राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृहाचे १२ एप्रिलला लोकार्पण
--------------
आष्टी / वार्ताहर
------------
शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणारा मराठा सेवा संघ संचलित ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह’ या भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवार, १२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजिनिअर तानाजी जंजिरे यांनी दिली आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आष्टी शहरात उभारण्यात आलेल्या या वसतिगृहामुळे बहुजन समाजातील तसेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या उदार सहकार्याने साकारलेली ही वास्तू केवळ इमारत नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता निवासाची चिंता भासणार नाही. त्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
या भव्य सोहळ्याच्या तयारीसाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार नियोजन सुरू असून प्रत्येक बाबीची बारकाईने आखणी केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या नियोजन बैठकीत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे, सचिव भास्कर निंबाळकर, प्रवक्ते दत्ता नरसाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
--------%------


stay connected