साहित्यिकांमुळेच जगाला मानवी जीवनाचा अर्थ सांगणारी साहित्य संपदा मिळाली-सौ.प्राजक्ताताई धस
ज्या विचारांना भंग नाही तोच अंभग आहे-डॉ.कैलास दौंड
वाळुंजमध्ये भव्य बालसाहित्य संमेलन संपन्न
आष्टी प्रतिनिधी - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात साहित्याची गोडी निर्माण व्हावी आणि बालसाहित्याचा व्यापक प्रसार व्हावा या उदात्त हेतूने वाळुंज (ता. आष्टी, जि. बीड) येथे सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी भव्य बालसाहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. भैरवनाथ मंदिरासमोरील प्रशस्त परिसरात पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडीपासून काव्यवाचन, कथाकथन, मुलाखती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समृद्ध मेळा पाहायला मिळाला.
या संमेलनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने तसेच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप - २०२५ अंतर्गत करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विशेष प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली. गावातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या दिंडीमधून साहित्यप्रेमाचा संदेश देण्यात आला.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सौ. प्राजक्ताताई सुरेश (अण्णा) धस या होत्या, तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. कैलास दौंड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. उद्घाटक म्हणून शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे तसेच संदीप पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वाळुंज शाळेच्या बालचमूने आज तुमच्याच स्वागताला हे गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी कवी हनुमंत चांदगुडे (बारामती), कवी शंकर कसबे (तुळजापूर) यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल जाधव, श्रीम. मनीषा सातपुते, श्रीम. शितल शिंदे, किशोर सोले, मारुती पठाडे, महेश शिंदे, श्रीम. सुनीता उगले, सुरेश पवार, सोमनाथ वाळके, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, वि. भा. साळुंके, अजय घोडके, केतन पाटील, प्रा. मिलींद काटे, गौतम आजबे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष हातवटे यांनी केले.
स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना सौ. प्राजक्ताताई धस यांनी सांगितले की, साहित्यिकांमुळेच जगाला मानवी जीवनाचा अर्थ सांगणारी साहित्यसंपदा मिळाली आहे. आमच्या पिढीला मिळालेल्या बालसाहित्यातूनच आमचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी अनेक साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेत बालसाहित्यातील परी आज वास्तवात प्रत्येक घरात पोहोचल्याचे सांगितले. अशा संमेलनांमुळेच मुलांचे सर्वांगीण घडण होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महिलांसाठी धोरण अस्तित्वात आले व त्यामुळेच आज स्त्रियांची प्रगती दिसून येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. कैलास दौंड म्हणाले, विचारांचा जागर झाला पाहिजे. मुलांची विचारशक्ती जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या विचारांना भंग नाही तोच अंभग आहे. साहित्य संमेलनातून विचारांची पेरणी होते आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ मिळते. यानंतर वाळुंज शाळेच्या मुलींनी आम्ही शिवकन्या हे बहारदार गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटन सत्राचे आभार सय्यद सल्लाउद्दीन यांनी मानले.
काव्यवाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन होते. या सत्रात वेदिका खेडकर, वैष्णवी, संध्या गावडे, स्वरा आंधळे, अपूर्वा झगडे, धनश्री घरे, शिवानी सोले, हर्षा जगताप, अक्षय म्हस्के, संस्कृती वाळके, तृप्ती वाल्हेकर, गाथा भादवे, मयुरी भोगाडे, स्नेहल हुंदाडे, स्नेहल धस, प्रज्ञा खाडे, प्राची सातपुते, सानिका खाडे, श्रावणी सोले, जयदत्त चौधरी, ज्ञानेश्वरी पठाडे, कृष्णा तावरे, चंचल चव्हाण, सार्थक गायकवाड, अनुजा गाडे, कृष्णा बळे, श्रीम. काझी शबनम यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
कथाकथन सत्राचे अध्यक्ष वि. भा. साळुंके होते. या सत्रात प्रिती कोकणे, प्रज्वल आंधळे, ओंकार रणसिंग, यशश्री सोले, विराज तांबारे, रुद्रा मोहळकर, यशराज वाल्हेकर, तृप्ती शिंदे, प्रतिक्षा पवार, सार्थक गायकवाड, कशब पठाण, रोहन, हर्षदा लोखंडे, साक्षी गायकवाड यांनी कथा सादर केल्या. सूत्रसंचालन कु. प्रांजल सरडे व कु. मृदुला शिंदे यांनी केले.
यानंतर कवी हनुमंत चांदगुडे व कवी शंकर कसबे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांनी आळाशी व माझ्या आज्यानं पंज्यानं या कविता सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांसाठी सुरुचिपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी नवनाथ हातवटे, पोपटराव खाडे, पद्मनाथ गर्जे, आप्पासाहेब काळे, राजेंद्र लाड, चंद्रशेखर खाडे, शेषराव तोतरे, दीपक सोले, दिलीप दाणी, आजिनाथ पेचे, प्रविण शिंदे, अरुण खुळपे, बाबासाहेब लोंढे, स्वानंद थोरवे, रत्नाकर चव्हाण, नवनाथ भोरे, शरद झेंडे, दिलीप भोंडवे, विकास खेडकर, अशोक वामन, लक्ष्मण गर्जे, दिलीप देवकाते यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षिका, साहित्यिक, ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालसाहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ. हरिष हातवटे, सय्यद सल्लाउद्दीन, दत्तात्रय घोरपडे, सचिन वारंगुळे, श्रीम. राजामती घोलप, श्रीम. काझी शबनम यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, वाळुंज येथे पार पडलेले हे बालसाहित्य संमेलन ग्रामीण भागातील , विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून साहित्य संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.


stay connected