हिंदू-मुस्लिमांचं श्रध्दास्थान हजरत मौलाली बाबांचा यात्रोत्सव
कडा | रहेमान सय्यद
ग्रामदैवत तथा सर्वधर्मियांचं श्रध्दास्थान म्हणून नावलौकिक असलेल्या हजरत मौलाली बाबांचा यात्रोत्सव-उरूस शुक्रवार दि.१ मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. आष्टी तालुक्यातील कडा हिंदू -मुस्लिम एकोपा जोपासणारं गाव म्हणून मराठवाड्यात नावलौकिक आहे.याठिकाणचा यात्रोत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो.कडीनदीच्या किनारी ग्रामदैवत तथा सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान हजरत मौलाली बाबांची दर्गाह आहे.दरवर्षी सर्वधर्मिय ग्रामस्थ एकत्रितपणे खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा करतात.व्यावसाय,नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने आवर्जून हजेरी लावतात.बुध्द पौर्णिमेपासून यात्रेला सुरूवात होते.
मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी ह.मौलाली बाबा समाधीला अंघोळ घातली जाणार असून पौर्णिमेच्या अगोदर येणाऱ्या बुधवारी म्हणजे दि.२९ एप्रिल रोजी संदल लावतात. गुरूवार दि.३० एप्रिल रोजी गाव कंदुरी असून यावर्षी शुक्रवार दि.१ मे पासून यात्रोत्सवास सूरूवात होत आहे.सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन बाबांची सवाद्य छबीना मिरवणूक काढतात.बाबांच्या समाधीला फुलांची चादर अर्पण करून श्रीफळ, मलिदा ,गुळ-खोब-याच्या शेरणीचा प्रसाद दाखवून भाविक-भक्त आपली इच्छापुर्ती करतात.त्याच दिवशी पहाटेच्या दरम्यान शोभेच्या रंगीत फटाक्यांची आतिषबाजी लक्षवेधी असते.हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी महिला,पूरूष, बालगोपाळ देखील सहभागी होतात.तर दुस-या दिवशी दि.२ मे शनिवार रोजी नामवंत मल्लांच्या कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली आहे.नदीकाठी थाटलेल्या विविध दुकानांना विधुत रोषणाईने सजविण्यात येते.यात्रेत आलेली मनोरंजनाची साधने यात्रेकरूंची लक्षवेधुन घेतात.कडयाची यात्रा म्हणजे हिंदू -मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक मानली जाते, यातूनच सामाजिक एकोप्याचे दर्शन अनुभवायला मिळते.हा यात्रोत्सव-उरूस शांततेत साजरा करण्यासाठी ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, यात्रा कमिटी, मुलाणी (आर्चक)बांधव,पोलिस प्रशासन एकत्रितपणे परिश्रम घेताना पहायला मिळतात.हेच हजरत मौलाली बाबांच्या यात्रेचं वैशिष्ट्य मानलं जातं.


stay connected