ग्रामीण मातीतून उगवलेला आरोग्यदीप- डॉ. नितीन मोरे मैदानात
-----------------
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणुकीत सेवाभावी, कर्तृत्ववान नेतृत्वाची दमदार एन्ट्री
----------------
राजेंद्र जैन / कडा
----------------
ग्रामीण भागातील धुळीने माखलेल्या पायवाटांवरून चालत, जिद्द आणि सेवाभावाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. नितीन मोरे आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. (गट-अ) वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ही केवळ निवडणूक नसून, त्यांच्या हक्काच्या नेतृत्वाची आशादायी पहाट ठरत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील डोईफोडवाडी या छोट्याशा गावातून उगवलेले डॉ. मोरे आपल्या कुटुंबातील पहिले वैद्यकीय अधिकारी ठरले. धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पूर्ण केल्यानंतर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे त्यांनी रुग्णसेवा करत आपल्या ज्ञानाला अनुभवाची जोड दिली.
यानंतर डॉ. मोरे यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी MD फॉरेन्सिक मेडिसिन या विषयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कुपर हॉस्पिटल, जुहू, मुंबई येथे निवड झाली. या उच्च शिक्षणामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात अधिक परिपक्वता आणि संशोधनाधारित दृष्टिकोनाची भर पडली.
शहरी सुखसोयींचा मोह न ठेवता त्यांनी ग्रामीण सेवेला प्राधान्य दिले. बीड जिल्ह्यातील टाकळसिंग आणि कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सेवा, समर्पण आणि नेतृत्व यांचे अनोखे उदाहरण घालून दिले. कडा येथील आरोग्य केंद्राची बदललेली दशा आणि दिशा आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण भागात राहून त्यांनी रुग्णसेवेला खरी अर्थाने मानवतेची जोड दिली.
रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य केंद्रांमध्ये आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या कार्यकाळात कडा प्राथमिक आरोग्य केंद्राला सलग तीन वर्ष ‘कायाकल्प’ पुरस्कार मिळाला, तर टाकळसिंग आरोग्य केंद्रानेही हा मान तीन वेळा पटकावला. ही त्यांच्या दूरदृष्टी आणि कार्यक्षमतेची जिवंत उदाहरणे आहेत.
कोविडसारख्या भीषण संकटाच्या काळात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या निःस्वार्थ सेवेसाठी त्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरवण्यात आले.
प्रशासकीय दृष्टी, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण यांचा संगम असलेले डॉ. मोरे यांनी बीड जिल्ह्यात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटनेची निवडणूक जिंकत आपले पॅनल पूर्ण बहुमताने निवडून आणले. त्यानंतर राज्यस्तरीय ‘मॅग्मो’ संघटनेत सक्रिय भूमिका निभावत ‘पीजी सेल’चे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी मोलाचे कार्य केले आहे.
आज त्यांच्या या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ही केवळ यशोगाथा नाही, तर सेवाभाव, चिकाटी आणि नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे. जर असे अनुभवी, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सक्रिय झाले, तर राज्यातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील एका डॉक्टराने पेटवलेला सेवाभावाचा दीप आता संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला उजळून टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
------%-------


stay connected