📰 गोवंशीय जनावरांचे सुमारे १२० टन मांस जप्त; पुणे मार्गे विदेशात पाठवण्याचा डाव उधळला
जालना प्रतिनिधी – गोवंशीय जनावरांचे मोठ्या प्रमाणावर मांस वाहतूक करून ते पुणे मार्गे विदेशात पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन कंटेनर पकडण्यात आले असून, सुमारे १२० टन मांस जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोलनाक्यावर संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथकाने सापळा रचला. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत टोल नाक्यावर नजर ठेवण्यात आली. पहाटेच्या सुमारास तीन कंटेनर टोलनाक्यावर पोहोचताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
तपासादरम्यान या तीनही कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. अंदाजे १२० टन मांसासाठी ६०० ते १००० जनावरांची कत्तल करण्यात आली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. संबंधित मालाची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त केलेले हे मांस पुण्यातील कोल्ड स्टोरेजमार्फत रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा बंदरातून विदेशात पाठवण्याची तयारी सुरू होती. यापूर्वीही अशा प्रकारच्या छापे टाकण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अधिक तपास करत असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


stay connected