत असल्याने कुस्तीप्रेमींसाठी हा एक नेत्रदीपक अनुभव ठरतो.

नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही या यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी गावी परत येऊन मातीशी नाळ पुन्हा घट्ट जोडतात. लोकवर्गणीतून साकारलेला हा उत्सव म्हणजे सामूहिक श्रद्धा, परिश्रम आणि ऐक्याची साक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात असून, सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य, ग्रामस्थ आणि यात्रा समितीच्या अथक प्रयत्नांतून हा उत्सव यशस्वी करण्याची जय्यत झाली आहे.

------%--------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.