शतकपूर्तीच्या तेजाने उजळला कडा :
अमोलक जैन संस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार
-------------------
ग्रामीण शिक्षणाच्या सेवेचा गौरव, यशदामध्ये ३० एप्रिलला सन्मान सोहळा
------------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
शिक्षणाच्या अखंड दीपज्योतीने ग्रामीण भाग उजळवणाऱ्या कडा येथील श्री अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या कार्याला आता राज्यस्तरावर मानाचा मुजरा मिळाला. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय शताब्दी दीपस्तंभ पुरस्कार’ या संस्थेला जाहीर झाला असून, शतकपूर्ती वर्षात हा सन्मान मिळणे म्हणजे कार्याचा सुवर्णमहोत्सवी ठसा उमटल्यासारखे आहे.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी जाहीर केलेल्या पत्रात संस्थेच्या सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत नैतिकता, प्रामाणिकपणा व स्वावलंबनाची मूल्ये रुजवणारी अमोलक ही संस्था आदर्श ठरली आहे. येथून घडलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्चस्पदस्थानी यशस्वीपणे कार्यरत असून समाजाभिमुखतेची परंपरा पुढे नेत आहेत.
३३ एकर विस्तीर्ण कॅम्पसमध्ये उभारलेले शैक्षणिक विश्व, आयुर्वेदिक वनस्पतींनी नटलेले ‘अमोलक तीर्थंकर गार्डन’ आणि एनसीसीसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व देशप्रेमाची जपणूक केली जाते. भविष्यात मेडिकल व नर्सिंग कॉलेजसह विविध सुविधा उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. हा गौरव सोहळा ३० एप्रिल रोजी पुणे येथील यशदा येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडणार असून, संस्थेच्या कार्याचा हा सन्मान कडा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
------%------


stay connected