आष्टी | धानोरा येथे तीन मान्यवर शिक्षकांचा भव्य सेवापूर्ती सोहळा; शिक्षण क्षेत्रातील योगदानाला सलाम
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य श्री. शिवाजी मारुती ढोबळे, प्रा. श्रीमती सुनिता नामदेव बांदल आणि प्रा. श्री. अजित आण्णासाहेब इथापे या तिन्ही मान्यवर शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनता वसतिगृह शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या या विद्यालयात या शिक्षकांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, उंच भरारी घेतली आणि समाजात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांच्या सेवेला सलाम करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. श्री. विजयकुमार बांदल राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. आ. श्री. सुरेश (आण्णा) धस यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात निवृत्त होणाऱ्या तिन्ही शिक्षकांचा सत्कार, त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे विशेष क्षण अनुभवायला मिळणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
जनता वसतिगृह, धानोरा येथे पार पडणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिक्षण सेवकांना मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


stay connected