इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये रेनबो इंग्लिश स्कूल ,धामणगावचा दबदबा; 68 सुवर्ण, 49 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचे मानकरी
धामणगाव | प्रतिनिधी
देशपातळीवरील इंडियन मॅथ ऑलिम्पियाड व इंडियन इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेमध्ये धामणगाव येथील रेनबो इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेचा दबदबा निर्माण केला आहे. दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी एकूण ६८ सुवर्णपदके, ४९ रौप्यपदके आणि ५ कांस्यपदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या श्रीमती मैथिली कमलेश मिरगणे यांनी दिली.
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड, नवी दिल्ली यांच्या वतीने देशभरात घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत रेनबो इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. गेल्या दोन वर्षांपासून शाळेचा निकाल सातत्याने उत्कृष्ट लागत असून शैक्षणिक क्षेत्रात शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या श्रीमती मैथिली मिरगणे यांच्यासह वैष्णवी राऊत, शुभांगी चौधरी, प्रियंका गिते, तब्बस्सुन सय्यद या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेत हसत-खेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करून घेतली जाते, असे प्राचार्यांनी सांगितले. सदरील परीक्षा ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारत भर घेण्यात आली होती.
सन २०२४-२५ मध्ये शाळेला राज्यातील टॉप १०० शाळांमध्ये स्थान मिळाले असून गोल्डन स्कूल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. ग्रामीण भागात शहरी शिक्षण पद्धती प्रभावीपणे राबवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याचेही दिसून येत आहे.
या यशाबद्दल मा. श्रीमती प्राजक्ता ताई सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे युवा नेते सागर आप्पा धस , समाजसेवक विजय गोल्हार, सरपंच मनोज गाढवे, दूध संघाचे चेअरमन संजय गाढवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय गाढवे, प .स. सदस्य रावसाहेब लोखंडे, माजी सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच सतीश झिंजुर्क , डॉ. अकील सय्यद, बाळासाहेब निकम, संजय महाजन, शहाबुद्दीन सय्यद, पांडुरंग झिंजुर्क , सुरेश मिरगणे, तुकाराम पवार, सदाशिव घुमरे, प्रल्हाद मुळीक, कमलेश मिरगणे , तसेच ग्रामस्थ व पंचक्रोशीतील पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” :- प्रिंसिपल सौ. मैथिली कमलेश मिरगणे
⸻



stay connected