जगातील सर्वात गंभीर इराण- अमेरिका तणावावर तोडगा,पण पाटोदा शहरातील तीन पुलांचा प्रश्न काही सुटेना

 *जगातील सर्वात गंभीर इराण- अमेरिका तणावावर तोडगा,पण पाटोदा शहरातील तीन पुलांचा प्रश्न काही सुटेना*





पाटोदा *(प्रतिनिधी)* जागतिक पातळीवर अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानला जाणारा इराण- अमेरिका तणावाचा प्रश्न काही प्रमाणात नियंत्रणात आला असताना, पाटोदा तालुक्यातील मूलभूत समस्या मात्र दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालल्या आहेत. विशेषतः पाटोदा शहरातील तीन महत्त्वाच्या पुलांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर टाकत आहे. पाटोदा शहरातील मांजरा नदीवरील मुख्य पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचे अपघात होत असून, जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नव्याने बांधकामाचा कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही.दुसरीकडे, हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सांळ नदीवरील पूल तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या लोकांना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत, जे वेळखाऊ आणि कष्टदायक आहेत. अशा संवेदनशील ठिकाणाच्या समस्येकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत.याशिवाय, मांजरा नदीवरील ब्रिज- कम-बंधाऱ्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या प्रकल्पामुळे पाणी साठवण, शेतीला पाणीपुरवठा आणि स्थानिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा होती. मात्र काम बंध असल्यामुळे या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. प्रशासन व सरकारच्या उदासीनता यामुळे हा प्रकल्प आजही अपूर्ण अवस्थेतच आहे.पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन, निवेदने आणि मागण्या करूनही या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जगातील महासत्तांमधील वाद मिटू शकतात, तर पाटोद्याचे हे लहान पण महत्त्वाचे प्रश्न का सुटत नाहीत?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, पावसाळा जवळ येत असल्यामुळे या पुलांची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात किंवा जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन व सरकारने तात्काळ लक्ष घालून या तिन्ही पुलांच्या कामांना गती देणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.