जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे प्रतिक: भाळवणीच्या मुस्कान शेखची कर सहाय्यक पदी निवड
गरीब शेतकरी कुटुंबातील सहा बहिणींमधील मुस्कानने चार वर्षे पुण्यात अभ्यास करत मिळवले यश; विद्यार्थ्यांना मोठे प्रेरणास्थान
आष्टी प्रतिनिधी :
आष्टी तालुक्यातील भाळवणी येथील गरीब शेतकरी कुटुंबातील मुस्कान जहागीर शेख हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या 'कर सहाय्यक' (टॅक्स असिस्टंट) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पदाची निवड मिळवली आहे.
आईचे योगदान अविस्मरणीय :
मुस्कानची आई मोलमजुरी करत असे. कधीकधी तिने स्वतःच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवूनही मुलींना शालेय साहित्याची कमी पडू दिली नाही. मुलगा-मुलगी भेदभाव न करता तिने सर्व मुलींना उच्च शिक्षण दिले. आज मुलीने तिच्या कष्टाची चीज केल्याचे पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मुलगा नसतानाही तिने मुलीच्या रूपात मुलगाच शोधला.
शिक्षणाचा प्रवास :
मुस्कानचे प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत तिच्या मूळ गावी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाळवणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण गणेश विद्यालय, आष्टी येथे तर पदवीचे शिक्षण हंबर्डे महाविद्यालय, आष्टी येथे पूर्ण झाले.
स्पर्धा परीक्षेतील यश :
मनामध्ये जिद्द ठेऊन मुस्कानने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तब्बल चार वर्षे पुणे येथे MPSC चा अभ्यास करून अखेर तिने हे यश मिळवले. विशेष म्हणजे मुस्कानला भाऊ नसून ती सहा बहिणींपैकी एक आहे. 'लोक काय म्हणतील' याकडे लक्ष न देता तिने आपला अभ्यास चिकाटीने सुरू ठेवला आणि कर सहाय्यक पदी निवड होऊन आदर्श निर्माण केला.
विद्यार्थ्यांसाठी संदेश :
ज्या लोकांनी तिच्या संघर्षाच्या काळात तिच्यावर नावे ठेवली, तेच लोक आज तिला शुभेच्छा देत आहेत. मुस्कानने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले की, "लोकांकडे लक्ष न देता फक्त अभ्यास करावा. यश एका दिवसात भेटत नाही, पण एक दिवस नक्की भेटते. विद्यार्थ्यांनी खचून न जाता परीक्षेची तयारी करावी."
आष्टी तालुक्यातून कौतुक :
मुस्कानच्या या यशामुळे भाळवणी गावासह संपूर्ण आष्टी तालुक्यातून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिची जिद्द, चिकाटी आणि मेहनत इतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.





stay connected