आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ नेते पै. ईश्वर गव्हाणे यांचे निधन; बोरोडी येथे आज अंत्यसंस्कार
आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, जुन्या पिढीतील नामवंत पहलवान तसेच वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक पै. ईश्वर रामभाऊ गव्हाणे यांचे आज पहाटे ५.४० वाजता उपचारादरम्यान अहिल्यानगर येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आष्टी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पै. गव्हाणे हे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. एक उत्कृष्ट पहलवान म्हणून त्यांनी आपल्या काळात विशेष नाव कमावले होते.
वारकरी संप्रदायाशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली होती. पांडुरंगावरील त्यांची अढळ श्रद्धा आणि साधी, संयमी जीवनशैली यामुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते.
त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) दुपारी ३ वाजता बोरोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा विस्तृत परिवार आहे. त्यांच्या निधनाने समाजातील एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.


stay connected