खुंटेफळ साठवण तलावास २५० कोटींचा निधी मंजूर; आ. सुरेश धस यांची माहिती
आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र प्राप्त झाले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आ.सुरेश धस यांनी आभार मानले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या प्रकल्पासाठी आ. धस यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या अठरा वर्षांपासून या योजनेचा पाठपुरावा सुरू असून सुरुवातीला विरोधकांकडून या प्रकल्पावर शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी एकूण ५०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे कार्यसन अधिकारी आनंद जावकर यांनी पत्र क्र. व्हीआयपी२०२६/प्र.क्र.५१/निवसं-१, दि. ९ एप्रिल २०२६ नुसार हा निधी मंजूर केल्याचे पत्र पाठविले आहे.
या निधीमुळे खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाला गती मिळणार असून, आष्टी तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासन स्तरावर आणखी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही आ. सुरेश धस यांनी सांगितले. तसेच या कामाची अंमलबजावणी जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकूणच, खुंटेफळ साठवण तलावासाठी मंजूर झालेला हा निधी आष्टी तालुक्यासाठी ‘जीवनदायी’ ठरणार असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळणार आहे.



stay connected